आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:दूध माफियांची (?) दहशत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदी दर दहा रुपये कमी करण्याचा एकतर्फी निर्णय खासगी व सहकारी दूध डेअऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी घेतला. त्या विरोधात ना सरकारने कारवाई केली, ना शेतकऱ्यांच्या संघटनांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाच्या लुटीबाबत डाव्या-उजव्यांच्या कोणत्याच शेतकरी संघटनेने सुरुवातीला आवाज न उठवल्याने गळचेपी होत राहिली. आता एका संघटनेने बोंब उठवल्यानंतर सगळ्या संघटना, भाजप जागे झाले. हा प्रश्न केवळ कष्टाच्या शोषणाचा नाही तर शेतकऱ्याला कोंडीत दाबून सरकारला कात्रीत पकडत आर्थिक लाभ उकळण्याचा खासगी डेअरी मालकांचा संघटित डाव आहे. माफियांच्या टोळी‘सारखे’ हेे काम चालू आहे. भाजप-शिवसेना सत्तेत असताना देवेंद्र फडणवीसांचे सगळ्यांचा आत्मा शांत करण्याचे धोरण होते. ते करताना शेतकरी कसा मरतोय आणि खासगी डेअरीवाले कशी लूट करतात? याकडे त्यांचे बिलकुल लक्ष नव्हते. दूध उद्योगात आजपर्यंत जे घडले नाही ते फडणवीसांच्या काळात २०१८ मध्ये घडले. भर उन्हाळ्यात उत्पादन कमी होत असताना खासगीवाल्यांनी एकत्रित येऊन दुधाचे दर पाडले. तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. परवडत नाही, अशी हाकाटी ते मारत राहिले. त्यांचा हा दावा खरा की खोटा, हे तपासण्याच्या भानगडीत फडणवीस पडले नाहीत. खासगीवाल्यांना खुश करताना शेतकऱ्यांना हमीभावानुसार दर देण्याच्या अटीवर प्रक्रिया होणाऱ्या दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचे फडणवीसांनी सुरू केले. हे सांगायचे एवढ्यासाठी की, दोन वर्षांनंतर आता तोच खेळ चालू आहे. शिवाय सध्या तर दूध व्यवसायातल्या सहकाराचा खून करत खासगीवाल्यांना रान मोकळे करणारे नेतेच सत्तेमध्ये आहेत. त्यांच्यामुळे खासगी डेअऱ्या एवढ्या ताकदवान झाल्या आहेत, की त्यांनी सहकार संपवत आणला आहे. कोरोनामुळे आहे त्या दराने दूध खरेदी परवडत नाही, ही त्यांची हाकाटी आहे. वस्तुस्थिती अशी आहे ती आजच्या घडीलाही इंदापूर तालुक्यात सहकारी तत्त्वावर चालू असणारे अमूल २५ रुपये हमीभावाने दूध खरेदी करत आहे. अमूलला परवडते, तर मग खासगीवाल्यांना का नाही? दूध खरेदी दर त्यांनी एवढ्यासाठीच पाडले की शेतकऱ्यांच्या नावाने नाक दाबले की सरकार आपोआप अनुदानाबाबतचे निर्णय घेईल. आज ना उद्या तसा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. खरेदी दर कमी झाला तरी विक्री दर तेच आहेत, हे विशेष.