आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पुन्हा एकदा ‘मिनी भोपाळ’...

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • भोपाळ गॅस दुर्घटना हा भूतकाळ झाला, म्हणून सोडून देण्यासारखा मुद्दा नाही

भोपाळ गॅस दुर्घटना हा भूतकाळ झाला, म्हणून सोडून देण्यासारखा मुद्दा नाही. त्यातून भविष्यातील सुरक्षेच्या अनुषंगाने फारसे प्रयत्न होताना दिसतात का, हा खरा चिंतनाचा मुद्दा अाहे. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर जगभर जेथे रासायनिक व घातक कचरा आहे, तेथे त्याचे व्यवस्थापन केले जातेे. कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जातेे. पर्यावरण व्यवस्थापनाचे कायदे अधिक मजबूत होत आहेत. त्यामुळे औद्योगिक कचऱ्याच्या व्यवस्थापनात मोठा फरक पडला. कदाचित त्यामुळे भोपाळ दुर्घटनेनंतर अशा पद्धतीची भयानक व मानवी संहार करणारी दुर्घटना घडलेली नाही. भारतात मात्र सातत्याने छोट्या-मोठ्या औद्योगिक दुर्घटना घडत असतात आणि प्रत्येक वेळी आपण त्या घटनेला ‘मिनी भोपाळ’ असे म्हणतो आणि पुढे सरकतो. विशाखापट्टणम येथील आरआर वेंकटपुरमजवळ गुरुवारी झालेली वायुगळती ही त्याच मालिकेतील पुढची घटना. येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत मध्यरात्री ३ वाजता विषारी वायुगळतीला सुरुवात झाली आणि आजूबाजूची काही गावे त्याने वेढली. ११ पेक्षा अधिक मृत्यू आणि एक हजारपेक्षा अधिक लोकांना डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले, हे पाहता भोपाळ वायू दुर्घटनेनंतरची ही भारतातली दुसरी मोठी वायुगळती म्हणता येईल. सकाळ झाली तसे घटनेचे गांभीर्य लक्षात अालेे. हा विषारी प्राणघातक वायू जड असल्याने तो हवेमध्ये काहीसा खालच्या पातळीवर स्थिरावत होता. त्यामुळे लहान मुले, स्त्रिया आणि कमी उंचीचे लोक या वायूचे पहिले भक्ष्य ठरले. जो श्वास घेऊन माणूस जिवंत राहतो तो श्वासच मृत्यूचे कारण ठरला. एकीकडे विशाखापट्टणममध्ये काेरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या आणि आता वायुगळती याचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवली. मात्र हे सगळे प्रयत्न वरातीमागून घोडे ठरावेत. औद्योगिक विकास गरजेचा आहेच, परंतु त्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. आपल्या देशात रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूंचे ज्वालामुखीच बनले आहेत. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. विषारी रसायने जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण अाणण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. विषारी वायूंची विल्हेवाट, विषारी कचऱ्याचे विघटन यासारखे गंभीर विषयही आपल्या व्यवस्थेत सर्रास दुर्लक्षिले जातात. ही मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे. देशभरात जितके विविध प्रकारचे कारखाने, उद्योग कार्यरत आहेत त्यांची सुरक्षितता किती आणि कशा पद्धतीची आहे हे तपासून पाहण्याची यंत्रणा विकसित व्हायला हवी. तीन दशकांपूर्वी घडून गेलेल्या भोपाळमधील विषारी वायुगळतीनंतर आपण कधी बोध घ्यायला शिकणार? अन्यथा भोपाळ ते तारापूर आणि भोपाळ ते विशाखापट्टणम असा प्रवास सुरूच राहील.

बातम्या आणखी आहेत...