आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:करार आणि मदार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याने २५ भारतीय कंपन्यांशी नुकतेच ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. जगभर अर्थचक्र मंदावलेले असताना राज्यात मात्र गुंतवणुकीचा प्रवाह येत आहे. कोरोनाच्या दाट काजळीत हे चित्र सुखावह, नैराश्येचे मळभ दूर करणारे आहे. या सामंजस्य करारांतून अडीच लाखांहून जास्त रोजगार उपलब्ध होणार आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर कोरोनाने गडांतर आणले. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यातून नव्या संधी मिळतील. गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीचा प्रवाह आटलेला असताना, राज्यात होणारी ही गुंतवणूक महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. कोरोना काळातील सहा महिन्यांत राज्यात एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’चा हा तिसरा टप्पा. यापूर्वी असे २९ करार झाले आहेत. त्यापैकी २१ उद्योगांना जमिनी देण्यात आल्या आहेत. प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केल्याने काम सुलभ झाले आहे, तर महापरवाना सुविधेमुळे उद्योगांना २१ दिवसांत परवाना देण्यात येत असल्याचा दावा सरकारने केला आहे. एकीकडे गुंतवणुकीचे भले मोठे आकडे आणि सामंजस्य करारांची जंत्री असे चित्र असताना एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचे स्थान घसरत असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो. गुजरात आणि कर्नाटक हे शेजारी आपल्यापुढे गेल्याचे आकडेवारी सांगते. गुंतवणुकीत सातत्याने पुढे असलेल्या महाराष्ट्राने त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. शेजारी राज्यांचे आकर्षण का वाढले, हे पूर्वीपासून ‘मॅग्नेटिक’ असलेल्या महाराष्ट्राने जाणून घेतले, तर गुंतवणुकीचा प्रवाह धबधब्यात बदलेल. त्या दृष्टीने सरकार पावले टाकत असल्याचे सध्याचे चित्र कायम राहावे. नवे करार पाहिले तर मुंबई-ठाणे- पुणे या त्रिकोणातच मोठी गुंतवणूक होत असल्याचे दिसते. वर्षपूर्ती झालेल्या सरकारने हा त्रिकोण भेदावा. कोकणचा कॅलिफोर्निया, सोलापूरचे मँचेस्टर, मराठवाड्याचे नंदनवन या आणि अशा घोषणा ऐकत एक पिढी म्हातारी झाली. आगामी काळात हे चित्र बदलेल, असे धोरण आखायला हवे. बऱ्याचदा सामंजस्य करार केवळ कागदावरच राहतात, असा अनुभव आहे. त्यामुळे हे करार प्रत्यक्षात आणण्यातच सरकारची खरी मदार आहे.

बातम्या आणखी आहेत...