आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:दोन्ही कर जोडुनी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या देशात कर प्रणाली सुटसुटीत तो देश उत्तम मानला जातो. सुटसुटीतपणाला पारदर्शकतेची जोड मिळाली तर कर भरण्यासाठी नागरिक खिशातून रक्कम देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हे झाले अर्थशास्त्रातील तत्त्वज्ञान. ते प्रत्यक्षात उतरवणे भल्या भल्या देशांना शक्य झालेले नाही. भारताने आता त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उशिरा का असेना, पण आपण सुटसुटीत, पारदर्शक कर प्रणालीकडे जातो आहोत हे प्रामाणिक करदात्यांसाठी दिलासादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी पारदर्शक कर व्यवस्था- इमानदारांचा सन्मान असा नवा प्लॅटफॉर्म सादर केला. यात फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर चार्टर असे तीन प्रमुख रिफॉर्म आहेत. यापैकी फेसलेस अपील ही व्यवस्था २५ सप्टेंबरपासून लागू होणार आहे, इतर दोन १३ ऑगस्टपासूनच लागू झाल्या आहेत. पूर्वीच्या व्यवस्थेत लागेबांधे, जुगाड, गुंतलेले हितसंबंध, दबाव तंत्र आदी मार्गांनी कर भरण्याची इच्छा नसलेले पळ‌वाटा शोधत. त्यावर फेसलेस असेसमेंट उपयुक्त ठरणार आहे. यात तुम्ही ज्या शहरांतून रिटर्न फाइल करत आहात, तिथला प्राप्तिकर अधिकारी तुमची केस पाहणार नाही, तर संगणकीकृत प्रणालीद्वारे देशभरातील अन्य अधिकाऱ्याकडे तुमचे प्रकरण जाईल. यामुळे अधिकाऱ्यांकडून करदात्याला होणारा त्रास वाचणार आहे. करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करणे, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम टॅक्सपेयर चार्टरद्वारे होईल. कराबाबत काही आक्षेप असतील, शंका असतील तर अपील करता येते. मात्र हे अपील करणारा रदाता आणि अपिलावर काम करणारा अधिकारी एकमेकांना ओळखत असतील तर करचुकवेगिरीला वाव मिळतो. आता २५ सप्टेंबरपासून फेसलेस अपील लागू झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया संगणकीकृत राहील. अपील करणारा कोण आणि अधिकारी कोण हे एकमेकांना कळणार नाही. नवी कर व्यवस्था प्रामाणिक करदात्याला नैतिक पाठबळ देणारी, नव्या करदात्याला प्रोत्साहित करणारी आणि जुन्या पळ‌वाटा बंद करणारी ठरेल, अशी आशा आहे. असे झाले तर देशातील प्रामाणिक करदाते या व्यवस्थेला दोन्ही कर जोडुनी सलाम करतील यात शंका नसावी.

बातम्या आणखी आहेत...