आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक:कविता... लॉकडाऊन काळातील

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळातील कविता

कुठल्या बिंदूवर... (कवी - नीरजा)

कुठंतरी शेवटच्या मजल्यावर अडकून पडले आहे मी. लिफ्ट बंद आहे आणि  उतरण्यासाठीचे जिने गायब झालेत अचानक. मी घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन  शोधत राहाते  खाली जाणारा जिना तर दिसते प्रचंड खोल पोकळी आणि गडद अंधार.  मी परतते घरात.  तिथं उजेड असतो केवळ माझ्यापुरता मी शोधत राहाते त्यात माणसांना. तर दिसत नाही कोणीच आजूबाजूला.  मी उभी राहाते तासंतास आरशासमोर सोबतीला आपण आहोत आपल्या  याचा दिलासा वाटत राहातो आतल्या आत. मी काढते कपाटातले सगळे कपडे आणि लटकावून ठेवते हँगरला एवढ्या स्त्रिया एकाच वेळी सोबत करतात माझी.  पुस्तकांच्या कपाटातली माणसं  सांगत राहातात गोष्टी प्रेमाच्या, त्यागाच्या, कटकारस्थानांच्या आणि निरर्थकतेच्या. “‘मरण अटळ आहे’ तेव्हाच सांगितलं होतं मी तुला,’ असं हसत म्हणतो कामू आणि ‘प्लेग’ ची पानं फडफडवत राहातो माझ्यासमोर. एक साथ कशी दूर करू शकते अनेक साथीदारांना  याच्या कहाण्या उलगडत जातो तो इतिहासातले दाखले देत तेव्हा उमळून येतं आतून.  लोक रडत राहातात भीषण व्हिडिओमधून, ऑडिओमधून कोणकोणत्या भाषांत बोलत असतात ते सांगत राहातात माणसांची साथ सोडण्याचे  आणि स्वतःला कायमचं एकटं करण्याचे फायदे मृत्यूविषयीचं एकच वाक्य उच्चारत असतात पुन्हा पुन्हा आणि कोणालाच कळत नाही नेमकं काय बोलताहेत ते.

मृत्यूला कवटाळण्यासाठी 

कित्येकदा  उभी राहिले  होते मी 

आत्महत्येच्या टोकावर. सहज खेळायचे लपंडाव त्याच्याशी.   मित्रच होता तो माझा तसा  जुना जाणता. मग आज  का आलाय तो  असा वैऱ्यासारखा  एकटेपणाचं भयाण गाणं गात.

इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर उभी आहे मी. वाटा अदृश्य झाल्यात अचानक  कुठल्याही उतारावरून उतरण्याच्या. आणि मला कळत नाही  कोणत्या बिंदूतून सुरु झालं होतं माझं आय़ुष्य  आणि कुठल्या बिंदूवर संपणार आहे ते नेमकं. 

--------------------------------------

सोपे आहे त्याला हरवणे (कवी - अरुण म्हात्रे)

तो उंच ताड माड झाड असल्यासारखा आपल्या लांब विषारी टांगा टाकत नि सापाच्या शेपट्यांसारखे वळवळणारे हात घेऊन आला आहे ह्या राक्षसी झाडाला पाने नाहीत नुस्त्या कोरड्या काट्यांच्या फांद्या सुस्कारणाऱ्या नि खोकणाऱ्या काळ्या गाठी फांद्यावरच्या नि घरघर लागलेल्या फुफ्फुसाचे खोड आहेत ह्या झाडाला वळवळणारे किडे नि अळ्या पानांच्या जागी नि शिंकत जाणाऱ्या लाल फळांच्या ओकाऱ्यांचे घोस होय होय ! हाच तो ! जगाला वेठीस धरणारा विषाणू !..करोना ! जगभर हैदोस घालणारा व्हायरस !..

थांबा ! मात्र हा खरोखरीचा उंच नाही. नाही तो इतका मोठाही नाही. तो आहे आपल्या पेशींच्या उंचीचा ओल्या बिळातून वावरणारा माणसांच्या घशाच्या बिळांना चटावलेला मानवी घशांची बिळे आणि फुफ्फुसांची घरे शोधणारा कोणी जरा जवळ आल्यावर उडणाऱ्या थुंकीतून झेप घेणारा सूक्ष्म भयानक राक्षस आहे तो..

तो वैतागतो चेहऱ्यावरचे मास्क पाहून हातातले ग्लोव्हस बघून नि चरफडतो क्वारंटाईन वार्ड बघून थयथयाट करतो माणसे स्वतःला पूर्ण झाकून घेतात तेव्हा तो गटांगळ्या खातो धापा टाकतो साबणाच्या फेसात नि बेहोष सॅनिटायझरच्या वासाने त्याची मृत्यूघंटा वाजते फक्त २० सेकंद ह्या वासाने त्याला बंदिस्त केले तरी गरम मिठाच्या पाण्याने कळवळतो तो नि गरम वाफांचा तोफखाना सहन करू शकत नाही त्याचे छछोर कवच मानच टाकतो गरम तेज वाफांसमोर किंचाळूही शकत नाही मरताना माणसे अंतर ठेवून वावरतात तेव्हा तो चिडतो कासावीस होतो थारा न मिळाल्याने त्याची लागणजीभ तुटल्याने..

