आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:नव्या समीकरणांची चाचपणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागांचे घाेंगडे अजूनही भिजतच असताना आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी बिगुल वाजला आहे. काेराेनाकाळातील राज्यातील ही पहिलीच निवडणूक. विधानसभा निवडणुकीनंतर उदयाला आलेल्या नव्या समीकरणानंतरचाही पहिलाच राजकीय रणसंग्राम. या पाच जागांपैकी पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघ सध्या भाजपकडे, तर आैरंगाबाद पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीचे पाठबळ असलेल्या संघटनांकडे आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी हाेती. मात्र, आता चित्र बदलले आहे. भाजप एकाकी पडला असून, काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेचे बळ मिळाले आहे. त्यामुळे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यात भाजपला तगडे आव्हान देण्याच्या तयारीत आघाडी आहे. राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच हे तीनही पक्ष या पाच जागांच्या निमित्ताने एकत्रित निवडणुकांना सामाेरे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात अपेक्षित यश आले तर भाजपला नामाेहरम करण्यासाठी हा फाॅर्म्युला राज्यभरही वापरला जाऊ शकताे. मात्र, अशा वेळी ‘सर्वसहमतीचा उमेदवार’ ठरवणे हेच आघाडीच्या नेत्यांसमाेरचे माेठे आव्हान असेल. राज्याच्या सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपमध्ये आता अंतर्गत खदखद जाणवते आहे. अशा वेळी नवीन मतदारसंघ ताब्यात घेणे तर दूरच; पण आहे त्या जागा राखण्यासाठीही भाजपला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. त्यामुळे ही निवडणूक नव्या राजकीय समीकरणांची ‘लिटमस टेस्ट’ घेणारी असेल. या राजकीय धुळवडीत ज्यांच्या कल्याणासाठी हे आमदार वरिष्ठ सभागृहात पाठवले जात आहेत, त्या पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांचा मात्र सर्वच राजकीय पक्ष व संघटनांना विसर पडलेला दिसत आहे. निवडून आलेल्या आमदारांना या घटकांचे प्रश्न साेडून इतर विषय सभागृहात मांडण्यातच जास्त रस असल्याचा आजवरचा अनुभव आहे. काेराेनाच्या संकटकाळातही पदवीधर व शिक्षक नव्या प्रतिनिधींना सभागृहात पाठवण्यास उत्सुक आहेत. त्यांचे आपण काहीतरी देणे लागताे, याची किमान जाणीव तरी नव्या आमदारांनी ठेवायला हवी.