आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:चीनच्या कुरापती

दिव्य मराठीएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

भारत दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूविरुद्ध लढतोय. पाकिस्तानच्या सीमेवर व काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी संघर्ष सतत चालूच असतो. दोन आघाड्यांवर लढत असतानाच चीन भारताच्या कुरापती काढण्याचा उद्योग जोरात वाढवतोय. लडाखला खेटून असलेल्या सीमेवर सैन्याची जमवाजमव करतोय. हे सुरू असताना चीनच्या प्रभावाखाली असलेल्या नेपाळनेही भारताविरुद्ध सीमाभागावरून गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी डोकलाममध्ये तणाव निर्माण झाला होता. भारत, चीनचे सैन्य ८२ दिवस समोरासमोर उभे होते. आता तीच स्थिती लडाखमध्ये सध्या आहे. चिनी कारवायांमागे कारणांचे अनेक कंगोरे आहेत. आता निमित्त झाले हे भारताने सुरू केलेल्या रस्ते बांधणीचे. भारत-चीनच्या ३४८८ किलोमीटर सीमेजवळ ६६ रस्ते भारताला बांधायचे आहे. चीनचा त्याला विरोध आहे. वास्तविक जिथे संघर्ष चालू आहे त्या गल्व्हान व्हॅलीच्या जवळूनच चीनचा चार लेनचा रस्ता जातो. आम्ही आमच्या हद्दीत रस्ते बांधणार. भारताने रस्ते वा कोणतेच बांधकाम करायचे नाही, असा चीनचा पवित्रा आहे. आणखीन एक चिंता चीनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारिणीचे नेतृत्व आता भारताकडे आले आहे. कोरोनाविरुद्ध जग चीनच्या विरोधात एकवटत असताना चीनसाठी हे डोकेदुखीची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाला निर्णय घेताना कार्यकारिणीच्या अध्यक्षाला माहिती द्यावी लागणार. चीनसाठी ही डोकेदुखी आहे. भारताने तेथे गप्प बसावे, अशी चीनची अपेक्षा आहे. सगळे जग कोरोनाविरुद्ध लढत असताना आणि आर्थिक कंबरडे मोडले असताना चीनने वेगवेगळ्या आघाड्यांवर कारवाया करत जगातल्या सर्व शक्तींना, विशेषत: अमेरिकेच्या दादागिरीला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण चीन समुद्र, तैवान व हाँगकाँगसंदर्भात चीनने आक्रमक पावले टाकली आहेत. चीनविरुद्धच्या सीमावादात भारताला लष्करी संघर्षाची तयारी ठेवावी लागेलच. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनवर राजनैतिक दबाव आणावा लागेल. अमेरिकाही कोरोनाविरुद्ध लढत असतानाच तिथे वर्षाअखेरीस होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची गडबड सुरू आहे. ट्रम्प यांनी भारत-चीनच्या वादात मध्यस्थीची तयारी दाखवली. ट्रम्प हे भाष्य करत असतानाच चीनने हाँगकाँगवरील पकड मजबूत करणारा कायदा केला. अशा स्थितीत ट्रम्प यांची मध्यस्थी कितपत कामाला येईल, ही शंकाच आहे.

बातम्या आणखी आहेत...