आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:जात्यातले अन् सुपातले

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेश स्वतंत्र केला, त्या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष एकीकडे साजरे होत आहे. दुसरीकडे, बांगलादेशाशी भाषिक, भावनिक नाळ जोडलेल्या वंगभूमीतून विद्यमान केंद्र सरकारच्या विरोधातील आवाज तीव्र झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील संघर्ष सारा देश पाहतो आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही करून बंगालची सत्ता हस्तगत करायचीच, असा जणू चंग भाजपने बांधला आहे. बिहारसह अलीकडच्या निवडणुकांतील यशामुळे या पक्षाचा अश्व पुन्हा चौखूर उधळला आहे. परिणामी भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांतील, त्यांच्या सरकारांमधील कुरघोड्या वाढल्या आहेत. हा खेळ फक्त राजकीय स्वरूपाचा नाही, तर प्रशासकीय पातळीवरही तो सुरू आहे. आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या अखत्यारित बोलावून केंद्र सरकार राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप परवा ममतांनी केला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून दाखवाच, असे आव्हानही भाजपला दिले. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून होणाऱ्या ‘सोयी’च्या नेमणुकांचे कारण त्यांच्या या आरोपामागे असल्याचे बोलले जाते. भाजप अशा अधिकाऱ्यांना आणून निवडणुकांची ‘बेगमी’ करत असल्याचीही चर्चा आहे. मात्र, भाजपच्या कारनाम्यांवर झोड उठवणाऱ्या ममतांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या करामतीही कमी नाहीत. राज्यात अराजकाची स्थिती निर्माण होण्यास तिथला एककल्ली कारभारही कारणीभूत आहेच. किंबहुना ममता स्वत:च भाजपला राष्ट्रपती राजवटीसारखे पाऊल उचलण्यास अनुकूल वातावरण तयार करत आहेत. वास्तविक विरोधी सरकार असलेल्या राज्यांना केंद्रातील भाजप सरकार कशी वागणूक देते, याचा अनुभव महाराष्ट्रासह अनेक राज्यांना वेळोवेळी येतो आहे. त्या राज्यांमध्येही असंतोष आहेच. असे असले तरी केंद्र आणि राज्यातील कुणा एकाकडून होणारा अधिकारांचा अतिरेकी वापर किंवा त्यांचे केंद्रीकरण या दोघांमधील चांगल्या संबंधांसाठी घातक ठरते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी परस्परांच्या अधिकार कक्षेचा आदर ठेवायला हवा. राज्यांनीही सततच्या संघर्षापेक्षा सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. जात्यात असलेल्या बंगालकडून सुपातील राज्यांनी एवढा तरी धडा घ्यायला हवा. जात्याचा दांडा हाती असलेले तो घेतील, तो सुदिन.

बातम्या आणखी आहेत...