आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:साक्षात रसराज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही श्रेष्ठ कलावंताचं जाणं, हे त्यांच्या शिष्यांसाठी, कुटुंबीयांसाठी आणि रसिकांसाठी दु:खदायक असतेच, पण तो कलावंत जर कला क्षेत्रासाठी अनेक अर्थांनी ‘कॉन्ट्रिब्यूटर’ असेल, तर त्या ही वेदना अधिक गहिरी होते. पंडित जसराज यांच्या निधनानं भारतीय संगीतविश्वाने असे महान योगदान देणारा असामान्य कलावंत गमावला आहे. अभिजात भारतीय संगीत क्षेत्राचे ते खऱ्या अर्थाने संगीत मार्तंड होते. त्यांच्या मधुरोत्तम गायकीच्या रुपानं भारतीय अभिजात संगीताची कित्येक दालनं उजळून निघाली. मेवाती घराण्यात पं. जसराज यांचा जन्म झाला. बालपणीच पितृछत्र हरपले, पण वडील बंधूंनी त्यांना पित्याची माया देऊन कलेचा वारसा सोपवला. पूर्वायुष्यात उत्कृष्ट तबलावादक असणारे पंडितजी काहीसे उशिरा गायनाकडे वळले, ते केवळ जिद्दीने. जन्मजात प्रतिभा, विलक्षण सुरेल गळा, मधुर आवाजाची देणगी, त्यावर घराणेदार गायकीचे झालेले संस्कार, स्वत:च्या परिश्रमांनी, साधनारत राहून केलेली कलासेवा यातून जसराज यांची विलक्षण मोहिनी घालणारी मधुर आणि रसपूर्ण गायकी आकाराला आली. काव्यगुणांनी युक्त बंदिशींचे भांडार, ही मेवाती घराण्याची खासियत आहे. त्या बंदिशी जसराजांच्या कंठातून मूर्तिमंत माधुर्याने प्रकट होऊ लागल्या आणि त्यांच्या गायकीची लोकप्रियता वाढू लागली. अल्पावधीत त्यांना ‘रसराज’ अशी सार्थ उपाधी प्राप्त झाली. त्यांचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी सादरीकरणात कालानुरूप अनेक पूरक बदल घडवले. अर्थात असे बदल स्वीकारताना कलेचा मूळ गाभा अबाधित राहील, याची े काळजी घेतली. त्यामुळे बुजुर्गांसह नव्या, उभरत्या कलासाधकांशी ते सतत जोडलेले राहिले. ध्रुपद गायकी, प्रबंधगायन, ख्यालासह वेदऋचा, देवतास्तुतिपर संस्कृत स्तोत्रे, मंत्र, ऋतुसंगीत, हवेली संगीत.. या साऱ्या संगीतविधा त्यांनी आपल्या गायनाने समृद्ध केल्या. शिवाय, ‘गुरू’ म्हणून त्यांनी संगीताचा वारसा ताकदीने पुढे नेणारे अनेक गुणवान शिष्य घडवले. अभिजात संगीतात प्रयोगशीलता आणली. ‘जसरंगी जुगलबंदी’ हे त्याचे ठसठशीत उदाहरण आहे. आपल्या अलौकिक गायकीतून लोकरंजनासह आत्मरंजनाकडे नेणाऱ्या वाटा उजळवणाऱ्या पं. जसराजांना विनम्र अभिवादन!

बातम्या आणखी आहेत...