आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बंदा यह व्हर्सटाइल है...

टीम रसिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही व्यक्तिमत्वं नेहमीच वडिलधारी भासतात. म्हणजे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, दिसण्या-असण्यात एकप्रकारची प्रगल्भता झळकत असते. त्यांनी काहीही केलं तरीही हे प्रगल्भतेचं वलय काही हटत नाही. वैविध्यपूर्ण भूमिका जगणारा पंकज त्रिपाठी हा अभिनेता या वर्गात मोडतो. तो जी भूमिका साकरतो, त्यात अस्सल प्रगल्भता झळकते. हे सारं दैवी नसतं, तर परिस्थितीच्या माऱ्यातून आकारास आलेलं असतं. माणसाने माणूस होण्याची प्रक्रिया साधीसरळ नसते, महत्प्रयासाने साध्य होत असते. वलयाआडचा पंकज त्रिपाठी नेमकं याचंच दर्शन घडवतो...

बिहारमधल्या गोपालगंज इथल्या बेलसंड गावात उन्हाळ्यात पाण्याची फार मोठी समस्या असायची. मग जवळच्या धरणातून या भागासाठी पाणी सोडलं जायचं. शेतात घर होतं. या घराला एक मोठी खिडकी होती. त्या खिडकीतून धरणाचं पाणी येताना दिसायचं. हळूहळू पाण्यानं पूर्ण कालवा भरुन जायचा. मृदगंध हवेत पसरायचा. दर उन्हाळ्यात हे असंच घडायचं. पाण्याची वाट पाहण्यात एक वेगळी मजा यायची. पाणी आलं की, गावात उत्सवासारखा माहोल असायचा. लोकांचे चेहरे फुलायचे. जो तो कालव्याच्या दिशेने अक्षरश: पळत सुटायचा. त्याक्षणी धडपडत, खाचखळग्यांतून धावताना भारी वाटायचं.

आता मुंबईतल्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घरातही मोठी खिडकी आहे. त्या खिडकीतून दिसतात, समोरच्या इमारती. इथं एक छोटसं मैदान आहे. हे मैदान शिफ्टमध्ये उघडतं. त्या विशिष्ट वेळेतच मुलं इथं येतात, खेळतात. वेळ झाली, की रखवालदार शिट्टी वाजवतो. मुलं निघून जातात. हे सर्व कसं अगदी यांत्रिक आहे. अस्वस्थ करणारं आहे. मूलत: हा दोन जीवनशैलीतला फरक आहे. एकीकडे अगदी मनमुक्त जगता येतं. दुसरीकडे सगळं कसं शिस्तबद्ध! नियमात बसणारं.

"मिर्झापूर' या गाजत असलेल्या वेबमालिकेत "कालीन भय्या'च्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकज त्रिपाठी हा अनुभव सांगताना थोडासा भावूक होतो. मुंबई शहरात येऊन त्याला १४-१५ वर्षे झालीत. प्रचंड स्ट्रगलनंतर या शहरानं आधी नाव, आता पैसा ही येऊ लागलाय. पण तरीही या शहरात मन थोडंसं कमीच रमतं. पंकज सांगतो, ‘मुंबई माझ्यासाठी एक शोरुम आहे. इथं खूप पाहतो, अभिनय करतो, माझ्याकडे जे काही आहे ते देतो आणि काही दिवसांनंतर एकटाच निघतो. नव्या प्रदेशात पुन्हा अनुभव संपन्न होण्यासाठी! शहरातही अनुभव मिळतोच, पण माणसं फारच घड्याळ्याच्या काट्यासारखी धावतात. ग्रामीण भागात अजूनही निवांतपणा आहे. जगण्याला आवश्यक ठहराव आहे. तिथं वेळ थांबलेली आहे. तिथं गोष्टी आपसूक होत असतात. त्यासाठी निश्चित वेळ नसतो. म्हणून या मुंबईतल्या ‘शोरुम’मधून वेळ मिळाला की मी ही अनुभवाची वाट धरतो...’

कालीन भैय्याच्या भूमिकेबद्दल पंकज त्रिपाठी सांगतो की, हे पात्र रंगवणं माझ्यासाठी फार अवघड नव्हतं कारण मी कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून विद्यार्थी निवडणुकांमध्ये सक्रिय होतो.त्यामुळे या सगळ्या एका वेगळ्या जगाचा मला अनुभव आहे. मला पात्र आणि कथा समजून घेण्यात कधीच अडचण वाटत नाही. कमी अधिक प्रमाणात कथा आणि पात्र हे समाजाशी निगडित असतात तिथूनच त्या तयार झालेल्या असतात. त्यामुळे ते समजून घ्यायला फारसं अवघड वाटतं नाही. मी माझ्या भूमिकेवर, लेखक, आणि दिग्दर्शकावर खूप विश्वास ठेवतो. जे त्यांनी लिहून दिलेले असते, त्यावर दिग्दर्शकाची नजर असते. मी फक्त माझी भूमिका निभावतो. त्यामुळे मी त्यांच्या समोर सरेंडर होतो आणि त्यांना जसे पाहिजे तसेच मी काम करतो.

बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर पंकज त्रिपाठी हे नाव चर्चेत आलं. त्यात सुलतान साकारणाऱ्या पंकजला बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. तो प्रसिद्धीच्या झोतात आला त्याच्या बेलसंड या गावात २०१०च्या आसपास वीज आली. म्हणजे किती दुर्गम भागातून पंकज आलाय, याची कल्पना येऊ शकते. तिथंपासून मुंबईपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. पण आता तो आपल्या अभिनयामुळं मुंबईसारख्या शहरात स्थिर झालाय. लोक ओळखायला लागलेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता म्हणून समृद्ध झाल्याची भावना आहेच. पण त्यापेक्षा ज्या ‘न्यूटन’ सिनेमासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यासिनेमाचं जागतिक स्तरावर कौतुक झालं, याचं पंकजला वाटणारं समाधान जास्त आहे.

‘न्यूटन’च्या विषयावर पंकज भरभरुन बोलतो. त्याचं हे बोलणं फक्त सिनेमापुरतं नाही. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीबद्दल तो परखड मतं मांडतो. तो म्हणतो, ‘मी साकारलेला आत्मासिंग हा व्यवस्थेचा भाग आहे. ही व्यवस्था प्रचंड क्लिष्ट आहे. तेवढीच सर्वसामान्य माणसावर प्रभुत्व गाजवणारी. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही, तर ती जगातल्या सर्वच देशांमध्ये अशीच आहे. सर्वसामान्य नागरिक या व्यवस्थेचा भाग आहेत. पण त्यांचं म्हणणं हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं नगण्य आहे. आता आत्मासिंगसारखी माणसं जेव्हा नक्षली भागात काम करत असतात, तेव्हा त्यांच्यात एक आतला आणि बाहेरचा संघर्ष सुरु असतो. व्यवस्था त्याच्यावर भारी पडते. बाहेरुन अगदी विशिष्ट शिस्तीत काम करणारा आत्मसिंग आतून तर सर्वसामान्य आहे. त्यामुळं त्याची होत असलेली घुसमट ही ‘न्यूटन’पेक्षा वेगळी आहे. तो ती बोलूनही दाखवतो, पण तो असहाय्य आहे. व्यवस्थेत असताना त्याला विचार करण्याचा अधिकार नाही. त्याला फक्त आदेशाचं पालन करायचंय. व्यवस्थेचे आदेश हे सर्वसामान्यांच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. आत्मासिंग हा व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करताना, तो त्याचा शिकारही आहे हे आपल्याला समजायला हवं...’ परफेक्ट. पंकज सटिंक म्हणता येईल, असं विवेचन करतो.

मिर्झापूर मालिकेचा बिहार निवडणुकीशी संबंध लावताना पंकज त्रिपाठी बूथ कॅप्चरिंगचा उल्लेख करताना सांगतो की, मी जेव्हा बिहारकडे पाहतो तेव्हा पूर्वीचा बिहार आणि सध्याचा बिहार यात बरंच काही बदललंय. माझ्या लहानपणीची गोष्ट मला आठवते, मी शाळेत असताना अनेकदा बिहारमध्ये मतदान केंद्र लुटण्याचे प्रकार घडायचे. निवडणुका म्हणजे एक दहशत असायची पण आता परिस्थिती बदलली आहे. मला यावेळी 'न्युटन' या चित्रपटातील एक संवाद महत्वाचा वाटतो. 'भलेही कोई गुंडा चुनकर आ जाए, लेकिन हम चुनाव में गुंडागर्दी होने नहीं देंगें'. बिहारच्या नागरिकांचा विचार केला तर बराच बदल झालाय पण अजून बरंच काही बदलणेही गरजेचं आहे. निवडणुका ज्या वर्षी होणार असतात तेव्हापासून मतदानाची तारीख येईपर्यंत आपण जातीय, सांप्रदायिक बंधनात अडकून जातो. लोकशाही व्यवस्था जर योग्य प्रकारे चालवायची असेल तर या बंधनातून बाहेर पडावे लागेल. कोणत्याही आमिषाला बळी न पडता उमेदवाराला निवडून देणं गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला निवडून देत असताना त्याचे मेरिट हे फक्त समाजाप्रती काम करण्याची त्याची भावना. या आधारेच आपण त्याची निवड करावी. जाती-धर्माच्या बंधनातून बाहेर पडून लोकशाही टिक‌वून ठेवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.

