आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कबीर रिएक्सप्लोअर्ड:मन का मनका फेर...

डॉ. भालचंद्र सुपेकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली अनेक शतकं कबीर अस्तित्वात आहे, शाश्वत शब्दब्रह्माच्या रूपानं. अनेकांनी त्याचं अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी कबीराच्या दोह्यात नवं काही सापडतं. हे नवंपण त्या त्या काळातल्या जीवनव्यवहाराला सहजी व्यापून टाकतं. कबीराच्या विचाराच्या याच नवेपणाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न...

अमेरिकी लेखक पी. जी. वुडहाऊस यांनी ‘आय डोन्ट हेट इन प्ल्युरल्स’ असं म्हटलं होतं. समूहाच्या गर्दीचा भाग न बनता मानवी अस्तित्वाच्या पटलावर स्वतंत्र ठसा उमटवणारा कबीर याच उक्तीचं मूर्तीमंत उदाहरण. कबीर नुसता दोहे लिहित नाही, फक्त उपदेश करत नाही तर तुमच्या मनात, विचारसरणीत, असण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचं सूत्र देतो. तो कोणतीही भीड न बाळगता सडेतोड टीका करतो पण त्याचवेळी पर्यायाकडेही निर्देश करतो. याच वेगळेपणामुळं कबीर तुम्हाला वेड लावतो... तुमचं जगणं शहाणं करण्यासाठी. तुमच्यात स्वतःचं मानस बदलण्याची ताकद असली पाहिजे बस्स....

माला फेरत जुग भया फिरा न मन का फेर,

कर का मनका डारि दे मन का मनका फेर।

कबीराचा हा दोहा एकाच दगडात अनेक पक्षी मारणारा आहे. एकीकडे तो कर्मकांड, पुजाविधी, ते करणारे अशा सगळ्यांवर टीका करतो तर दुसरीकडे तो मनोविज्ञानातल्या मूलभूत तत्त्वाची व्याख्या करतो. अनेक लोक वर्षानुवर्षे नित्यनेमाने एखाद्या देवाचा मंत्र हातात माळ घेऊन जपत असतात. पण नित्यनेमाने जप करण्यात अनेक वर्षे घालवल्यानंतरही त्यांच्या मनोभूमिकेत काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मंत्रजप करून काहीही फरक पडणार नाही. म्हणूनच हातातली जपमाळ फेकून द्या आणि तुमच्या मनाचा मणी फिरवा, असं सूत्र कबीर इथं मांडतो. इथे कबीराच्या शब्दलालित्यालाही दाद द्यावीच लागेल.

देव मानणाऱ्यांवर टीका म्हणून हा दोहा नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. देव मानणारे आणि न मानणारे या दोघांच्या मनोभूमिकेच्या पलीकडे जाऊन कबीर जगण्यातलं वास्तव मांडतो आहे. हातात जपमाळ आणि मनात अनंत प्रकारच्या विचारांचं वादळ असेल तर असा जप फोलच ठरणार.

या दोह्यातला अर्थ त्याच्या खूप पलीकडचा आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. हजारो वर्षांपासून सूर्य पूर्वेकडूनच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो. रोजचा दिवस तसा सारखाच असतो. आपल्या आसपासची माणसं, जागा, रस्ते, शहरं, झाडं सगळंसगळं तसंच असतं. या गोष्टींमध्ये आपल्या जीवनकाळात थोडा बदल होतो हे मान्य. पण तरीही बुद्धाच्या किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून लोकं तत्त्वज्ञानाचा शोध घेताहेत, काही लोकं मानवी अस्तित्वाचा शोध घेताहेत, काहीजण मानवी मनाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करताहेत... हे सुरूच आहे. ही प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेत गुंतलेली, समर्पितपणे काम करणारी माणसं आजही आहेतच. मग त्यांच्यात नि आपल्यासारख्या सामान्यांतला फरक तो काय... फरक इतकाच की त्यांची आपल्या आसपासच्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी, मनोभूमिका आणि विचार वेगळा असतो. तीही आपल्यासारखी माणसंच पण त्यांनी कर्मकांडात न अडकता स्वतःच्या मनाचा मणी म्हणजेच मानसिकता बदलण्याचा, तिला विशिष्ट आकार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले.

या दोह्याचा मथितार्थ आणखी एक नवा अर्थ सांगतो. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. जग बदलून टाकेल असं अनेक प्रकारचं तत्वज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आजवर अनेकांनी मांडलं. पण त्यांनी जग बदलण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून हे केलं नाही. तर त्यांनी स्वतःला बदललं, स्वतःच्या जीवनशैलीत, विचारसरणीत बदल केला. नंतर त्यांचं अनुकरण करून हजारो-लाखो लोक त्यांचे चाहते-अनुयायी बनले. उद्योजकतेच्या जगापासून दार्शनिकतेच्या विश्वापर्यंत आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रापासून साहित्याच्या क्षेत्रापर्यंतची अशी शेकड्यानी उदाहरणं देता येतील. आपण जग बदलायचा विचार करतो आणि तिथंच गल्लत होते. आपण स्वतःला बदललं की जग आपोआप बदलतं. आसपासचं विश्व बदललं नाही तरी आपली दृष्टी बदलल्यामुळं त्याच गोष्टींमधलं नवंपण आपल्याला दिसायला लागतं.

पण "मन का मनका फेर' यानुसार मनाचा मणी फिरवायचा हे माळेतला मणी फिरवण्याइतकं सोपं नक्कीच नाही. त्याला खूप कष्ट करावे लागतील, असंही नाही. कारण ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हे साधलं. अगदी अलीकडं दहा-बारा वर्षांची ज्ञानाचं भांडार असलेली चिमुरडी मुलं आपण एका वाहिनीच्या लोकप्रिय कार्यक्रमात पाहिली. मनबदलाचा विचार ज्या क्षणी मनात येईल आणि ज्या क्षणी तुम्ही तो अमलात आणाल, त्या क्षणी बदल सुरू होतोच.

एका गावात एक साधूबाबा आले. ते गावाच्या बाहेर एका मोठ्या झाडाखाली मुक्कामी थांबले. एका तरुणाला असं वाटू लागलं की या साधूबाबांकडे एखादा चमत्कारी मंत्र असलाचा पाहिजे. म्हणून तो मंत्र मिळवण्यासाठी तो तरुण रोज साधूबाबांकडे जाऊ लागला, त्यांची सेवा करायला लागला. संध्याकाळ झाली की तो साधूबाबांना विचारायचा की, बाबा, मला तो चमत्कारी मंत्र द्या ना. पण साधूबाबा म्हणायचे, नंतर कधीतरी देईन. असे दिवसामागे दिवस चालले होते. एक दिवस त्या तरुणाने सकाळपासूनच हट्ट धरला. मग साधूबाबांनीही त्याला एक मंत्र दिला. तो तरुण खूप खूश झाला. त्याने साधूबाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो निघाला. दोन पावलं पुढं गेला तितक्यात साधूबाबांनी मागून त्याला आवाज दिला नि म्हणाले, बाळा, या मंत्राचा एक नियम आहे तो मात्र लक्षात ठेव. तसा तरुण मागे फिरला आणि साधूबाबांजवळ आला. साधूबाबांनी सांगितलं की, हा मंत्र उच्चारत असताना तुझ्या मनात माकड, माकडाचं चित्र, त्याचा एखादा अवयव यातलं काहीही आलं तर मात्र हा मंत्र सिद्ध होणार नाही. हे ऐकून तरुण घरी गेला. तो दिवा-अगरबत्ती लावून मांडी घालून शांत बसला आणि मंत्र बोलू लागला. पण डोळे बंद असूनही त्याला समोर माकड दिसायला लागलं. अखेर अनेक दिवस प्रयत्न करूनही तो मंत्र काही सिद्ध झाला नाही.

या गोष्टीत मंत्र खरा होता की खोटा हे महत्त्वाचं नाही. पण मंत्र सोडून इतर कोणत्यातरी नको असलेल्या गोष्टीवर चित्त एकाग्र होत होतं. आपलंही असंच होतं. आपला उद्देश असतो यशाचा पण आपलं मन अपयशाच्या शक्यतांवर एकाग्र झालेलं असतं. उत्तम गुण मिळवण्याचा हेतू बाळगणाऱ्याच्या मनाला नापास होण्याची भीती व्यापून असते. आपल्याला व्हायचं असतं सुंदर पण आपण इतरांच्यातली कुरूपता पाहण्यात गुंतत जातो. या सगळ्यावरचा उपाय एकच... मन का मनका फेर...

(डॉ. भालचंद्र सुपेकर हे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे पत्रकारीता या विषयासाठी पीएच.डी. साठी बाह्य मार्गदर्शक आणि नैमित्तिक लेखक आहेत.)

bhalchandrasauthor@gmail.com

बातम्या आणखी आहेत...