आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:प्रा. राजा दीक्षित गौरवग्रंथ : भारतीय आधुनिकतेवरील लेख संग्रह

डॉ. जास्वंदी वांबूरकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकादमिक क्षेत्रात एक व्यासंगी इतिहासतज्ज्ञ, सामाजिक बुद्धिमंत व चतुरस्त्र वक्ता म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रा. राजा दीक्षित यांच्या गौरवार्थ ‘इंडियन मॉडर्निटी: च्यॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस’ हा इंग्रजी ग्रंथ पुण्याच्या युनिक फाउंडेशनतर्फे लवकर प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त प्रा. राजा दीक्षित यांचा आणि त्यांच्यावरील गौरवग्रंथाचा परिचय करून देणारा हा लेख...

श्री. म. उर्फ राजा दीक्षित हे अकादमिक क्षेत्रात एक व्यासंगी इतिहासतज्ज्ञ, सामाजिक बुद्धिमंत आणि चतुरस्त्र वक्ता म्हणून ओळखले जातात. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राचे (मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे) विभागप्रमुखपद त्यांनी भूषविले आणि २०१७ साली ते निवृत्त झाले. नुकतीच पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. अकादमिक क्षेत्रात त्यांना मिळालेला हा सर्वोच्च्य सन्मान आहे.

आधुनिक महाराष्ट्र हा प्रा. राजा दीक्षित यांच्या संशोधनाचा विषय. आधुनिकता आणि केशवसुत, महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, मराठीतील विज्ञानविषयक व इतिहासविषयक लेखन, पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालयाचा इतिहास अशा विविध विषयांवर सखोल संशोधन करून इतिहास क्षेत्रातील अनवट वाटा त्यांनी चोखाळल्या. ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या जुन्या ग्रंथाचे संपादन व लेखन करून संपादनाचे नवे मानदंड त्यांनी प्रस्थापित केले. त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. प्रासादिक, लालित्यपूर्ण व ओघवती लेखनशैली यांमुळे त्यांचे आशयघन लेखन अधिकच प्रभावी आणि रसरशीत वाटते. मराठी भाषा व साहित्य यांवर त्यांचे इतके प्रभुत्व आहे की, ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत की साहित्याचे, असा संभ्रम पडावा. त्यांच्या मांडणीमध्ये अनेक विद्वान, तत्त्वज्ञ यांच्या लेखनसंदर्भांची रेलचेल असते. मात्र कोणत्याही विशिष्ट तत्त्वप्रणालीत बांधून घेणे त्यांना मानवत नाही. या बाबतीत ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ असा त्यांचा पवित्रा आहे. त्यांचे इतिहासविषयक लेखन हे अतिशय संयत, शिस्तबद्ध आणि समतोल मांडणीमुळे वैशिट्यपूर्ण ठरले आहे.

मुळात कवी असलेले, संवेदनशील, आणि ऋजू मनाचे प्रा. दीक्षित हे विद्यार्थीप्रिय शिक्षक नसते तरच नवल. त्यांचा ग्रंथ ‘पुणे विद्यापीठाचा इतिहास’ त्यांनी समस्त विद्यार्थीवर्गाला समर्पित केला आहे. नावाप्रमाणेच राजस व्यक्तिमत्व लाभलेले, मृदूभाषी सर विद्यापीठात सतत माणसांनी वेढलेले असत. या एरवी हळव्या, प्रेमळ पण संशोधनाच्या बाबतीत अतिशय कडक व शिस्तप्रिय मार्गदर्शकाने उत्तम संशोधकांची एक परंपरा निर्माण केली. त्यांनी एम.फिल. आणि पीएच.डी. साठी ३४ विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले; पण ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधनाचे व जीवन जगण्याचे धडे दिले, अशा विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी आहे. विर्द्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. निरलसता, शिस्तप्रियता, पद्धतशीरपणा व वक्तशीरपणा या गुणांमुळे विद्यापीठात विविध समित्यांवर व विभागांमध्ये काम करताना एक उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांनी लैकिक मिळवला.

अकादमिक क्षेत्रातील उतरंड न मानणाऱ्या या समतावादी प्राध्यापकाने शालेय ते पदव्युत्तर पातळीवरील सोप्या, रसाळ भाषेतील इतिहासाची दर्जेदार पाठ्यपुस्तके निर्माण केली. त्यांद्वारे जगातील अनेक विद्वानांचे इतिहासविषयक ज्ञान व संज्ञा त्यांनी मराठीत आणल्या. वर्गातील विद्यार्थ्यांचे तास असोत की महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यासपीठांवरून दिलेली सार्वजनिक व्याख्याने असोत; आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात विद्वज्जनांसमोर केलेली बीजभाषणे असोत अथवा एखादा अनाथाश्रम, मुस्लीम वस्ती, झोपडपट्टी, ग्रामीण समाज, स्त्री-संघटना यांच्यासाठी केलेली व्याख्याने असोत...अशी सर्वच व्याख्याने प्रा. दीक्षित तेवढ्याच गंभीरपणे आणि सहजतेने देतात. आपल्या अभ्यास-विषयावर सतत वाचन, मनन, चिंतन आणि लेखन करत राहिल्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला कधी शिळेपणा येत नाही.

गेल्या काही वर्षांपासून इतिहासातील अनेक विषयांवर वादंग उपस्थित होत आहेत. याबाबत काही गट अतिसंवेदनशील बनल्यामुळे इतिहासाविषयी मोकळेपणाने मांडणी करणे कठीण होते. अशा सांस्कृतिक दहशतवादाचा प्रतिवाद करण्यासाठी प्रा. दीक्षित अनेक वर्षे विविध व्यासपीठांवरून सातत्याने भूमिका घेत आहेत. यासाठी समाजातील ‘इतिहासविषयक साक्षरता’ वाढवली पाहिजे, असा शब्दप्रयोग त्यांनी रूढ केला आहे.

