आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:विचित्र योगायोग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून जोसेफ बिडेन यांची चर्चा होतीच. पन्नास राज्यांतील डेमोक्रॅट सदस्यांच्या ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’मधील मतदानानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. तिसाव्या वर्षी १९७२ मध्ये अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रवेश केल्यानंतर ती संधी मिळण्यासाठी जो यांना वयाच्या ७७ व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. या अगोदर त्यांनी १९८८ मध्ये प्रयत्न केला होता. गैरप्रकाराच्या आरोपामुळे त्यांचा विचार झाला नाही. २००८ मध्येही अपयश आले. २०१६ मध्ये त्यांच्याऐवजी हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळाली होती. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश आले. आता ते चेन्नई कन्या कमला हॅरिस यांच्या साथीने निवडणूक लढत आहेत. यंदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याविरोधात वर्णभेदाचा मुद्दा मोठ्या तीव्रतेने प्रचारात आहे. डाव्या विचाराचे सारे नेते व पक्ष जो यांच्या समर्थनार्थ लढत आहेत. विचित्र योगायोगाची गोष्ट म्हणजे बिडेन यांच्या विरोधात वर्णभेदाचा आरोप पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत झाला होता. त्यातही विशेष म्हणजे हा आरोप खुद्द कमला यांनीच केला होता. अशा विपरीत स्थितीतही उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून बिडेननी कमला यांना पसंती दिली. ट्रम्पविरोधात वर्णभेद आरोपाचे भांडवल करताना कमला यांची उमेदवारी डेमोक्रॅट पक्षाला सोयीची आहे, हे त्यामागचे मुख्य कारण. अध्यक्ष म्हणून ट्रम्प वा बिडेन यांच्यापैकी फायद्याचे कोण? हा भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा. चीन, पाकिस्तानच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर डेमोक्रॅट पक्षाने भारतविरोधी भूमिका घेतल्याचा सततचा अनुभव. स्वत: बिडेन व कमला यांनी काश्मीर व ३७० कलम आदी मुद्द्यांच्या बाबतीत भारतविरोधी पवित्रा घेतला आहे. बिडेन यांच्या मुलाची चिनी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. काही कंपन्यांच्या संचालक मंडळावरही तो आहे. भारताला गरज आहे ती चीन, पाक विरुद्धच्या संघर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या समर्थनाची. विशेषत: चीनविरोधात अमेरिका व युरोपीय देशांची फळी उभी करण्यासाठी भारत धडपडतोय. त्यात अमेरिकेचे पाठबळ महत्त्वाचे. नरेंद्र मोदी यांनी तर अगोदरच ट्रम्प यांच्या मागे समर्थन उभे केले. अशा स्थितीत या भूमिकेत बदल होईल, असे वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...