आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:सोनियांची काँग्रेस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा पक्षाची धुरा देण्यात आली. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडून वर्ष झाले. बिहार निवडणुकांच्या मुहूर्तावर राहुल यांनी पुन्हा या पदावर यावे, अशी पक्षातील बहुतेकांची मनीषा होती. पण, राहुल तयार नाहीत. आता बिहार निवडणुकीनंतर त्यांचे पुनरागमन होईल. काँग्रेसच्या या बैठकीत अपेक्षित तेच झाले. अर्थात काँग्रेसमध्ये बुजुर्ग अन् तरुण असा संघर्ष आहेच. त्याची किनार ‘त्या’ २३ नेत्यांच्या पत्राला होती. काहींना तो ‘लेटर बॉम्ब’ वाटतो, काही त्याला लोकशाही प्रक्रियेतील जिवंतपणा म्हणतात. काँग्रेसच्या बैठकीत केवळ पक्षाध्यक्षपदावर चर्चा झाली नाही. टाळेबंदीतील प्रवासी मजुरांच्या हालअपेष्टा, बेरोजगारी, कोराेनाकाळात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांअभावी गेलेले बळी, मोदी सरकारकडून बहुलतेवर होत असलेले हल्ले आदींवरही चर्चा झाली. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, यापेक्षा हे फार महत्त्वाचे आहे. कदाचित भाजपमध्ये जशी एकचालकानुवर्ती नेतृत्वाची प्रथा पडली आहे, तसे काँग्रेसमध्ये काहींना अपेक्षित असावे. तसे होत नाही, यातच काँग्रेसचे वेगळेपण आहे. विचार मांडण्याची संधी नाकारणे, हे विषमतेइतकेच क्रूर असते. काँग्रेसमध्ये तो अवकाश अजूनही आहे. म्हणून २३ नेत्यांना पक्षनेतृत्वाला काही सुनावण्याची, सुचवण्याची छाती झाली असावी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या काँग्रेसने देशाला सात पंतप्रधान दिले. ४९ वर्षे देश चालवला. सहा वेळा स्वबळावर, तर चार वेळा आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आजही तळातल्या जाती, अल्पसंख्य, दारिद्ररेषेखालील जनता, शेतकऱ्यांना काँग्रेसमध्ये आपले भविष्य दिसते. मतभेद आणि वाद जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला ती संधी दिलीच पाहिजे. काँग्रेसमधल्या बुजुर्ग अन् तरुण नेतृत्वातील मंथन देशासाठीही हिताचे ठरेल. काँग्रेस सर्वांना सामावून घेणाऱ्या सागराप्रमाणे आहे. सध्या कॉँग्रेस सोनियांची आहे. तरीही पक्षाला पुढच्या सहा महिन्यांत नवा नेता मिळण्याची अाशा आहे. शेवटी विरोधी पक्ष या नात्याने १३० कोटी लोकांचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी काँग्रेसवरच आहे.