डॉ. अरविंद देशपांडे हे राजा दीक्षित यांचे गुरू. आपल्या गुरूप्रमाणेच एक मोठे विद्वान असूनही त्यांच्या वागण्यात आढ्यता, तुच्छता नावालाही नसते. कोणीही त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतो. किंबहुना सगळ्यांसाठी त्यांच्या मनात कमालीची आत्मीयता असल्यामुळे अनेकजण मदतीसाठी त्यांच्याकडे धावा करतात. मात्र त्यांचा हा ‘मदतखोर’पणा व ‘सार्वजनिक’पणा यांची झळ त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्वात अधिक खुद्द त्यांना सोसावी लागते. कार्यबाहुल्यामुळे त्यांना वेळेची कसरत नेहमीच करावी लागते. प्रा. दीक्षित यांच्या अकादमिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मणिभाई देसाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार, मा. कृ. केरुळकर पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार आणि सरोजबेन पारीख असे मोठे पुरस्कार दिले गेले. त्यांच्या अर्धांगी मीनल दीक्षित यांनी घर-संसार कायमच समर्थपणे सांभाळले आणि म्हणूनच प्रा. दीक्षित यांना स्वतःला अकादमिक क्षेत्रात झोकून देता आले. आपल्या जीवनप्रवासात मीनलताईंसारखा सुस्वभावी जोडीदार आणि निखिलसारखा समंजस सुपुत्र मिळणं, यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो?

भारतातील आधुनिकतेचे आगमन आणि त्याची विविध क्षेत्रांतील अभिव्यक्ती हा प्रा. राजा दीक्षित आणि त्यांचे निकटचे सहकारी यांच्या जिव्हाळ्याचा व संशोधनाचा विषय राहिला आहे. म्हणून त्यांच्या गौरवग्रंथात भारतीय आधुनिकतेवरील आकलन समृध्द करणाऱ्या लेखांचा समावेश केला आहे. ‘इंडियन मॉडर्निटी: च्यॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस’ हा इंग्रजी ग्रंथ युनिक फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होत असून डॉ. जास्वंदी वांबूरकर यांनी त्याचे संपादन केले आहे. आधुनिकता ही निरनिराळ्या संस्कृतींमध्ये आणि राष्ट्रांमध्ये वैविध्यपूर्ण रितीने अभिव्यक्त झालेली एक बहुआयामी प्रक्रिया आहे. पाश्चात्त्य जगाच्या तुलनेत आधुनिक भारताची जडणघडण एका अनोख्या संक्रमणातून झाली. भारताने प्रबोधन, आधुनिकतेचे युग आणि भांडवली व्यवस्थेतील संक्रमण या जटील घडामोडी एकाच काळात वासाहतिक सत्तेच्या छायेखाली अनुभवल्या. भारतात विविध प्रदेशांत आणि विविध समूहांमध्ये आधुनिकतेचे अभिसरण व आविष्कारही भिन्न भिन्न होते. प्रत्येक प्रदेशाचा इतिहास, भौगोलिक रचना, भाषा, संस्कृती या घटकांमध्ये विविधता असल्यामुळे येथे बहरलेली आधुनिकता खूप वैविध्यपूर्ण होती. परंपरा आणि नवता यांच्या द्वंद्वातून येथील आधुनिकता साकारली.

भारताच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया जटील आणि तरीही किती रंजक होती, याची साक्ष या ग्रंथातील लेखांमधून मिळते. या ग्रंथात इरिना ग्लुश्कोवा यांनी ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या प्रतिमा आणि महाराष्ट्राची अस्मिता यांतील नाते उलगडले आहे. अरविंद गणाचारी व वर्षा शिरगावकर यांनी अनुक्रमे ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज आणि भूदेव मुखोपाद्ध्याय व वि. ना. मंडलिक यांच्यातील नात्याचा वेध घेतला आहे; तर चंद्राणी चटर्जी यांनी बंगाली व मराठी साहित्यातील सुनीत यांचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. यशवंत सुमंत व चैत्रा रेडकर यांचे लेख अनुक्रमे सेनापती बापट व साने गुरूजी यांच्या राजकीय विचाराची चिकित्सा करतात. उमेश बगाडे यांनी महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक योगदान, अभिधा धुमटकर यांनी विज्ञान क्षेत्रातील डॉ. हेरॉल्ड मॅन यांचे कार्य आणि मीना वैशंपायन यांनी प्राच्यविद्याकार शंकर पांडुरंग पंडित यांची कारकीर्द - याचा परामर्श घेतला आहे. मधुमिता बंदोपाध्याय यांनी रेल्वेचा मुंबई प्रांतातील विविध समूहांवर झालेला परिणाम तर चंद्रकांत अभंग यांनी शौचालय-स्वच्छतेचे व्यवस्थापन यासारख्या वेगळ्या विषयावर मांडणी केली आहे. श्रद्धा कुंभोजकर यांनी मराठी रंगभूमी आणि आधुनिकता यांची चर्चा केली आहे तर जास्वंदी वांबूरकर यांनी विभावरी शिरूरकरांच्या साहित्यातील स्त्रीवादाचे विश्लेषण केले आहे. रश्मी कोंड्रा यांनी लोकमान्य टिळक व बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रपटविषयक विचार व कार्य यांचा आढावा घेतला आहे.

भारतीय इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, साहित्य, कला यांच्या अभ्यासकांनी ‘वाचायलाच हवा’ असा हा गौरवग्रंथ आहे.

jaswandi75@yahoo.com

(लेखिका मुंबई येथील श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठातील इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)