पानगळीसारखी माणसे कोसळतात जथ्याने घरात, रस्त्यात, बाजारात नि थिएटरमध्ये कुठेही तो असतो करोनाचा शिमगा नि त्यासाठी तो वाट पाहतो तुमच्या एकत्र येण्याची तुम्ही एकमेकांना कवेत घेण्याची कडकडून गळाभेटीची हातात हात घेण्याची एकांतातील स्पर्शसाखळ्यांची जमावाने वावरण्याची गर्दी करण्याची - जत्रा जमवण्याची परस्पर स्पर्शाचा उरूस करण्याची - भेटीच्या बेशिस्त जल्लोषाची विषाणूच्या मुक्त वावरासाठी नात्याचा कळकट कल्ला करण्याची..

कोविड 19 वाजवीत निघालाय मृत्यूघंटा अखिल मानवजातीची धावतोय हवेच्या वेगाने ह्या खंडातून त्या खंडात ह्या देशातून त्या देशात विमानातून बोटीतून मिळेल त्या वाहनातून नासवत देशांचे रस्ते उद्वाहने जिने नि दरवाजे बागा मैदाने नि सार्वजनिक जागा

प्रत्येक शहराच्या कॉलनीच्या वस्तीच्या कसब्याच्या पेठेच्या वाडीच्या दरवाज्यावर उभा आहे विषाणूंची लाल फुले घेऊन उभा उभा सरपटतोही आहे गर्दीच्या पावलांतून

जागे व्हा मानवांनो भानावर या बघा काय नासत चाललंय वेगाने सभोवती बघा नि आत या आपल्या घरात टाळा जवळीक, टाळा गर्दी थांबवा हातात दिले जाणारे हात.. सुटे व्हा.. एकटे व्हा.. एकटे होऊन लढा.. सुटे करा हातातून हात एकटे व्हा.. एकेकट्याने लढायला शिका लढण्याचे 'एकांतमिशन' करा सुरु ! टाळा स्पर्शील सामुदायिकता टाळा बाजार टाळा बसस्टॅन्ड टाळा रेल्वे स्टेशन टाळा विमानतळे. टाळा प्रत्यक्ष शरीर संपर्क.. टाळा हे सर्व नि उघडं पाडा त्या विषाणूला अनाथ हतबल करा ह्या दैत्याला पहा ह्याचे कैक मिचमिचे लाल डोळे रोखले गेलेत सर्व मानवी वस्त्यांवर जगाला मातीत गाडायचे मनसुबे आहेत ह्या बरबटल्या डोळ्यात

फार सोपे आहे त्याला हरवणे नेस्तनाबूत करणे - त्याचा नायनाट करणे

देश आठवा आपले सगे सोयरे आठवा मित्रसखे आठवा आणि घरात बसा.. फक्त इतकेच करा.. तुमच्या देशावरचे प्रेम दाखवण्याची अटळ वेळ आलीय.. घरातून शस्त्र न घेता लढण्याची महान संधी आलीय..

खूप सोपे आहे.. खूपच सोपे आहे त्याला हरवणे जर तुम्ही स्वतःच ते अवघड केले नाहीत तर.. तुम्ही स्वतःच स्वतःला नियंत्रित केले नाहीत तर...

-------------------------------------

तुकडा (कवी - साहिल कबीर)

तूकडा [१]

बंद काळात  मी कुठेच गेलो नाही  आमच्याकडे सगळी   धर्मस्थळे आजपर्यंत तरी लॉक्ड आहेत,  महापूरानंतर माणूसकीमय  झालेली  लोकं ,  कालपासून धर्मावर बोलताहेत, 

धर्माचा किडा अजस्त्र झालाय,  एंप्टी माईंड डेविल्स् होम वगैरे  मनोरंजनाच्या आरपार टीवीचा भडिमार झालाय. डाटाआटा मारा काटा पळा लपा आवश्यक  डिस्टसिंग जपा जपा

राशन ची गर्दी,  हवाबदलाची सर्दी  कळकळीचे दर्दी, जगण्याची रद्दी  झालीय.

तुकडा [२]

तुम चले जाओगे तो सोचेंगे  हमने क्या पाया , हमने क्या खोया

खूप खोया हमने म्हणून रड्तो हमीद    अच्छे दिन आयेंगे म्हणून अजून उम्मीद 

उम्मीद पे टिकी दुनिया,  दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाया  गाण्यांची भेंडी,भेंडीचा बाजार  झालाय. 

तुकडा[३]

निषेध णिषेद निषेध  सगळ्याच धर्मांधाचा निषेध  केवळ एवढं बोलून चालेल काय  पांढऱ्या दाढीला काळा डाय 

काळारंग माखून घेतलाय  आसूडोळे दिसू नयेत  असले तसले माझे नव्हेत  मग माझे कोण कोण ? 

तुकडा [४]

सांगायला गेलो अक्कलबिक्क्ल  झालं हसू केली नक्कल  केस वाढ्लेत करु टक्कल? (वेदनेला वाट,चालढकल)

मग वाचनबीचन तात्पुरत उगाच  ब्रुटस यू टू , जुलीअस उवाच.

बातम्या आणखी आहेत...