आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:कवित्व पुरे; कामे करा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्त्या कधी होणार? हा विषय महाराष्ट्रात सध्या केंद्रस्थानी आहे. ठाकरे सरकार पाडले जाणार, त्यानंतर येणाऱ्या भाजपच्या सरकारला या नियुक्त्या करता याव्यात, यासाठी राजभवनाकडून त्याला विलंब केला जातो आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातून दोन अर्थ निघतात. भाजप खरोखर ठाकरे सरकार खाली खेचण्याच्या प्रयत्नात आहे आणि दुसरा म्हणजे, १२ आमदारांच्या नियुक्त्या लवकर व्हाव्यात, यासाठी राऊतांनी आरोपाची राळ उडवली असावी. खरे म्हणजे, १७० इतके संख्याबळ असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १०५ सदस्य संख्येच्या भाजपची इतकी धास्ती घ्यावी, हेच नवल आहे. बरे, राऊत एकटे बोलतात, असेही नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही हिच टेप लावली आहे. याचा अर्थ सरळ आहे, आघाडीच्या नेत्यांना आपल्या आमदारांवर भरवसा नाही. इतके घाबरणारे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ कसा पूर्ण करणार? महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात आहे. सामान्य रुग्णांना उपचार मिळत नाहीत. औषधे चढ्या दराने विकली जात आहेत. जनता सरकारकडे आशेने पाहते आहे, अशा काळात हे रडगाणे ऐकायचे काय? हे १२ आमदार आहेत विधान परिषदेचे. देशातल्या निम्म्या राज्यांना विधान परिषद नाही आणि त्यांचे काहीही अडले नाही. महाराष्ट्राच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे विधानसभेत ठाकरे सरकारला बहुमत आहे. मग १२ आमदारांमुळे काय घाेडे अडलेय? राज्यपालांकडून निवडल्या जाणाऱ्या या जागा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, लेखक, कलाकार, विचारवंत, समाजसेवक यांच्यासाठी आहेत. तरीही त्यासाठीची घालमेल न कळण्याइतके लोक अडाणी नाहीत. सरकारमध्ये अनेक एजंट असतात. त्यांचे या नियुक्त्यांत अडले असावे, अन्यथा एवढा आटापिटा झाला नसता. विधान परिषदेवर जायला एकतर जातीपातीचे समीकरण जुळायला हवे किंवा अमाप पैसा हवा. अशा आमदारकीचे बरेच लाभही असतात. त्यामुळे १२ आमदार नियुक्तीच्या चर्चा घडवल्या जातात. दुसरे म्हणजे, आघाडीतील पक्षांना आपले आमदार सांभाळता येत नसतील, तर असे सरकार कमकुवतच मानले पाहिजे. नावापुरते सरकार काय कामाचे? एक तर कामे करा, नाही तर पायउतार व्हा, असे या सरकारला सुनावण्याची वेळ आली आहे.

बातम्या आणखी आहेत...