आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:मराठीतल्या इरॉटिका…

टीम रसिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरॉटिका हा जागतिक पातळीवर मान्यता पावलेला साहित्यप्रकार. आता तर इंग्रजी-हिंदीमध्ये समाजमान्यता मिळूनही मराठीत "एक्सप्लोर' न झालेला प्रकार. आपली सोज्ज्वळ, साधी मराठी भाषा या साऱ्यापासून काहीशी दूर. त्या-त्या काळात आपल्याकडे रंभा, चंद्रकांत, हैदोस अशी मासिकं होतीच, शिवाय पिवळ्या वेष्टनातील हिंदी-मराठी पुस्तकेही होती. पण त्यातील सगळी लैंगिक वर्णनं पुरुषांच्या नजरेतून... "स्टोरीटेल'कट्ट्याने मात्र यासंदर्भात एक मराठीतल्या इरॉटिका असा वेगळा प्रयोग करून भारतीय समाजरचनेतील लैंगिक घुसमटीला मोकळा श्वास देण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.

काही वर्षांपूर्वी "दिव्य मराठी रसिक' पुरवणीत समीक्षक शशिकांत सावंत यांचे "इरॉटिका' नावाचे सदर सुरू होते. शृंगाररसाला प्राधान्य देणारे साहित्य आणि साहित्यलेखक यावर प्रकाशझोत टाकणारी ही लेखमालिका होती. आपल्या एका लेखात शशिकांत सावंत यांनी अशी मांडणी केली होती की, पोर्नो आणि इरॉटिक लिटरेचर यात मूलत: फरक आहे. आपल्याकडे चंद्रकांत काकोडकरांपासून ते भाऊ पाध्यांपर्यंत अनेकांनी इंग्लिश शब्दांचे, लैंगिक संबंधाचे धीट वर्णन करणाऱ्या कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इंग्रजीत तर सर्वच प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळे पोर्नो काय किंवा इरॉटिक काय, या प्रकारचे साहित्य भरपूर उपलब्ध आहे. मराठीत शृंगारिक कादंबऱ्यांची मोठी परंपरा आहे. अनेक ग्रंथांमध्ये धीट शृंगाराचे वर्णन आले आहे. आज वयाच्या चाळिशी-पन्नाशीला आलेल्या पिढीला लैंगिक ज्ञान झाले, ते त्यामुळे. त्या काळात मराठी माध्यमात शिकणारी मुलं हमखास शाळेच्या वयात चंद्रकात काकोडकर वाचत. नंतर मग ‘विवाहितांचा वाटाड्या’, ‘निरामय कामजीवन’ अशा पुस्तकांतून हे ज्ञान व्हायचे. ११-१२वीतील कितीतरी मुलं सिमोन् द बोव्हुआरचं ‘सेकंड सेक्स’सारखं वैचारिक पुस्तकदेखील अशा वर्णनांच्या आकर्षणांमुळे वाचत. इंग्रजी साहित्यातमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही रोमान्सच्या आणि संबंधाच्या कल्पना किंचित वेगळ्या आहेत, असं मानलं जात होतं. परंतु ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ पुस्तकाने हा समज खोटा ठरवला. अर्थात, आपली सोज्ज्वळ, साधी मराठी भाषा या साऱ्यापासून काहीशी दूर आहे. मात्र, त्या-त्या काळात आपल्याकडे रंभा, चंद्रकांत, हैदोस अशी मासिकं होतीच, शिवाय पिवळ्या वेष्टनातील हिंदी-मराठी पुस्तकेही होती. पण त्यातील लैंगिक वर्णनं कित्येकदा संवेदना जागृत करण्यापेक्षा पोट धरून हसायलाच लावत. परंतु, पुन्हा हा प्रश्न येतोच की, पोर्नो आणि इरॉटिक यात फरक तो काय? ‘लोलिता’सारख्या कांदबरीला पोर्नोग्राफी ठरवून त्यावर बंदी आणण्याचे ठरत होते, त्यावर जवाहरलाल नेहरूंसारख्या साहित्याची प्रगल्भ जाणीव असलेल्या आणि स्वत: लेखक असलेल्या जाणकाराने म्हटले की, हे तर दर्जेदार साहित्य आहे. म्हणजेच, आपल्याला असे म्हणता येईल की, पोर्नो आणि इरॉटिका यातल्या सीमारेषा पुसट असल्या, तरी प्रगल्भ वाचक त्याबद्दलचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो.

