आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:बहुआयामी प्रतिभावंत

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

“रंगभूमीवरील वास्तव हे केवळ एक साधन आहे, साध्य नव्हे. साध्य आहे ती एक वेगळीच कलात्मक वास्तवता, जी जीवनाचे दर्शन एका कलात्मक पातळीवरून काही एका आशयाने समृद्ध करून घडवते,’ असे रत्नाकर मतकरींनी एका मुलाखतीत सांगितले होते. तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करून रत्नाकर मतकरी यांनी आता अखेरचा श्वास घेतला. विद्वान, विपुल, वैविध्यपूर्ण साहित्य लिहून आपल्या कलात्मक गुणवत्तेच्या, प्रयोगशीलतेच्या बळावर बालरंगभूमी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर संस्मरणीय नाटके सातत्याने लिहिणारा आणि ती दिग्दर्शित करून, वेळप्रसंगी पदराला खार लावून निर्मिती करणारा त्यांच्यासारखा नाटककार स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय स्तरावर कुणीही दिसत नाही. सुमारे साठ वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू, साहित्यिक, स्तंभलेखक, सामाजिक चळवळींतून सक्रिय सहभाग घेणारे जागले, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी प्रतिभावंत म्हणून परिचित असलेल्या रत्नाकर मतकरी यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. ३२ नाटके, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालनाट्ये आणि ३ कादंबऱ्या अशा ९० पेक्षा अधिक कलाकृती त्यांनी दिल्या. १९५५ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी रेडिओसाठी ‘वेडी माणसे’ ही श्रुतिका लिहून त्यांनी लेखनास प्रारंभ केला. तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत ते व्रतस्थपणे लिहीत होते. “विषय, आशय, शैली यांबाबत सतत प्रयोग करणाऱ्या मतकरी यांनी कुणाचेही अनुकरण केेले नाही. सतत नावीन्याचा शोध घेत राहिले. त्यांनी स्वत:चा कुठला मठ किंवा पंथ स्थापन केला नाही. अबोलपणाचा कुठला मुखवटा धारण करून किंवा स्तुतिपाठकांचे कोंडाळे करून स्वत:चेच वलय निर्माण केेले नाही. “लेखकाचा लेखकराव’ होणे हे त्यांच्याबाबतीत कधी घडलेच नाही; अन्यथा त्यांच्या रचनात्मक ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाला असता. म्हणूनच ते अनेक मुलाखतींत आवर्जून सांगायचे की, मला सतत एवढे सुचत असते की, ते मी कधी लिहिणार असा प्रश्न पडतो. त्यामुळेच मी सत्कार समारंभ, बक्षीस समारंभासारख्या कार्यक्रमांना जायचे टाळतो. तो वेळ मी लेखनासारख्या सर्जनशील कामाला देतो. गूढ कथा व मतकरी असे एक समीकरण तयार झाले होते. आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याशाच घटना वेचून कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणे, ही रत्नाकर मतकरींची खासियत होती. मात्र, गूढकथा आकृतिबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढ कथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही. सामाजिक भान, बांधिलकी या मूल्यसरणी जणू काही आउटडेटेड झाल्या आहेत, अस्तंगत होऊ घातल्या आहेत अशा विचारांचा दाबजोर वाढतानाच्या सद्य:काळातच मतकरींसारख्या ज्येष्ठ लेखकाच्या जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. ‘दिव्य मराठी’तर्फे रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण आदरांजली.    

बातम्या आणखी आहेत...