आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:आता नवा ‘खेळ’ हवाच !

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने भारतीय सीमेवर सुरू केलेल्या कुरापती थांबायला तयार नाहीत. एकीकडे चर्चेच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचा देखावा उभा करायचा, सामंजस्याची बोलणी सुरू ठेवायची आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्या नेमके विरुद्ध कारनामे करत राहायचे, हिच चीनची नीती बनली आहे. चीन मात्र भारताच्या संयम आणि सामंजस्याचा गैरफायदा घेत आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत राहिला. अलीकडच्या काळात जागतिक पटलावर भारताचे महत्व वाढले. त्यातच दोन्ही देशांतील व्यापार संबंधांचा विस्तार झाला. त्यामुळे तरी चीन नरमेल अशी आशा होती. पण, प्रत्येक वेळी ती फोल गेली. रविवारी पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा देत होते, देशातील तरुण उद्योजकांना संगणकाधारित खेळणी, अॅप्स बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करीत होते, पण त्या आधीच्याच रात्री पँगॉन्ग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चीनने पुन्हा लष्करी हालचाली वाढवत वातावरण चिघळवले. एका प्रकारे हा भारतीय सैन्याला उकसवण्याचा प्रकार होता. गलवान खोऱ्यातील घटनेप्रमाणे यात प्रत्यक्ष दोन्ही देशांचे सैनिक भिडले नसले, तरी तसे काही घडवण्याचाच चिनी लष्कराचा हेतू असावा. कारण या घटनेनंतर सोमवारी दोन्ही देशांतील ब्रिगेड कमांडर पातळीवरच्या चर्चेत चीनचा ताठरपणा दिसून आला. सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी भारतानेच आपले सैन्य मागे घेतले पाहिजे, असा उलटा पवित्रा घेतला. म्हणजे चीन भारताला या ना त्या प्रकारे केवळ अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे. भारताने ठाम भूमिका घेतली की तो एकतर लष्करी कुरापत काढतो किंवा चर्चेत खोडा आणतो. त्यामुळे आता आत्मनिर्भरतेतून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग अवलंबताना भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील ही कोंडीही फोडायला हवी. अलीकडे भारताने चीनची आर्थिक रसद तोडणारे उपाय योजण्यास सुरुवात केल्याने त्याच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेनेही जागतिक स्तरावर नाकेबंदी सुरू केल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे भारताला स्थिती तशी अनुकूल आहे. चीनची आर्थिक कोंडी करणाऱ्या खेळांच्या निर्मितीकडे वळतानाच आता त्याचे कुटिल डाव उधळण्यासाठी राजकीय, राजनयिक आणि लष्करी व्यूहरचनेचा खेळ भारतानेही खेळायला हवा.