आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:सैन्य माघारी, पण हौतात्म्याचा सल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन्ही बाजंूच्या सैन्य माघारी आरंभामुळे भारत-चीन ताबा रेषेवरील दोन महिन्यांचा तणाव कमी होण्यास सध्या तरी सुरुवात झाली असली तरी भारताने याकडे पुढच्या वादळापूर्वीची शांतता म्हणूनच पाहिले पाहिजे. पूर्व लडाख आणि पेंगॉग येथून सैन्य परती होत असली तरी भूतानच्या सीमेवरचा तणाव निवळलेला नाही. चीनने दावा केलेल्या भूतानच्या अभयारण्याचा भूभाग अरुणाचल प्रदेशला चिकटून आहे. शिवाय भूतानच्या रक्षणाची जबाबदारी भारताने स्वीकारलेली आहे. त्यामुळे कुठेना कुठे चीन भारताला टोकरत राहणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तणाव सुरू झाल्यानंतर भारत चीनला कसे तोंड देतो? याकडे साऱ्या जगाचे लक्ष आजही आहे. भविष्यातही राहणार. ताबा रेषेवरील सैन्य परतीला यश म्हणता येणार नाही. पण भारताच्या लष्कराने दिलेले चोख प्रत्युत्तर, चीनच्या पोटावर आर्थिक लाथ मारण्याची जगाला दाखवलेली दिशा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समर्थन मिळवण्यासाठी केलेले राजनैतिक प्रयत्न याचा एकत्रित परिणाम म्हणजे सैन्य माघारीस चीनची तयारी. पंतप्रधान मोदींच्या लडाख भेटीत चीनचा नामोल्लेख न करता विस्तारवादी धोरणाचा स्पष्ट उच्चार हा जसा शत्रूला इशारा देणारा होता तसाच तो चीनशी संघर्ष करताना भारत कणखर राहील याची खात्री इतर देशांना देणारा होता. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व चीन पराराष्ट्र मंत्रालयाच्या चर्चेला आकार आला. टप्प्याटप्प्याने सैन्य परतीचा निर्णय, अंमल झाला. जमिनी सीमा व सामुद्रिक सीमारेषेवरून शेजारील राष्ट्रांशी सतत भांडण उकरून काढण्याच्या चिनी चालीची कल्पना बाहेरील देशांना असल्यामुळे त्यांचे समर्थन मिळवण्याचा भारताचा मार्ग सोपा झाला. कोरोना विषाणू प्रसाराबाबत बऱ्याच प्रमुख देशांना चीनबद्दल संताप आहेच. त्यामुळेच अमेरिका, इंग्लंड, जपान, इस्रायल, फ्रान्स शिवाय युरोप, आफ्रिकेतील काही देशांनी भारताला उघड समर्थन दिले. अमेरिका व इंग्लंडच्या विमानवाहू युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात येऊन थांबल्या. जपाननेही चीनच्या दिशेने युद्धनौका आणली. आंतरराष्ट्रीय विरोधाबरोबरच चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला देशांतर्गत विरोधाला, महामारीनंतरच्या आर्थिक दबावाला तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे सैन्य माघारीनंतरही चीन भारताला स्वस्थ राहू देणार नाही. पुढच्या काळात ताकद वाढवताना गलवान खोऱ्यातील २० जवानांच्या हौतात्म्याचा सल भारताने विसरू नये. त्याची फेड झालीच पाहिजे.

0