आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:अखेर ‘कॅप्टन’ मैदानावर...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावचा कारभारी चावडीत बसला की गावाला आधार असतो. कुठलीही संघटना वा सरकारचेही असेच असते. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याला अपवाद ठरले. ते मार्चपासून केवळ दोन वेळा मुंबईबाहेर पडले. जूनच्या सुरुवातीला अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते गेले. त्यानंतर एक जुलैला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरीला गेले. मुख्यमंत्र्याचा जनतेशी संपर्कच नसेल तर मग त्यांच्या पीडा तरी कशा समजणार? शरद पवारांनी बोलता-बोलता कान टोचल्यावर मुख्यमंत्री गुरुवारी पुणे दौऱ्यावर गेले. तेथे अधिकाऱ्यांसमवेत कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. प्रशासनाला काही सूचनाही केल्या. महाराष्ट्र १३ कोटी जनतेचा आहे, पण अलीकडे मुख्यमंत्री व शिवसेना यांच्यासाठी तो मुंबई आणि ठाण्यापुरताच आहे की काय, असे चित्र निर्माण झाले होते. ठाकरे मुख्यमंत्री कमी आणि शिवसेना पक्षप्रमुख अधिक भासतात आणि कदाचित त्यामुळेच ते ‘मातोश्री’तून बाहेर पडत नसावेत. विधिमंडळात आल्यावर ते सभागृहाचे नेते असले तरी सरकार म्हणून वैधानिक गोष्टींची आपल्यावर जबाबदारी आहे, हेच जणू ते विसरतात. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी तरी मेळघाटात जाऊन कुपोषणाचा प्रश्न समजून घ्यावा, गडचिरोलीत पोहोचून नक्षलग्रस्तांचे दुखणे ऐकून घ्यावे, यवतमाळमध्ये जाऊन शेतकरी आत्महत्यांची कारणे, त्यामागची वेदना जाणून घ्यावी. जनतेला भेटण्यासाठी इंदिरा गांधी म्हणे बरेलीला हत्तीवर बसून गेल्या होत्या. उद्धव यांच्याकडून ती अपेक्षा नाही, पण त्यांनी किमान ‘मातोश्री’बाहेर पडावे. मंत्रालयात बसावे, राज्याच्या हिताचे निर्णय करावेत आणि तब्येत सांभाळून लोकांमध्ये जात या संकटसमयी त्यांना दिलासा द्यावा, इतकी स्वाभाविक अपेक्षा आहे. संघातील खेळाडू फिल्डवर आहेत म्हणून कॅप्टनला कायम तंबूत बसून राहता येत नाही. वेळ पडली की मैदानात उतरण्याची तयारी ठेवावी लागते. त्यातही सत्तेच्या खेळात तर गुगली, यॉर्कर, ‘इन’कटर, ‘आउट’कटर एकाच वेळी अंगावर येऊ लागतात. अशात खेळपट्टीवर टिकून राहायचे तर संकटांचे चेंडू लीलया फटकावत ‘धावा’ काढाव्याच लागतात. एका जागी बसून त्या निघत नाहीत. उद्धव यांना हे उशिरा का होईना, पण समजले असावे, असे मानायला हरकत नाही.