आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:पण’ती’ तेवते आहे!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“मी पहिली आहे, पण शेवटची नाही,’ अशा शब्दांत अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष कमला हॅरिस लोकशाहीची ताकद सांगत होत्या, तेव्हा त्यांच्यापासून साडेआठ हजार मैलांवरील म्यानमारमध्ये आँग सान स्यू की यांच्या पक्षाच्या लाल झेंड्यावरील पिवळा मोर आशा आणि शांततेचे प्रतीक असलेल्या सफेद ताऱ्यापर्यंत पुन्हा एकदा झेपावत होता. एकीकडे, जगाचे ध्रुवीकरण झालेले असताना, हा निकाल पुन्हा उमेद जागवत होता. सर्वसमावेशक राजकारण, जनतेच्या विकासाच्या मूलभूत मुद्द्यांचा अजेंडा, लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार आणि मानवी मूल्यांची कास या तत्त्वांवर जागतिक राजकारणाला विधायक दिशा देणाऱ्या जर्मनीच्या अँजेला मर्केल, आफ्रिकेच्या ॲलन शिरलीफ आणि न्यूझीलंडच्या जेसिंडा अर्डन यांच्यासोबत स्यू की यांनीही आपल्या नेतृत्वाची ताकद दुसऱ्यांदा सिद्ध केली. अर्थात, स्यू की यांच्यापुढील आव्हाने अधिक क्लिष्ट आहेत. रोहिंग्यांचा प्रश्न हाताळताना लागलेला कलंक, वांशिक गटांचे वाढते प्रमाण व लष्कराचे प्राबल्य या तीन मुद्द्यांवर त्यांचे दुसरे पर्व अधिक कसोटी पाहणारे असेल. रोहिंग्यांच्या हत्याकांडानंतर त्यांचा नोबेल पुरस्कार परत घेण्याची मागणी झाली. ज्या लष्कराने दोन दशके नजरकैदेत ठेवले, त्याच्या बाजूने जगापुढे देशाची बाजू मांडावी लागली. आज बहुमत सिद्ध झाल्यानंतरही लष्कराच्या पाठिंब्याशिवाय त्यांच्या “राष्ट्राध्यक्ष’ पदावर शिक्कामोर्तब होऊ शकणार नाही. एकाच वेळी चीन व भारत या दोन बलाढ्य शेजाऱ्यांशी समतोल संबंध राखण्याचा मुत्सद्दीपणा त्यांनी दाखवला. नजरकैदेत असताना, नोबेल स्वीकारताना, लोकशाहीची मुहूर्तमेेढ रोवताना व आंतरराष्ट्रीय न्यायालयात देशाची बाजू मांडताना ‘स्थिर’ राहिलेली त्यांची धीरोदत्त मुद्रा या दुसऱ्या विजयानंतरही कायम आहे. लोकशाही मूल्यांसाठीच्या प्रदीर्घ लढ्यात हीच त्यांची ताकद ठरते आहे. अमेरिका असो वा म्यानमार की न्यूझीलंडच्या जेसिंडा, नव्या जगाची सूत्रे ‘ती’ सांभाळत आहे हे तर महत्त्वाचे आहेच, पण लोकशाहीला मिळणारे बळ अधिक आश्वासक आहे. दिवाळीची प्रकाशवाट आणखी वेगळी कुठे आहे?

बातम्या आणखी आहेत...