सुरवातीच्या काळात पंकजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. तो शाखेत नियमित जायचा. नकळत्या वयात, स्वत:ला शिस्त लागण्यासाठी याचा फायदा झाला. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना राजकीय जाण अधिक पक्की होऊ लागली. पण नाटकाशी संपर्क आल्यानंतर त्याची सर्व विचारसारणी बदलत गेली. बेलसंड गावातून तो पाटण्यात डॉक्टर बनण्यासाठी आला होता. पण कॉलेजमध्ये परीषदेचं काम करताना, तो नाटकाकडे जास्त ओढला गेला. विद्यार्थी नेता असल्यानं अनेक लोकांसमोर बोलण्याची सवय होतीय. पण आता त्यापलीकडे जाऊन अभिनयाची ओढ जास्त लागली. यातूनच सर्व रुढीपरंपरेच्या ओझं कमी झालं. पंकज सांगतो, ‘मी आधी ब्राम्हण होतो, रंगमंचानं मला माणूस बनवलं. ही प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. कारण लहानपणापासून झालेले संस्कार, ज्या सामाजिक व्यवस्थेत तुम्ही मोठे झालेले असतात, त्यातून इतक्या लवकर बाहेर पडणे सोप नव्हतं. तुमची विचार करण्याची, वागण्याची पद्धत त्या व्यवस्थेनुसार असते. पण नाटकानं मला त्यापलीकडे पहायला शिकवलं. त्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या. एक तर नाटकाच्या निमित्तानं होणारं अवांतर वाचन, त्याद्वारे आलेला जागतिक साहित्याचा संदर्भ, जागतिक दृष्टिकोन. यामुळं मनातली कवाडं खुली झाली. मी अधिकाधिक समृद्ध होत गेलो.’

पंकज सांगतो "बाजारवाद सर्वत्रच आहे. आम्हीही त्याचा भाग आहोत. प्रेक्षकांची आवड आणि सिनेमाचं एकूण गणित हे एकमेकांना पुरक असलेल्या गोष्टी आहेत. एकमेकांवर अवलंबून असलेलं एक समीकरण आहे. त्यामुळं समाजातल्या छोट्या पात्रांवर ही सिनेमा येतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक ते पाहताहेत. ही गोष्ट मला फार अजब वाटतेय. मला छोट्या शहरातली पात्र मिळाली ती लोकांना आवडली. संजय मिश्रा, नवाझुद्दीन, बिजेंद्र काला, सौरभ शुक्ला, पियुष मिश्रा, रघुवीर यादव, दीपक डोबियाल यांसारख्या कलाकारांनी अशा अनेक सर्वसामान्य पात्रांना मोठं केलं. लोक त्याच्याशी कनेक्ट होतात, हेच महत्वाचं आहे. मल्टिप्लेक्स संस्कृतीचा चांगला फायदा झालाय. आता लोकांना मोठ्या हिरोबरोबरच छोटी पात्रं पहायला आवडायला लागलीत. यामुळं त्यांची मागणी वाढलीय. यामुळं माझ्यासारख्या कलाकारांना काम मिळतंय.’

अभिनय हेच जगण्याचं आणि पैसा कमवण्याचं साधन असल्यानं पंकज त्रिपाठी सध्या त्यात व्यग्र आहे. बॉलिवूडच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करतोय. पण पंकजला गोष्टी सांगायला खूप आवडतं. याचं कनेक्शन कुठंतरी गावात कधी काळी केलेल्या छोट्या नाटकांमध्ये आहे, असं तो म्हणतो. म्हणूनच जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा किस्सागोई करायला त्याला आवडतं.’ मी गप्पीष्ट नाही. अगदी शांत आहे. पण गोष्टी सांगणं मला आवडतं. नाटकात अभिनयाच्या माध्यमातून किती चांगल्या पद्धतीनं सादर करता येऊ शकतात, याची प्रचिती आली. त्यामुळं मी स्वत:च्या गोष्टी तयार करतो आणि किस्सागोई कार्यक्रमात सादर करतो. मी जे पाहतो, अनुभवतो त्याच्या या गोष्टी असतात. त्यातली पात्र माझ्या आजूबाजूलाच असतात. मला त्याच्या गोष्टी सांगायला आवडतात.’

खिडक्या गरजेच्या आहेत. घरात असोत किंवा जीवनात. खिडक्या असल्या, तर आपण बाहेर पाहतो, बाहेरची व्यक्तीही आपल्याकडे पाहू शकते. ही मजेशीर बाब आहे. यातून एक आदानप्रदान होते. विचारांची. पण समाजात आपण खिडक्या बंद करु लागलोय. आपण पलिकडे पाहणं सोडून दिलंय. आणि दुसऱ्यानं आपल्याकडे पाहणं ही आपल्याला आवडत नाहीयत. त्यामुळे त्या खिडक्या खुल्या राहणं किंवा खुल्या करणं फार गरजेचं असतं. खिडकी फक्त भिंतीत नसते, तर ती मनात ही असते. बेलसंड गावातल्यातल्या घरातली ही खिडकी मला मोठा अनुभव देऊन गेली. यातून अनेक माणसांचं निरिक्षण केलं. या खिडक्यानी मला अनुभव संपन्न केलंय, असं सांगून पंकज त्याच्यातल्या विचारी नटाचं दर्शनही घडवतो.

divyamarathirasik.com

बातम्या आणखी आहेत...