हाच धागा पकडून सध्याच्या सोशल मीडियाच्या या काळात "स्टोरीटेल'ने मराठीतल्या इरॉटिका हा धाडसी विषय हाताळण्याचे ठरवले. स्टोरीटेल अॅप हा एक कट्टा आहे, एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. सई तांबे ही स्टोरीटेलच्या पब्लिशर म्हणूम काम पाहते. इरॉटिका हा विषय मराठीत का आणणे का गरजेचे आहे या बद्दल बोलताना सई तांबे सांगते, क्राईम, सस्पेन्स, रोमान्स, थ्रिलर,ड्रामा, हॉरर अश्या वेगवेगळ्या गोष्टींवर काम करायची संधी मला स्टोरीटेलवर नेहमीच मिळायची. पण पब्लीशर म्हणून मला स्टोरीटेलसाठी "इरॉटिका' करायच्या होत्या आणि माझा अशा साहित्याचा अनुभव जवळ जवळ शून्य होता! मी एका मोकळ्या , स्वतंत्र विचारांच्या घरात वाढले त्यामुळे कुठलाही विषय बोलण्यावर बंधन नव्हतं. सेक्सबद्दलची वर्णन तसलिमा नसरीनच्या पुस्तकातून, गौरी देशपांडेच्या लिखाणातून माझ्या समोर आली. त्यामुळे स्टोरीटेलसाठी "इरॉटिका' साठी लेखकांसोबत या गोष्टींवर काम करायचं तर आधी स्वत:चा अभ्यास तयार हवा. म्हणून आवर्जून मी मराठीतल्या काही इरॉटिका वाचायला घेतल्या मात्र घाटदार बांधा रसीले ओठ वगैरे वाचून मी बोअर झाले. एखादा हे वाचून "टर्न ऑन' कसा होतो बुवा? असा गहन प्रश्न मला पडला. मला त्यात आजच्या काळातली एकपण बाई दिसेना. सगळ्या आपल्या खजुराहोवर कोरलेल्या अप्सरा! बरं पुरुष तर या इरॉटिकांमध्ये फक्त डोळे या स्वरूपात... ज्यांच्या नजरेतून त्या बाईचं शरीर दिसणार. मला बाई म्हणून एखाद्या हँडसम पुरुषाबद्दलची इरॉटिका वाचावी किंवा ऐकावी वाटली तर? मला काही तश्या गोष्टी सापडल्या नाहीत. यातल्या बहुसंख्य गोष्टी एकाच छापाच्या होत्या, ज्यामध्ये सगळा फोकस हा बाईचं शरीर, त्याचा उपभोग घेता येणे इतपतच मर्यादित होता.

सईने मग यावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करायचे ठरवले. आजच्या काळातल्या इरॉटिका करायच्या असतील तर नवीन प्रयोग करावे लागतील हे तिचया लक्षात आले आणि मग त्यावर तिने लेखकांशी चर्चा करायला सुरुवात केली. काहीजणांनी सरळ सरळ नकार दिला. तर काहीजण प्रयत्न करायला तयार झाले. सई सांगते "डेस्परेट हसबंड' ही ५ भागांची इरॉटिक ओरिजिनल करताना मी आणि लेखिकेने प्रत्येक भागात काय घेता येईल याबद्दल जवळ जवळ तीन तास गप्पा मारल्या होत्या. लग्न झालेल्यांच्या सेक्सचं नक्की काय होतं, लग्न झाल्याच्या पहिल्या रात्री किती प्रेशर येऊ शकतं परफॉर्मन्सचं? नवरा आणि बायको दोघांची सेक्सची फ्रिक्वेन्सी मॅच होतंच नसेल तर? लग्न होऊन २५ वर्ष झाल्यावर दोन्ही पार्टनरच्या सेक्श्युअल फीलिंग्स चं नक्की काय होतं? यासारखे विषय या गप्पांमधून चर्चेला आले आणि आम्ही ठरवलं कमी बोलल्या गेलेल्या विषयांवरच ही ओरिजिनल करायची.

आजच्या काळातली बाई आणि पुरुष आपल्या इरॉटिकेतून दिसले पाहिजेत. ती केवळ सेक्स सीनला टेकू लावलेली गोष्ट नको तर आधी एक चांगली गोष्ट असली पाहिजे त्यात सेक्स अपरिहार्य म्हणून आलेला असेल, जी वाचून लोकांना छान वाटेल. अश्या प्रकारच्या गोष्टी तयार करायच्या असं सईने ठरवलं आणि त्यातून नवऱ्यापासून लांब, होस्टेलवर राहणाऱ्या एका मुलीची - ‘अरेबियन ड्रीम' ही गोष्ट तयार झाली. कोकणातल्या गणपतीच्या दिवसात नातेवाईकांनी भरलेल्या घरात - तू मला सिड्यूस करून दाखव अशी पैज मारणाऱ्या नवऱ्याची गोष्ट... बाईला काय हवंय सेक्समधून, तिला सगळ्यात जास्त आनंद कशाचा होतो हे शोधणाऱ्या फर्स्ट लव्ह, वन नाईट विडींग यासारख्या इरॉटिका... अशा नव्या विषयांची नव्याने निर्मिती झाली.

विषय जसजसा पुढे सरकू लागला तसे इरॉटिकांचा विचार करताना वेगवेगळे लैगिक अनुभव, प्रेफरन्सेस ही त्यामध्ये आले पाहिजेत असे सई आणि तिच्या टीमला वाटू लागले. सई म्हणते, मग तशा अनुभवांनाही खूप ताकदीने आपल्या कथांमध्ये उतरवणारे लेखक मला मिळाले. महत्वाचे म्हणजे फक्त महिला लेखिकाच नव्हे तर पुुरुष लेखकही आमच्यासोबत तितक्याच मोकळेपणाने काम करू शकले. मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो जी स्पॉट, रोल प्ले यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या कथा लिहीणाऱ्या भूषण कोरगांवकरचा. त्याने पहिली कन्सेप्ट नोट पाठवली जी स्पॉट या कथेची, तेव्हा नाव वाचून मला ही स्त्रीच्या जी स्पॉटबद्दलची कथा असेल असं वाटलं. पण सगळं वाचल्यावर कळलं की पुरुषांना पण असा जी स्पॉट असतो. आश्चर्य वाटून मी गुगलवर जाऊन अधिक माहिती वाचली … तर खरंच! भूषणने विषयाचा नीट अभ्यास करून मला गोष्टीची आयडिया पाठवली होती.

कदाचित ऐकायला येणारे आधी फील गुड इफेक्ट मिळावा म्हणून येतील पण ऐकताना वेगळे अनुभव, बाईच्या नजरेतून इरॉटिका, वेगळे sexual प्रेफरेन्सस यांसारख्या काही गोष्टी तरी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हा या कथांचा अजून एक चांगला परिणाम आहे असं,सई म्हणते. हा सगळा अनुभव कसा होता हे सांगताना सई म्हणते की, माझ्या काही इरॉटिका लिहिणाऱ्या लेखकांना, नातेवाईकांनी समारंभात टोमणे मारणे वगैरे सारखे अनुभव आले. काही लेखिकांना तर, त्यांच्या घरून थोडा विरोधही झाला. त्यांनी लिहिलेली एखादी कथा ऐकून, धडाधड फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आणि मेसेंजरमध्ये उगीचच मेसेज यायला लागले. तरीही आत्तापर्यंत प्रत्येक लेखकाने कव्हरवर स्वतःच नाव दिलं. आवाज देणाऱ्या आर्टिस्टने ही - ह्या कथा स्वतःचं नाव देऊन जिवंत केल्या. ही सगळी प्रक्रिया मी मनसोक्त एन्जॉय केली. मला समाधान आहे की इरॉटिका म्हणून काही वेगळे प्रयोग मी करू शकले. आज गीतांजली कुलकर्णी सारखी कसलेली अभिनेत्री जेव्हा स्वतःहून म्हणते की मला इरॉटिका करून पाहायचीय, तेव्हा वाटणारं समाधान काही औरच असतं!

र. धों. कर्वेंच्या "समाजस्वास्थ्य' सारखं उदाहरण डोळ्यांपुढे असूनही केवळ हैदोस आणि पिवळ्या पुस्तकात गुरफटून गेलेला आणि इंग्रजी-हिंदीमध्ये समाजमान्यता मिळूनही मराठीतला एक्सप्लोर न झालेला साहित्यातला हा भाग स्टोरीटेलच्या निमित्ताने नव्या रुपात येतोय आणि त्यानिमित्ताने मराठी वाचक वर्ग सर्वार्थाने प्रौढ होतोय.

divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...