आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:अति घाई संकटात नेई...

दिव्य मराठी9 महिन्यांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

‘एनसीईआरटी’च्या शिशू वर्गापासून बारावीपर्यंतच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतच्या शिफारशींचा उघड्या डोळ्यांनी विचार केला तर काय भयावह शिफारसी आहेत, असे वाटते. शाळांच्या स्थितीबाबत शहर, गाव स्तरापर्यंत काय स्थिती आहे? शिफारशींचा प्रत्यक्ष अंमल कितपत होऊ शकतो? झालाच तर काय स्थिती निर्माण होऊ शकते, याचे भान ‘एनसीईआरटी’ मधील तज्ज्ञांना आहे का? बहुतांश शिफारशी विद्यार्थ्यांना, पालकांना संकटात टाकणाऱ्या आहेत. नववी ते बारावी ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची वर्षे. थोडीफार जाण असलेल्या या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याबाबत केंद्राने, राज्याने विचार करावा. ९० % प्राथमिक वा माध्यमिक शिक्षक शहरात राहतात. गावात येऊन शिकवताना त्यांच्यामुळे संसर्ग वाढला तर काय होईल? एक वेळ नववी ते बारावीचे विद्यार्थी सूचना पाळू शकतील, पण शिशू वर्गांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे धोक्याचे आहे. एका वेळी एका वर्गात निम्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची शिफारस आहे. बऱ्याच शाळांमधून एकेका वर्गात ७० ते ८० विद्यार्थी कोंबलेले असतात. त्यातले निम्मे म्हटले तरी ४० विद्यार्थ्यांना बसण्याइतके ४० बाक, मोठे वर्ग असणाऱ्या शाळा फारच थोड्या आहेत. विद्यार्थ्यांना साहित्याची देवघेव करू न देणे हे सरसगट शक्य नाही. विद्यार्थी वाहतुकीसाठी केलेल्या शिफारशींचा अंमल करायचा झाला तर पालकांना जास्त पैसे मोजावे लागतील. रिक्षांमध्ये तर मेंढरासारखे विद्यार्थी भरलेले असतात. चिकित्सा संरक्षक नेमण्याची शिफारस ही आदर्शवादी सूचना आहे. टीव्ही चॅनलद्वारे किंवा ऑनलाइन वर्ग चालवण्यासंदर्भात पंतप्रधानांनी भाष्य केले होते. पण शहर व खेडेगावतल्या बऱ्याचशा शाळांमध्ये त्यांचाही अंमल कठीण आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना ते तंत्र अवगत असल्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने आठवीपासून खालच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा विचार पहिल्या सत्रांनंतर स्थितीनुसार करावा. सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा, कर्ते-नाकर्तेपणाचा समजू नये. प्रश्न मुलांच्या आयुष्याचा आहे. एक वर्ष शिक्षणावाचून राहिलं तर बिघडत काही नाही. जगणं महत्त्वाचं आहे. उद्योगपती रतन टाटा यांचे एक वाक्य यासंदर्भात महत्त्वाचे आहे. २०२० हे वर्ष आलेच नाही, असे समजून २०२१ साल सुरू करण्याविषयी ते बोलतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकारने हा विचार करावाच. नाही तर “अति घाई संकटात नेई” अशी अवस्था होईल. 

बातम्या आणखी आहेत...