आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:कुरघोड्यांचा हिशेब चुकता

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • माताेश्री अन् राजभवन यांच्यात नोव्हेंबर 2019 पासून सुप्त संघर्ष आहे

कोरोना सर्वत्र पाय पसरतो आहे. महाराष्ट्र मात्र राजकारणात दंग आहे. अशी चर्चा होण्यास निमित्त झाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजभवनावरच्या बैठकीची गैरहजेरी. साहजिक आहे, मुख्यमंत्री महत्त्वाच्या कामात व्यग्र असतील. पण, त्या दिवशी त्यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता आणि मुख्यमंत्र्यांसाठी राजभवनापेक्षा काहीही मोठे असू शकत नाही. याचा अर्थ उद्धव यांनी ठरवून राजभवनाच्या बैठकीकडे पाठ फिरवली. पण, इतक्यावर थांबेल तो मराठा गडी कसला? बैठक कोरोना उपाययोजनांसंदर्भात होती, मग आरोग्यमंत्र्यांना बैठकीला जाण्यास मुख्यमंत्री सांगू शकले असते. मुंबईच्या पालकमंत्र्यास किंवा राजशिष्टाचार मंत्र्यास पाठवू शकले असते, पण नाही. मुख्यमंत्र्यांनी चक्क आपल्या स्वीय सहायकाला प्रतिनिधी म्हणून पाठवले; जो मंत्रीच काय, साधा आमदारही नाही. आश्चर्य म्हणजे, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आणि अतिरिक्त सचिव हे दोघे त्या बैठकीला नव्हते. बैठकीदिवशी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाने ते येतील असा निरोप राजभवनाला दिला होता. संध्याकाळी राज्यपाल बैठकीत सांगतात की, मुख्यमंत्री येऊ शकत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी चक्क कात्रजचा घाट दाखवला. भाजप नेत्यांच्या तालावर राजभवन डोलते, असा उद्धव यांचा आरोप आहे. तो खरा आहे. म्हणजे बघा, मंगळवारी देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटतात. त्याच दिवशी बैठकीचे सरकारला फर्मान निघते. फडणवीस यांनी ज्या मागण्या केल्या, त्याच मागण्यांचे निर्देश राज्यपाल उद्धव सरकारला बैठकीत देतात, हा काही निव्वळ योगायोग नाही. मुळात माताेश्री अन् राजभवन यांच्यात नोव्हेंबर २०१९ पासून सुप्त संघर्ष आहे. म्हणजे सत्तास्थापनेसाठी तिन्ही पक्षांच्या वतीने शिवसेना नेते राजभवनावर गेले हाेते, तेव्हा तिथे बरेच घडले-बिघडले होते. उद्धव यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार करण्याची शिफारस राजभवनाने डावलली. परप्रांतीय मजुरांच्या पाठवणीसंदर्भात राजभवनने प्रशासनाला परस्पर निर्देश दिले. ती सल उद्धव यांच्या मनात असावी. म्हणून त्यांनी बैठकीला गैरहजेरी लावत राजभवनाला संदेश दिला आहे. मुख्यमंत्री उर्मट आहेत का, तर नाहीत. उद्दाम आहेत का, नाहीत. पण, ते धूर्त नक्की आहेत. हिशेब चुकवण्यात ते चुकत नाहीत. ते ‘जोर का झटका धीरे से’ देतात. किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांना तो माहिती आहे. उद्धव यांना राज्यपाल या घटनात्मक संस्थेचा अवमान करायचा होता का, तर नाही. त्यांचा राग इतकाच आहे, राजभवन हे भाजपच्या इशाऱ्यावर चालते. फडणवीस इतक्यांदा शिष्टमंडळ घेऊन जातात की त्यांना राजभवनामध्ये खोली द्या, असे म्हणण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. आणि हे सर्व सात्त्विक, पुरोगामी अशा महाराष्ट्र भूमीत घडते आहे. या वादाचा अन्वयार्थ इतकाच, भाजप आणि शिवसेना यांच्यात इतके बिनसलेय की उद्धव यांचे परतीचे दोर कापले गेलेत. म्हणजे अंतिमत: भाजपचाच पाय खोलात गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...