आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:उलथापालथीच्या दिशेने..?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारकडे १७०, तर विरोधी भाजपकडे १०५ आमदार आहेत. तरीही सरकार चालवण्याचे आणि पाडून दाखवण्याचे आव्हान-प्रतिआव्हान एकमेकांना दिले जात आहे. साहजिकच, ठाकरे सरकार स्थिर आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘सरकार पाडून दाखवाच’ असे भाजपला आव्हान दिले आहे, तर ‘तुम्ही सरकार चालवून दाखवा’ असे प्रतिआव्हान भाजपने दिले आहे. कुणाला ही दोघांतली नुरा कुस्ती वाटेल, पण तसे नाही. राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर झाल्याची त्याला किनार आहे. मुंबईत झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा रोख पाहिला, तर या पक्षात कमालीचा आत्मविश्वास दिसतो आहे. या उलट सत्ताधाऱ्यांना सरकार स्थिर असल्याचे वारंवार सांगावे लागते आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी तर स्वबळावर सरकार बनवण्याच्या तयारीला लागा, असे महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुटलेल्या युतीचे पुन्हा गोडवे गायण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्राने तर कमाल केली. दिवंगत अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येची चौकशी करणाऱ्या आपल्या सरकारवर अविश्वास दाखवला. हे प्रकरण केंद्राकडे सोपवण्याची त्याने मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे दिवस भरत आले की काय, असे वाटण्यासारखे चित्र उभे राहिले आहे. मंत्रालयात मंत्री बसत नाहीत आणि मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर येत नाहीत. मंत्रालयात नागरिकांना मज्जाव आहे. शासकीय कर्मचारी कार्यालयात येत नाहीत. दोन दोन आठवडे मंत्रिमंडळ बैठक होत नाही. दिवसात एक-दोन शासन निर्णय निघतात. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तिढा कायम आहे. मंत्र्यांचे रुसवेफुगवे सुरूच आहेत. जणू सरकार आला दिवस ढकलते आहे. सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आता सत्ताधाऱ्यांनाच वाटत नाही. परिणामी विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या खेळातली एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे कोण कोणाबरोबर जाणार? नव्या डावात भाजपबराेबर राष्ट्रवादी असेल की शिवसेना, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यातून महाराष्ट्र पुन्हा राजकीय उलथापालथीच्या दिशेने गेला, तर ती पाहण्याशिवाय सामान्य मतदारांच्या हाती मात्र काहीही असणार नाही.