आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘महाभारत’ हवे की महान भारत?

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • ‘मत’लबी आणि ‘मन’मानी राजकारणातून घडणारे ‘महाभारत’ या देशाला नवे नाही

दूरदर्शनवर सुरू असलेल्या महाभारतात युद्धाचा शंख फुंकला गेला आहे. एकीकडे भीष्म आणि अर्जुन यांच्यात घमासान सुरू असताना संजयाच्या डोळ्यांनी युद्ध पाहणारा धृतराष्ट्र कौरवांच्या हानीमुळे अस्वस्थ झाला आहे. अशातच गांधारीला आपले सगळे पुत्र मृत्युमुखी पडल्याचा संकेत देणारे स्वप्न पडते आणि ते ऐकून धृतराष्ट्र हादरतो. त्याच्या चेहऱ्यावरील अहंमन्यतेचा रंग उडू लागतो. पण, त्याला आता हे दुःस्वप्न खोटे ठरवणे शक्य नाही. श्रीकृष्णापासून विदुरापर्यंत आणि भीष्मापासून गांधारीपर्यंत सगळ्यांच्या आर्जवाकडे त्याने दुर्लक्ष केल्यानेच हा समर प्रसंग ओढवला आहे...

युद्धाचा प्रसंग समोर असताना हिताच्या गोष्टी सांगणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास पराभव समीप येतो आणि ‘न धरी शस्त्र करी’ म्हणत युक्तीच्या चार गोष्टी सांगणाऱ्यांचे ऐकले तर विजय सुकर होतो, हाच या महाभारताचा बोध. संकटातून मार्ग काढण्यासाठी, किमान त्याची तीव्रता, संभाव्य हानी आणि भविष्यातील दुष्परिणाम कमी करण्यासाठी चांगले सल्ले देणाऱ्यांचे ऐकले पाहिजे. कोरोनासारख्या वैश्विक आपत्तीच्या काळात तर अशा आदानप्रदानाची गरज प्रकर्षाने जाणवते. देशाचे, समाजाचे, राजकीय पक्षांचे नेतृत्व करणाऱ्यांनी विशिष्ट विचार आणि व्यक्तींच्या पलीकडे जात हितकारक गोष्टी सांगणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधला पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोनाचे संकट आणि देशाची स्थिती यावर अर्थतज्ञांशी चर्चा करीत आहेत. त्यातून ते कोरोनानंतरच्या भारतासमोरची आव्हाने जाणून घेत आहेत. त्याच वेळी सरकार टाळत असलेल्या विषयाकडे जनतेचे लक्ष वेधत आहेत. या मालिकेत रघुराम राजन यांच्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी त्यांनी बातचीत केली. देशाच्या आर्थिक स्थितीबाबत नेमके भाष्य करताना धाडसी उपायांशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन आवश्यक होताच; पण तो लागू करताना आणि नंतरही सरकारला संभाव्य आर्थिक आपत्तीचे पुरेसे आकलन झाले नाही, त्यावर तातडीने उपायही करता आले नाहीत, या टीकेला बॅनर्जींसारख्या तज्ञांकडून पुष्टी मिळते आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या अर्थव्यवस्थेची आधीच दमछाक झाली होती. त्यात या संकटामुळे उद्योग आणि परिणामी रोजगार बंद झाल्याने चलन फिरणे बंद झाले आहे. अशा स्थितीत गरिबांसाठी विशेष योजना आणण्याची, तसेच त्यांना मोफत रेशनसोबतच रोख रक्कम देण्याची आणि या प्रक्रियेत राज्यांना सहभागी करण्याची बॅनर्जी यांनी केलेली सूचना महत्त्वाची आहे. आर्थिक धोरणे, निर्णय आणि अंमलबजावणीचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय अर्थव्यवस्था रुळावर येणार नाही, हा त्यांच्या सल्ल्याचा सारांश आहे. ‘मत’लबी आणि ‘मन’मानी राजकारणातून घडणारे ‘महाभारत’ या देशाला नवे नाही. ते घडवायचे की मनाविरुद्धच्या मतांनाही मान देत ‘महान भारत’ घडवायचा, हे आता राज्यकर्त्यांना ठरवावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...