आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख :मध्यममार्गी चित्रयुगाचा राजा

दिव्यमराठीएका महिन्यापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

चित्रपट हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे, याची जाणीव असणाऱ्या मोजक्या दिग्दर्शकांत बासू चटर्जींचा समावेश करावा लागेल. रंजनासोबतच अंजन देण्याचे काम बासूदांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून केले. मध्यमवर्गीयांच्या जीवनातील प्रेम, मत्सर, असूया, माया, ममता, वात्सल्य, विनोद यावर बासूदांचे चित्रपट खुसखुशीत भाष्य करतात. सर्वसामान्यांच्या जीवनातील संकटे, त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, तत्कालीन संयुक्त कुटुंब पद्धती, त्यावेळच्या महानगरातील मध्यमवर्गाचे जगणे त्यांनी रुपेरी पडद्यावर आणले. बासूदा सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टीत आले. तत्पूर्वी ते एका साप्ताहिकात कार्टूनिस्ट होते. समाजातील व्यंग टिपण्याची कला त्यांना अवगत होतीच. रूपेरी पडद्यावर बासूदांची ही कला विशेष फुलली. महिलांचे भावविश्व, त्यांच्या समस्या, प्रेम, कुटुंबवत्सलपणा आणि समर्पण हेही बासूदांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य. मध्यमवर्ग आणि महिलांचे विश्व रूपेरी पडद्यावर मांडणाऱ्या बासूदांना मध्यममार्गी चित्रपटांचा जनक म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘मिडल ऑफ द रोड सिनेमा’चे आगळे विश्व बासूदांनी रसिकांसमोर आणले. शैलेंद्र यांच्या ‘तिसरी कसम’साठी ते दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे सहायक होते. काही काळ ते ऋषीकेश मुखर्जी यांचेही सहायक होते. दोन बंगाली दिग्गजांच्या तालमीत तयार झालेल्या बासूदांनी मग ‘सारा आकाश’द्वारे स्वतंत्रपणे पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकाराचा पुरस्कार मिळाला, पुढे पुरस्कार आणि बासूदा हे समीकरणच बनले. त्यानंतर आलेल्या ‘पिया का घर’मध्ये त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील नवविवाहित जोडप्याची कुचंबणा मांडत सर्वांचे लक्ष वेधले. १९७४ मध्ये आलेला ‘रजनीगंधा’ हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट. यात त्यांनी वर्तमान आणि भूतकाळाशी लढणाऱ्या सर्वसामान्य तरुणीची मानसिकता दर्शवली होती. ‘चितचोर’मधून त्यांनी अस्सल ग्रामीण भागातील निरागस प्रेमकथा मांडली, तर ‘छोटी सी बात’मधून प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाची कथा मांडली. ‘खट्टा मीठा’मधून शेजारी राहणाऱ्या दोन पारशी कुटुंबातील संघर्ष आणि प्रेम त्यांनी उत्तमरीत्या टिपले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांतील गीत-संगीत गाजले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. आजही बासूदांच्या चित्रपटातील गाणी तरुणाईच्या ओठावर आहेत. चित्रपटांच्या ग्लॅमरस जगात मध्यमवर्गाला मानाचे स्थान देणाऱ्या बासूदांना विसरणे केवळ अशक्यच.

0