आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Divyamarathi State Editor Sanjay Awate's Column On Eknath Khadase Joining NCP

स्टेटमेंट:मौका सभी को मिलता है!

2 वर्षांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक
संजय आवटे, राज्य संपादक, दैनिक दिव्य मराठी - Divya Marathi
संजय आवटे, राज्य संपादक, दैनिक दिव्य मराठी
  • वेळीच ‘नाथा पुरे आता’ म्हणत थोपवले असते, तर ही वेळ आली नसती; आता संसर्ग अटळ आहे

बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान झालं. तेव्हा, चित्र असं होतं की, “तुमचे सगळे जवळचे लोक तुम्हाला सोडून कसे चाललेत?”, अशा सततच्या प्रश्नाने शरद पवार संतप्त होत होते. आज, ‘एकनाथ खडसेंनंतर आता आणखी कोण कोण भाजप सोडू शकतं?”, या प्रश्नाचा सामना देवेंद्र फडणवीसांना करावा लागतोय.

सांगली- कोल्हापुरात पूर येऊनही महाजनादेश यात्रेच्या ‘इव्हेंट’मध्ये आणि मोठमोठ्या विरोधी नेत्यांना गळाला लावण्यामध्ये देवेंद्र फडणवीस तेव्हा मग्न होते. म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. आज मात्र, ‘अतिवृष्टीचे संकट समोर असताना, फोडाफोडीच्या या अशा राजकारणावर’ भाष्य करायला देवेंद्र तयार नाहीत. सरकारला जाब विचारत शेतकऱ्यांचे दुःख देवेंद्र फडणवीस मांडू लागले आहेत.

एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निर्विवाद नायक देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या पक्षासाठी. युतीसाठी. माध्यमांसाठीही. देशभरातील माध्यमे त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आज मात्र ते खलनायक ठरले आहेत. इतरांसाठी नव्हे, त्यांच्याच पक्षात असलेल्या एकनाथ खडसेंच्या दृष्टीने. ‘खडसे मला व्हिलन ठरवताहेत’, असे खुद्द देवेंद्रच (त्यांना एरव्ही न शोभणाऱ्या) त्राग्याने म्हणत आहेत.

काळ किती वेगाने बदलत जातो!

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदान झाले, त्याला कालच एक वर्ष होत असताना, राज्यातील राजकारणाने नवे वळण घेतले आहे. गेल्या वर्षीचे चित्र वेगळे होते. दररोज एक नवा नेता भाजपमध्ये दाखल होत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या छावणीतले अनेक सिंह भाजपच्या चारा छावण्यांकडे निघाले होते. भाजप हा एकमेव पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते असल्याप्रमाणेच वातावरण तयार होत होते. नवनव्या नेत्यांना भाजपमध्ये घेत देवेंद्र ‘शक्तिसंचय’ करत होते. विरोधी पक्षनेतेपदावरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दावा सांगता येणार नाही, अशी थट्टा केली जात होती. पवारांचे युग संपल्याचे सांगितले जात होते. असा तो काळ होता.

‘एक्झिट पोल’ यापेक्षा वेगळे सांगत नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या एकचालकानुवर्ती सत्तेला आव्हान मिळेल, असे अनेक अभ्यासकांनाही वाटत नव्हते. निवडणुकांचा अभ्यास करणाऱ्या संशाेधन संस्थाही महाराष्ट्रातील या निवडणुकीचा अभ्यास करण्याच्या तयारीत नव्हत्या. कारण, निकाल स्पष्ट आहे, असा त्यांचा होरा होता!

गेल्या वर्षभरात एवढा पाऊस कोसळला आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. एवढं की, ज्या भाजपला फक्त ‘इनकमिंग’ माहीत आहे, तिथं आता ‘आऊटगोइंग’ सुरू झालं आहे. एकनाथ खडसे यांचे भाजप सोडणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणे ही या संसर्गाची सुरुवात ठरू शकते. चाळीस वर्षे भाजपमध्ये असलेले आणि एकेकाळी देवेंद्रांचे ‘बॉस’ असणारे एकनाथ खडसे आता ६८व्या वर्षी त्यांची नवी इनिंग सुरू करत आहेत.

खडसेंचा राग आहे, तो देवेंद्रांवर. विरोधकांना नेस्तनाबूत करताना देवेंद्रांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही संपवून टाकले. त्यात खडसे एकटे नव्हते. पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे असे दिग्गज मंत्री, जे आज साधे आमदारही नाहीत. देवेंद्रांनी या सगळ्यांना संपवले, असा सूर असतो. पंकजा मुंडेंनी आपल्या अस्वस्थतेला यापूर्वी वाट करून दिली आहे. मात्र, अद्याप त्या निर्णयाप्रत आल्या नाहीत. खडसेंनी आपला निर्णय आधीच जाहीर केला होता. ‘हम तो डूबेंगे सनम, मगर तुम्हें भी लेकर’ असे गोपीनाथगडावर जाहीर करून त्यांनी आपले इरादे कधीच स्पष्ट केले होते! देवेंद्रांच्या विरोधातील आपली खदखद त्यांनी लपवून ठेवली नव्हती. त्यामुळे भाजपमधून जाण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य मार्ग नव्हता. कारण, त्यांनी स्वतःच सगळे दोर कापले होते. आता फक्त ते कोणत्या पक्षात जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना प्रवेश देणार का, एवढेच प्रश्न उरले होते.

खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्याने लगेच मोठा भूकंप होईल, असे नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अगदी मोदी लाट असतानाही खडसेंचे मताधिक्य लक्षणीय नव्हते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या कन्या रोहिणी यांचा पराभव झाला. आपल्या मतदारसंघात आणि जळगाव जिल्ह्यात मात्र मर्यादित का असेना, पण त्यांचा प्रभाव आहे. स्थानिक दूध संघावर त्यांची पकड आहे. त्याचे नेतृत्व खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांच्याकडे आहे. रोहिणी खडसे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आहेत. रक्षा खासदार आहेत. (सत्तेच्या केंद्रीकरणाबद्दल बोलणाऱ्या खडसे यांनी सत्तेची सगळी सूत्रे मात्र आपल्या घरात ठेवलेली असावीत, हाही अंतर्विरोध!)

खडसे यांचा देवेंद्रांना असणारा तीव्र विरोध लक्षात घेता, आगामी काळात देवेंद्रांवर हल्ला चढवण्यासाठी विरोधकांना फायरब्रँड नेता मिळणार आहे. अर्थात, खडसेंना फार मोठे मंत्रिपद लगेच मिळण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खडसे शरद पवारांना नागपुरात भेटले होते. त्यावर विचारता पवार म्हणाले होते, ‘खडसेंना देण्यासारखे काही आमच्याकडे नाही!’ आता मात्र तो प्रश्न सुटला आहे. याचा अर्थ खडसेंकडून काय मिळणार आणि त्यांना काय दिले जाणार, याची उत्तरे मिळालेली दिसतात! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने महाविकास आघाडीत कमी अस्वस्थता नाही. जळगाव जिल्हा आिण खान्देशातील राजकीय समीकरणे त्यामुळे बदलणार आहेत. विशेषत: स्थानिक शिवसैनिक अधिक दुखावलेले आहेत. तरीही खडसेंमुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादीला राज्यस्तरावर फायदाच होणार आहे.

जळगाव जिल्ह्याचे एकचालकानुवर्ती नेतृत्व करत असलेल्या गिरीश महाजनांना त्यामुळे धक्का बसणार आहे. महाजन आणि देवेंद्रांचे ‘एक दुजे के लिए’ नाते लपून राहिलेले नाही. भाजप सोडण्यापूर्वी जळगाव महापालिका बरखास्तीसाठी नाथाभाऊंच्या समर्थकांनी आक्रमक होणे त्या दृष्टीने महत्त्वाचे.

खडसे लेवा- पाटील समुदायाचे नेते आहेत, तसेच ओबीसी नेते अशीही त्यांची ओळख आहे. ते अफाट ताकदीचे नेते आहेत, यात शंका नाही. असा ‘मास बेस’ असणारा आणि लोकांमधून आलेला एवढा मुत्सद्दी नेता भाजपकडेच काय, इतर पक्षांकडेही आज अपवादानेच असेल. तरीही, त्यांच्यासोबत फार मोठ्या संख्येने अनुयायी आहेत, असे नाही. त्यांचा आपला गट वा संस्थात्मक जाळे आहे, असेही नाही.

मुद्दा प्रामुख्याने ‘परसेप्शन’चा आहे. भाजपला आणि देवेंद्रांना आव्हान दिले जाऊ शकते, हा संदेश त्यातून दिला जाणार आहे. भाजपमधील असंतुष्टांना आवाज मिळणार आहे. रक्षा खासदार असतानाही खडसेंनी असा निर्णय घेतला. उद्या प्रीतम मुंडेंना भाजपमध्येच ठेवून पंकजाही पक्षातून बाहेर पडू शकतात अशी चर्चा सुरू होणे हेच भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. शिवाय, भाजपमधील ‘सुबह के भूले’ पुन्हा ‘घरवापसी’ करू लागले, तर हा संसर्ग रोखणे या पक्षाला जड जाणार आहे.

जयंत पाटील आणि राजीव सातव यांची विधाने पाहिली, तर संसर्गाची ही शक्यता मोठी दिसते आहे. म्हणून, भाजपसाठी ही बातमी वाईट आहे. महाराष्ट्रातली शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. पंजाबातलं शिरोमणी अकाली दल बाहेर पडलं. बिहारमध्ये चिराग पासवान (कोणाच्या आशीर्वादाने का असेना!) एनडीएला आव्हान देताहेत!

अशा वेळी आता भाजपचा एवढा ज्येष्ठ नेताच पक्षाचा राजीनामा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेेसमध्ये प्रवेश करतो, हे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ करणारे आहे.

वेळीच ‘नाथा पुरे आता’ असे म्हणत थाेपवले असते, तर भाजपवर ही वेळ आली नसती!

बातम्या आणखी आहेत...