आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रोगापेक्षा भय भयंकर! (लेखक - मुकेश माचकर)
एक साधू रात्रीच्या वेळी ध्यानस्थ बसला होता... अचानक कसल्यातरी चाहुलीने ध्यान भंग झालं... त्याच्या गावाबाहेरच्या कुटीसमोरच्या रस्त्यावरून एक काळी आकृती गावाकडे झपझप चालत निघाली होती.
साधूने विचारलं, कोण आहे?
पलीकडून उत्तर आलं, मृत्यू?
साधूने विचारलं, कुठे निघालास?
मृत्यू म्हणाला, तुमच्या गावाकडे निघालोय. एक साथीचा रोग घेऊन आलोय. एका आठवड्यात एक हजार माणसांना मारायचं टार्गेट आहे.
...आठवड्याभरात त्या साथीच्या रोगाने पन्नास हजार बळी घेतले...
...साधू विचारात पडला, संतापला... माणसं खोटं बोलतात, कारण ती कशाला ना कशाला घाबरत असतात... ज्याला सगळी चराचर सृष्टी घाबरते त्या मृत्यूने का खोटं बोलावं? त्याला कोडं उकलेना... .. रात्री पुन्हा ध्यानभंग झाला... तीच काळी आकृती समोरून चाललली होती… मृत्यू परतीच्या वाटेवर होता. साधूने विचारलं, तू माझ्याशी खोटं का बोललास? हजारच माणसं मारणार होतास ना? पन्नास हजार कशी मेली? मृत्यू म्हणाला, साथीच्या रोगाने ठरल्याप्रमाणे हजारच मारली मी... बाकीची माझ्या भयाने मेली!
लाॅकडाऊन, राजा आणि साधक!
एका झेन साधकाला एका राजाने बंदिवान केलं. तुरुंगात त्याच्याच कोठडीत त्याच दिवशी बंदी बनवण्यात आलेला आणखी एक कैदी होता. तो राजबंदी होता. शेजारच्या राज्याचा राजा होता. रात्रभर ते त्या लाॅकडाऊनमध्ये एकमेकांबरोबर होते. सकाळी राजा तणतणत जागा झाला, झेन साधक प्रसन्न होता. ते पाहून राजाला आणखी संताप आला. तो गुश्शानेच साधकाला म्हणाला, इतक्या वाईट अवस्थेत रात्र काढायला लागल्यानंतर तू इतका प्रसन्न कसा राहू शकतोस रे साधका?
साधक म्हणाला, आधी तुम्ही इतके चिडलेले का आहात, ते सांगाल का महाराज?
राजा म्हणाला, म्हणजे काय? कालपर्यंत मी सर्व प्रकारच्या सुखोपभोगांमध्ये रमलेला राजा होतो. आज कैदी बनून बसलो आहे. तेही मी स्वीकारलं. पण, राजबंद्याला वागवण्याची काही पद्धत असते की नाही. ही केवढीशी कोठडी. किती कुबट वास भरलाय तिच्यात. पायांवर उंदीर नाचतायत, ढेकूण चावतायत, डास डसतायत. दोघांच्या वापरासाठी हे एवढंसं घाणेरड्या पाण्याने भरलेलं टमरेल. हातापायांत पडलेल्या या मणामणाच्या बेड्या… संताप संताप होतोय जिवाचा अगदी.
साधकाने आल्यापासून पहिल्यांदाच कोठडीकडे निरखून पाहिलं. मग तो हसून म्हणाला, मी रात्रभर खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा पाहात होतो. आकाश किती विशाल आहे, तिच्यात अब्जावधी तारे आहेत, असंख्य आकाशगंगा आहेत, आपली पृथ्वीही या पसाऱ्यात धुलिकणाएवढीही नाही, त्यापेक्षाही छोटी आहे. या भव्यतेत माणूस, त्याचे अहंकार, त्याच्या सुखाच्या, दु:खाच्या कल्पना किती क्षुद्र आहेत, याच्याच विचारात रमलो होतो. मला बेड्या दिसल्या नाहीत, कोठडीची मर्यादा जाणवली नाही, दुर्गंधाची नोंद माझ्या नाकाने घेतलीच नाही, फुटकं टमरेल तर मी पाहिलंच नाही. मी रात्रभर चंद्र पाहात होतो!
लेखकाचा संपर्क - ९३२६४७३३४४
लॉक डाऊन लव्ह स्टोरी... (लेखक - प्रेषित रुद्रवार)
तो प्रेमात पडलेला आकंठ बुडालेला मात्र सद्या भेट होणार नाही म्हणून प्रचंड अस्वस्थ झालेला... ती घरात आरामात थंडावा अंगावर घेत पहुडलेली...
भेट होता होत नाहीये,संपर्क होत नाहीये, दिवसेंदिवस फक्त अस्वस्थता वाढत चाललेली... मित्रांकडून पण निरोप येईना, तिचा फोन कोणीही उचलतात. आपली फुल टरकलेली... काही झाले तर नसेल ना...?
खिडकी मधून बाबांचे टक्कल दिसते आहे, भावाच्या दंडाच्या बेंडकुळ्या दिसत आहेत, वहिनी धुणे वाळत घालायला बाहेर येत आहेत... मात्र ती काही दिसेना... आपला पंटर तीनवेळा त्यांच्या घरात बॉल फेकून "काकू बॉल द्या ,म्हणून मागायला गेला' पण ती काही दिसेनाच...काळजाचे पाणी पाणी इतके झाले जेवढे आमच्या घरच्या बोरिंगला पण नाही.. पहिल्यांदा वाट पाहणे तपश्चर्या झाली. खिडकीमध्येच जेवण, तिकडेच अभ्यास, तिकडेच चहा-नाश्ता,पोरांनी क्रिकेट तिच्या घराच्या खाली खेळावे म्हणून मॅचेस घेतल्या,बॉलचे डब्बे आणून दिले, त्याच्यासाठी गळ्यातली चांदीची चैन पक्याकडे उधार ठेवली, रद्दी पण विकली, नापास झालो असतो तर बापाच्या जेवढ्या शिव्या खाल्ल्या अस्त्या त्याच्यापेक्षा जास्त शिव्या खाल्ल्या... सगळे देव खिडकीतून नवस बोलून जेरीला आणले पण नाहीच ना दिसली...
भिंतीवर निरोप लिहून ठेवला, मुन्ना चिठ्ठी घेऊन गेला आणि आपल्या बाजूला असणाऱ्या वहिनीने तिला चिठ्ठी दिली ...उत्तर द्यायचे म्हणून ती आली खिडकी मध्ये एकदा हसली,लाजली,उडती उडती हवेतली हलकी पप्पी दिली आणि इशाऱ्याने म्हणाली गच्चीवर भेटू...कपडे बदलून, स्प्रे अंगावर शॉवरने पाणी घेतात तेवढे उडवून मी तिला आवडणारे कपडे घालून गच्चीवर गेलो,ती पण आली... आम्ही भेटणार,बोलणार एवढ्यात देशमुखकाकू म्हणाल्या "त्यांच्या घरात पण पापड खातात गं पोरी घे शिकून आणि टाक वाळवण चल.. गेली ती जीभ दाखवून... म्हणाली आता लॉक डाऊन संपेपर्यंत फक्त व्हॉट्स ऍपवर बोलू तेही रात्री.
लग्न जमलेल्या सगळ्यांची ही आहे लॉक डाऊन लव्ह स्टोरी....
preshit.rudrawar@myfmindia.net
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.