आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Dr Amol Kothadia Rasik Article : In Global Short Films, Echoes Of Indian Space ...

थर्ड आय:वैश्विक लघुपटांमध्ये, भारतीय अवकाशातील प्रतिध्वनी...

डॉ. अनमोल कोठाडिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात उजव्या विचारसरणीचा जोर वाढून त्या सत्तेत आल्याचे, त्यामुळे वातावरण द्वेषमूलक, हिंसात्मक झाल्याचे चित्र असतानाच त्यास तरुणाई लघुपट माध्यमांतून भिडत असल्याचे देखील आश्वासक चित्र पाहायला मिळतेय. निमित्त - नुकताच संपन्न झालेला तिसरा विंटेज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव... ऑनलाईन स्वरूपात पार पडलेल्या या महोत्सवात यंदा २६ देशांतील २३७ लघुपटांच्या प्रवेशिका होत्या. या महोत्सवात सहभागी झालेल्या वैश्विक, विशेषतः इटली आणि जर्मनीच्या लघुपटांतून जाणवणारी आजच्या भारतीय राजकीय अवकाशातीलही प्रतिध्वनी पोचविण्याचा हा प्रयत्न...

जगभरात उजव्या विचारसरणीचा जोर वाढून त्या सत्तेत आल्याचे, त्यामुळे वातावरण द्वेषमूलक, हिंसात्मक झाल्याचे चित्र असतानाच त्यास तरुणाई लघुपट माध्यमांतून भिडत असल्याचे देखील आश्वासक चित्र पाहायला मिळतेय. निमित्त - नुकताच संपन्न झालेला तिसरा विंटेज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव... ऑनलाईन स्वरूपात पार पडलेल्या या महोत्सवात यंदा २६ देशांतील २३७ लघुपटांच्या प्रवेशिका होत्या. या महोत्सवात सहभागी झालेल्या वैश्विक, विशेषतः इटली आणि जर्मनीच्या लघुपटांतून जाणवणारी आजच्या भारतीय राजकीय अवकाशातीलही प्रतिध्वनी पोचविण्याचा हा प्रयत्न...

"ॲना फ्रँक डिडन्ट गो टू स्टेडियम' (इटली)

१८ सप्टेंबर १९३८ रोजी हुकूमशाह मुसोलिनीने केलेल्या वर्णविद्वेषी, अतिरेकी राष्ट्रवादी भाषणाच्या पार्श्वभूमीवर कृष्णधवल चित्रणात आपणास स्टेडियममध्ये सराव करणारे खेळाडू दिसतात. अचानक ज्यू खेळाडूंना खेळण्यापासून रोखणे सुरु होते. आता रंगीत पार्श्वभूमीवर आपण वर्तमानात येतो- आणि अजूनही स्टेडियममध्ये घुमणाऱ्या वर्णविद्वेषी, अतिरेकी राष्ट्रवादी घोषणा सुरु असल्याच्या दिसतात. मग काही अस्वस्थ तरुण खेळाडू दिसतात. त्यांच्या हाती एक पॅड फिरत राहतो. त्यावर ॲना फ्रँकचे चित्र असते. ते हाती घेऊन एक मुलगी वेदनेच्या भरात म्हणते- "ॲना फ्रँक डिडन्ट गो टू स्टेडियम!" आता काही जुन्या खेळाडूंचे फोटो दिसतात, ज्यांना केवळ ज्यू असल्यामुळे खेळण्यापासून वंचित केलेले असते. क्लोजिंग टायटल्स पडताना एक युवा खेळाडू रॅपमधून "माझाच देश/धर्म महान'छाप घोषणांची खिल्ली उडवतो.

याला इटलीमध्ये अलीकडे घडलेल्या एका घटनेचा संदर्भ आहे. लिझीओ या खेळाडूच्या अतिरेकी उजव्या चाहत्यांनी रोमा आणि त्याच्या चाहत्यांबद्दल "ते ज्यू आहेत' अशा वंशवादी द्वेषमूलक घोषणा दिल्या होत्या. पण त्याची तेथील फुटबॉल संघानेच नव्हे तर राष्टप्रमुखाने देखील लागलीच गंभीर दखल घेतली. आपल्याकडे मात्र अशा बाबतीत नेमके मौन धारण असते. तेथे मात्र खुद्द लिझीओसुद्धा रोमासोबत उभा ठाकला. दुर्दैवाने आपल्याकडचे काही खेळाडू आणि कलाकार असल्या विखारी राजकारणात सहभाग घेताना दिसतात.

