आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:जातीचा ‘पत्ता’ कट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“नावात काय आहे?’ या शेक्सपिअरच्या विधानाच्या नेमकी विपरित परिस्थिती नेहमी आपल्या भोवताली दिसते. स्वतंत्र अस्तित्वाला तिलांजली देत व्यक्तीच्या पहिल्या नावापेक्षा आडनाव, प्रसंगी मधले नाव यालाच अवास्तव महत्त्व देण्याचा बुरसटलेपणा आपण सोडला नाही. फक्त व्यक्तीच नाही, तर तिच्या अधिवासालाही जातींच्या जोखडात करकचून बांधले गेले. जातीच्या उतरंडीवर रचलेल्या समाजव्यवस्थेत वाड्या-वस्त्यांची रचनाही जातनिहाय झाली आणि “जात नाही ती जात’ या उक्तीच्या भळभळत्या खुणा कित्येक गावे अंगावर मिरवत राहिली. एखादी व्यक्ती कोणत्या जातीत जन्माला येते यावरच नाही, तर ती कोणत्या वाडी-वस्तीत वाढते यावर तिच्या सामाजिक स्थितीचे मोजमाप होत राहिले. जाती निर्मूलनाच्या सामाजिक सुधारणा झाल्या, पण जातनिहाय गावगाडा निवासी पत्त्यांवर आणि लोकांच्या मनामनात कायमचा घर करून राहिला होता. सांस्कृतिक समारंभापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत, सामाजिक विभाजनापासून व्यक्तिगत आकांक्षांपर्यंत सोयी-गैरसोयीचा खेळ खेळत राहिला. माणूस म्हणून समाजाला संघटित करण्याऐवजी माणसामाणसात दुफळी माजवत संघर्षाची बीजे पेरत राहिला. म्हणूनच वाड्या- वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय महत्त्वाची ऐतिहासिक सुधारणा आहे. तो जातीवादी समाजरचनेचा पुरावा पुसणारा, विषमता मानणाऱ्या मानसिकतेतून बाहेर पडत व्यक्तिस्वातंत्र्याची संधी देणारा आणि सामाजिक सलोखा वाढविणारा आहे. सामाजिक न्यायाची आणि समतेची लढाई एका रात्रीची नसते. सामाजिक परिवर्तनाच्या या अंधाऱ्या वाटेवर अशी एकेक पणतीही महत्त्वाची ठरते. वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्राचा लौकिक वाढवणारा आहे. त्यासाठी समता नगर, क्रांती नगर, भीम नगर, शाहू नगर, ज्योती नगर हे पर्यायही शासनाने सुचविले आहेत. अर्थात, महापुरुषांनाही जातींच्या जोखडात बांधून ठेवणाऱ्या आजच्या समाजात ही पर्यायी नावेही जातनिहाय वस्त्यांची ओळख ठरू नयेत. त्याउलट महापुरुषांच्या विचारांच्या आणि कर्तृत्वाच्या थोरवीनुसार मानवतेच्या तत्त्वावर आधारलेली आधुनिकतेची नगरे बनावीत, हीच अपेक्षा. अन्यथा, प्रतिकात्मक अस्मितावादी राजकारणात यातील सामाजिक परिवर्तनाचे सूत्र मागे पडून प्रतिक्रियावादी प्रवृत्तींना संधी मिळेल आणि मानवतेचा विचार पुन्हा मागे पडेल. तसे होऊ न देणे, हीच या निर्णयाच्या अंमलबजावणीतील कसोटी असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser