आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:संकटावर ठेवून पाय...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निराशेचे मळभ दाट होत असताना अवतीभवती काही आश्वासक, दिलासादायक गोष्टीही घडत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकालही असाच संकटावर पाय रोवत पुढे आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयोगाने नागरी सेवेसाठी मुख्य परीक्षा घेतली. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यावर्षी फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात घेण्यात आली. त्यातून ८२९ उमेदवार भारतीय प्रशासकीय आणि पोलिस सेवेसह विविध सेवांसाठी निवडले गेले आहेत. महाराष्ट्रासाठी हा निकाल उत्साह वाढवणारा आहे. राज्यातील जवळपास पन्नास मुला-मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. त्यातही मराठवाड्यातील मुलांचा वधारलेला टक्का लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील तरुणांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढत असलेला कल आणि त्यासाठी ते करत असलेले सातत्यपूर्ण कठोर परिश्रम यांमुळे शिक्षणाची मोठी पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील मुलेही या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत आहेत. शिक्षणाच्या खर्चिक वाटा तुडवूनही चांगल्या नोकरीपासून वंचित राहणाऱ्या तरुणांसाठी ही बाब प्रेरणादायी आहे. लोकसेवा आयोगाची यंदाची ही परीक्षा उमेदवारांसाठी वेगळी होती. कारण मुख्य परीक्षेचा निकाल आल्यानंतर मुलाखती होण्याच्या काळातच देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. नैराश्य दाटलेल्या, चिंतेने ग्रासलेल्या या काळात मनोबल टिकवून ठेवत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढच्या चाचण्यांची तयारी केली. कुटुंब, समाज आणि देश अशा पातळ्यांवर मोठ्या संकटाशी सुरू असलेली लढाई ते या काळात अनुभवत होते. कसोटीच्या प्रसंगांना सामोरे जाताना काय करावे आणि काय टाळावे, याची जणू अप्रत्यक्ष शिकवणीच त्यांना मिळत होती. त्यामुळे एका अर्थाने ही तुकडी केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही कोरोनाचा संक्रमणकाळ पार करून लोकसेवेसाठी सिद्ध होत आहे, महामारीच्या भीतीला हरवून ती पुढे निघाली आहे. महसूल, पोलिस, परराष्ट्र सेवेतील किंवा वन अधिकारी म्हणून उद्या हे ‘योद्धे’ कामाला लागतील, ‘फिल्ड’वर उतरतील तेव्हा त्यांचे मनोधैर्य उंचावलेले असेल. या साऱ्यांना शुभेच्छा देताना; उमेद, उत्साह अन् ऊर्जेने भारलेल्या अशा अधिकाऱ्यांच्या रूपाने देशाला सक्षम, गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देणारे पर्व अवतरेल, अशी अपेक्षा करूया.

बातम्या आणखी आहेत...