"रॅडिकल कॅम्प' (इटली)

तथाकथित राष्ट्र उभारणीचे काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विनामूल्य रॅडिकल कॅम्पमध्ये लॉरा आणि ज्युलिया या दोन गरीब तरुणी सहभाग घेतात. तिथे त्यांना शिस्त आणि लष्करी हिंसात्मक प्रशिक्षण दिले जाते. बौद्धिकाच्या नावाखाली ब्रेनवाॅशिंगही केले जाते, ज्यात त्यांच्या वंचित अवस्थेस बाहेरून आलेले आश्रितच जबाबदार आहेत, हे बिंबवले जाते. प्रशिक्षणाचा वापर कोणत्याही गुन्ह्यासाठी करायचा नाहीये, हे साळसूदपणे ऐकवले जाते, मात्र राष्ट्र उभारणीसाठी अशा परधर्मी निर्वासित आश्रितांना मारणे ही राष्ट्रभक्तीच आहे, असा बुद्धिभेदही त्यांच्या मनात ठासून भरला जातो. 'कोणी यास वंशवादी म्हणेलही, पण पर्वा नाही'- असेही प्रशिक्षक निर्लज्जपणे सांगतो. शिवाय पूर्वीच्या प्रशिक्षणार्थींनी केलेल्या मॉबलिंचिंगच्या घटनांचे व्हिडीओजही त्यांना पुरवले जातात. अगदी सुरवातीपासूनच अभावग्रस्तता आणि कौटुंबिक कारणांमुळे या दोघी एकमेकींबरोबर हिंसक खेळात मश्गुल दिसतात. लॉराला या मॉबलिंचिंगच्या घटना मात्र काहीशा अतिरेकी, बेकायदेशीर वाटतात. ज्युलिया मात्र अशा हिंसाचारासाठी आता वखवखलेली असते. तेव्हा लॉराच्या "जर आपण पकडले गेलो तर?' या प्रश्नास ज्युलिया "सत्ताधारी पक्ष असल्याने आपणास काहीही होणार नाही, तरीही शक्यतो पकडले जाणार नाही, याची काळजी घ्या", असे प्रशिक्षकाने संकेत दिल्याचे सांगते. जीवनावश्यक वस्तूंचा अभाव असणाऱ्या या देशात नेटपॅक मात्र मुबलक उपलब्ध असल्याचे दिसते. कॅम्पनंतर ज्युलिया एका निर्वासित स्त्रीचा मृत होईपर्यंत अनन्वित छळ करते. हे करण्यापासून ज्युलियाला लॉरा परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. पकडली गेल्यावर ज्युलिया अगदी जाज्वल्यपणे आपल्या अमानवी हिंसेचे प्रच्छन्न समर्थन करत राहते. राष्ट्रप्रमुख, न्यायव्यवस्था, पोलीसयंत्रणा जे निर्वासितांच्या बाबत करत आहेत, तेच तर मी करतीये, असे तिचे म्हणणे असते. देशभरात घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, हे पाहून राष्ट्रप्रमुख ज्युलियासारखी काही प्यादी गमावण्यास तयार असतो. न्यायव्यवस्थेस तशा सूचना पोचल्याने तिला शिक्षा होतेही, मात्र न्यायाची अंमलबजावणी करणाऱ्यांना तिच्याबद्दल आस्था असल्याने तिच्या सुटकेचा मार्ग मात्र मोकळा राहतो...

"स्टंबलिंग स्टोन्स' (जर्मनी)

याची सुरुवातच हिटलरच्या राष्ट्रप्रमुखपदी येण्याच्या बातमीने होते. एका सुखवस्तू ज्यू कुटुंबामध्ये संदिग्ध अस्वस्थता पसरते. बापाला वाटत असते की आपण तर चांगले जर्मन आहोत, त्यामुळे काळजीचे कारण नाही. मुलीने शाळेत हिटलरबद्दल चांगलेच ऐकलेले असते. आईनेही हिटलर युवकांच्या बेरोजगारीबद्दल काहीतरी करेल, असे ऐकलेले असते. पण देशभरात भलतेच घडू लागते. केवळ ज्यू असल्याने मुलीस शाळेत जाणे मुश्किल होते. आईला किराणा दुकानात जाणेही दुष्कर होते. नाझी त्यांच्या घरावर चाल करून येतात तर चांगले जर्मन हतबल होऊन ज्यूंना मदत करण्यास कचरतात. या टप्प्यावर सुरु होणाऱ्या निवेदनातून आपण भूतकाळातून वर्तमानात येतो. जे पूर्वी घडले, ते रोखू शकलो नाही, याबद्दल अपराध गंड बाळगण्याची गरज नाही, मात्र आज आपण एकमेकांशी कसे वागतो, ही मात्र आपली जबाबदारी आहे, या विवेकी मानवीय भानापर्यंत आपण येऊन पोचतो. तेव्हा बळींची नावे कोरलेल्या स्टंबलिंग स्टोन्सवर याचा शेवट होतो.

"स्टेट ऑफ द युनियन' (जर्मनी)

यात हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी मानवी हक्कांबरोबरच सीमारेषाही आवळायला सुरवात केलेली आहे. बहुसंख्य मात्र आपापल्या कम्फर्ट झोनच्या बुडबुड्यात मश्गुल असल्याने सत्ताधाऱ्यांचे काम सोपे झालेय. या पार्श्वभूमीवर 'आता नाही तर कधीच नाही' या उर्मीने काही भूमिगत बंडखोर देशात घातपात घडवण्याच्या कामगिरीवर बाहेर पडतात. पण आजच्या अत्याधुनिक डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व मानवी व्यवहारांवर नियंत्रण आणू शकत असल्यामुळे ते सर्वजण पकडले जातात. सर्वंकष सत्ताधारी हे सारे केवळ एका क्लीकच्या आधारे हे सारे साधतो. ही आजची चिंतेत भर घालणारी अत्याधुनिक डिजिटल वास्तविकता आहे. मात्र याचा शेवट करताना एक आश्वासक सूरही लावला आहे. यांचा एक दुरावलेला साथीदार मात्र जेव्हा ही बातमी ऐकतो तेव्हा तो जुना टाइपरायटर काढून याबद्दल त्यावर विद्रोही लिखाण करू लागतो...

"इको' (जर्मनी)

या लघुपटात एक विषाणूजन्य साथ पसरलीय, संसर्ग झाल्यास माणूस माणसांनाच भक्ष्य करू लागतो. अशा झोंबींपासून स्वतःला वाचविणे आणि इतर माणसांपासून स्वतःला वाचविणे, अशीदेखील जीवघेणी धार आहे. या पार्श्वभूमीवर 'मी जर पहिल्यांदा गोळी नाही चालवली तर पुढची व्यक्ती ती चालवणार', अशी धारणा असणाऱ्या फाल्टरला, 'जर समोरच्या व्यक्तीवर विश्वास नाही ठेवला तर मानवता कशी वाचणार?' असा प्रश्न विचारणारी मिला भेटते. आणि या दोघींना 'डोळ्याच्या बदल्यात डोळे, या न्यायाने सारे जगच आंधळे होऊन जाईल' हे न कळणारी एक धनुर्धारी तरुणी भेटते. वर्तमानाची दिशा जर अशीच उजवी अतिरेकी राष्ट्रवादी राहिली तर मानवतेसाठी घनदाट काळोख अटळ आहे...

महोत्सवातील या चित्रपटांच्या तपशिलात किरकोळ बदल केल्यास ही कथानके भारतीय पार्श्वभूमीवर किती चपखलपणे लागू होतात ना ? या पार्श्वभूमीवर वर्तमानाची दिशा पाहता काही भविष्यवेधी लघुपट पाहून तरी आपण शहाणं होण्यास हरकत नसावी.

cineanmol@yahoo.co.in

बातम्या आणखी आहेत...