आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:अमेरिकनांची परीक्षा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशांतून येणाऱ्या लोकांमुळे नोकरी गमावत असलेल्या अमेरिकी मध्यमवर्गीय लोकांसाठी ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी २०२० ची निवडणूक मात्र तितकी सोपी राहिलेली नाही. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, बिडेन यांनी रिपब्लिकन उमेदवार असलेल्या ट्रम्प यांच्यावर ७.८ टक्क्यांची मजबूत आघाडी घेतली आहे. पुढची चार वर्षे व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्पच राहतील की बिडेन यांना संधी मि‌ळेल, याचा अंतिम फैसला अमेरिकेचे मतदार आज करणार आहेत. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ट्रम्प यांचा आततायीपणा , टोकाचा राष्ट्रवाद, विभाजनवादी नीती यांचे वेळोवेळी दर्शन झाले. पोस्टल मतांवर अविश्वास दाखवण्याबरोबरच निकाल लागायला खूप वेळ लागेल, त्यामुळे अमेरिकेत अराजक माजेल, अशी वक्तव्ये ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान केली. विभाजनवादाचा त्यांना राजकीय फायदाही मिळाला. पण, कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि ट्रम्प यांचे गणित बिघडत गेले. मास्क, लॉकडाऊन, फिजिकल डिस्टन्सिंगची त्यांनी खिल्ली उडवली. त्यामुळे कोरोना थोपवण्यात ते अपयशी ठरल्याचे अमेरिकनांचे मत बनले. तथापि, अर्थचक्राला गती देण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारांची सहानुभूतीही त्यांच्या बाजूने आहे. बराक ओबामा यांच्या काळात अमेरिकेचे उपाध्यक्ष राहिलेल्या बिडेन यांची गणिते यामुळ‌े बिघडू शकतात. तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था विक्रमी ३३ टक्क्यांनी वाढली. ट्रम्प यांनी प्रचारात या मुद्द्यावर जोर दिला. तर, कोरोना संसर्ग रोखण्यातील अपयशावर बिडेन यांचा भर राहिला. वंशवादाचा मुद्दाही त्यांनी प्रचारात सातत्याने आणला. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत वंशवादाच्या विरोधात लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरु शकतो. जागतिक नेतृत्व कमालीचे अहंमन्य, आत्ममग्न आणि एककल्ली झाले असताना अमेरिकेचे मतदार आपल्या देशाला कोणत्या मार्गाने नेतात, यावर केवळ त्या देशाचेच नाही, तर जगाचेही भवितव्य अवलंबून असेल. एका अर्थाने ही सर्वात जुन्या लोकशाहीतील नागरिकांचीच परीक्षा आहे.