आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार- विवेकनिष्ठांचे पारितोषिक

डॉ. मुग्धा कर्णिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांना नुकताच प्रा. रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार घोषित झाला आहे. ज्यांच्या नावाचा हा पुरस्कार दिला जात आहे त्या रिचर्ड डॉकिन्सची ओळख देशात तितकीशी नाही. आजच्या जगात एवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानात्मक प्रगती मानवाने केली असूनही मानवी समाज दुष्टत्वाच्या फेऱ्यात का अडकत आहेत याचे कारण शोधताना त्यांनी देव कल्पना आणि धर्मकल्पनांचा प्रादुर्भाव हेच मानवी जगातील दुष्ट घटनांचे मूळ आहे अशी  मांडणी केली.

  विवेकनिष्ठा, धर्मातीतता, विज्ञानदृष्टी या मूल्यांचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित केले जाते, परवा जावेद अख्तर यांना हा पुरस्कार जाहीर झाला. जावेद अख्तर साहेबांना भारतात आधीपासूनच त्यांच्या पटकथा लेखनामुळे- त्यातही विशेषतः शोलेच्या संवादांमुळे ओळखले जात होते. गेल्या काही वर्षांत भाजपमोदीशहा कारकीर्दीत विवेकनिष्ठा डब्यात गेली, धर्मवेड जोरात आले आणि विज्ञानदृष्टीचा बट्ट्याबोळ झाला- या काळातही जावेद अख्तर यांनी सर्व प्रकारचे ट्रोलिंग सोसून आपल्या भूमिका बोथट केल्या नाहीत त्याची ही पावती आहे. पण अमेरिकन एथीस्ट अलायन्सने सुरू केलेला, आणि आता सेंटर फॉर इन्क्वायरी या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला गेला त्या प्रा. रिचर्ड डॉकिन्सची ओळख मात्र देशात तितकीशी नाही. 

त्यांच्या नावाने असा पुरस्कार देण्याचे प्रमुख कारण हे रिचर्ड डॉकिन्स यांच्या कार्यातूनच दिसते. डॉकिन्स यांनी आपला मूळ विषय उत्क्रांतीमूलक जीवशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली आहेत. द सेल्फिश जीन, माउंट इम्प्रोबेबल, द ब्लाइंड वॉचमेकर, द एक्स्टेंडेड फेनोटाइप आणि द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ या काही महत्त्वाच्या पुस्तकांतून त्यांनी मुख्यत्वे उत्क्रांतीवादी जीवशास्त्रीय सत्ये मांडली. आणि हा प्रवास सुरू असतानाच त्यांच्या लक्षात आले ते सर्व दुष्कृत्यांचे मूळ. आजच्या जगात एवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानात्मक प्रगती मानवाने केली असूनही मानवी समाज दुष्टत्वाच्या फेऱ्यात का अडकत आहेत याचे कारण त्यांनी आपल्या भाषणांतून, लेखनातून मांडणी करून द्यायला सुरुवात केली. देव कल्पना आणि धर्मकल्पनांचा प्रादुर्भाव हेच मानवी जगातील दुष्ट घटनांचे मूळ आहे हे ते स्पष्टपणे बोलू लागले. उत्क्रांतीवाद वैज्ञानिकदृष्ट्या पचल्या-पटल्यानंतर देवनिर्मित सृष्टी वगैरे थोतांड फोलपटांसारखे उडवून दिल्यावाचून पर्यायच रहात नाही, हे कुणीही विवेकनिष्ठ सांगू शकतो. पण रिचर्ड डॉकिन्स यांनी मात्र त्या देवनिर्मित सृष्टीवादाविरुद्ध मोहीमच उघडली. २००६ पर्यंत हे त्यांचे काम व्याख्यान मालिका, खुल्या वादचर्चा यांतून होत राहिले. पण २००६मध्ये त्यांनी गॉड डिल्यूजन- (देव एक भ्रम) हे पुस्तक लिहून ईश्वरवाद झुगारणाऱ्या सर्वांना एक वैचारिक आयुध उपलब्ध करून दिले.

मोठमोठ्या विद्यापीठांतून प्राध्यापकी करणारे लोक कसे शांत, सौम्य, प्रहार न करता भाषणे देतात. विरोधकांवर निर्दयपणे वैचारिक आघात करणे हे त्यांच्या प्रतिष्ठित कपड्यांना शोभत नसते. पण रिचर्ड डॉकिन्स यांच्या नेतृत्वासमवेत ख्रिस्तोफर हिचेन्स, सॅम हॅरिस आणि इतर अनेक विचारवंतांनी हा सौम्य पोषाखीपणा भिरकावून ईश्वरनिष्ठेच्या अविवेकी, अवैज्ञानिक मांडणीला शिंगांवर घेतले. अर्थातच त्यांच्यावर ते कट्टरपंथी आहेत, कर्कश आहेत वगैरे अगदी सहज करता येतील असे आरोप झाले. पण ह्यूमन जेनॉम प्रकल्पाचे प्रमुख संशोधक फ्रॅन्सिस कॉलिन्स यांच्याशी जाहीर वाद झाल्यानंतर आणि तो टाइम मॅगॅझिनने छापल्यानंतर डॉकिन्स यांना जणू उत्क्रांतीवादातून उत्क्रांत झालेल्या निरीश्वरवादी मांडणीचा सूर सापडला. विषारी टीकेने, शिव्याशापांमुळे जगणे अवघड होते असे मानून सोज्वळ मुखवटे वागवणाऱ्या अकादमिक जगतात हा असा सडेतोड टीका निर्भयपणे करणारा प्राध्यापक विरळा होता.

प्रा. डॉकिन्स यांनी टेम्पलटन फाउंडेशनसारख्या बड्या ईश्वरवादी न्यासालाही आव्हान दिले. ज्या काळात वैज्ञानिक मिळेल तिथून आपल्या संशोधनासाठी पैसा मिळवू पाहात असतात त्या काळात हे करण्यासाठी आगळी तत्त्वनिष्ठा लागते. तिला सार्वजनिक पाठिंबा मिळत नसतानाही आपल्या विवेकनिष्ठेच्या आधारावर तगून रहाणे अवघड असते.

प्रा. डॉकिन्स म्हणतात ईश्वरवादातून जन्मतो धर्म, मग त्यातून अपरिहार्यपणे विकृत धर्मवाद, मग तो परिणत होतो मूलतत्ववादात आणि मग तोच पुढे  बदलतो दहशतवादात. हे सर्व धर्मांत आणि पंथांत घडू शकते. देवाच्या अस्तित्वावरील मूलभूत विश्वासातून आणि मानवी जीवनधर्माला वळण लावण्यातून निर्माण झालेल्या धर्मकल्पना काहीकाळानंतर किडत गेल्या, कालबाह्य झाल्या. पण त्यांचे समूहमनातील अधिष्ठान कायम राहिले. अज्ञाताची भीती बाळगणाऱ्या कमकुवत मनांवर कब्जा करून त्यांना मनःसामर्थ्य देण्याच्या गोंडस नावाखाली फसवणूक जारी राहिली. जरी जगभरात अनेक निरुपद्रवी आणि सद्वर्तनी ईश्वरश्रद्ध धार्मिक लोक असले तरीही त्यांच्या संख्याबलातूनच धर्माधर्मांतील सत्ताकांक्षी प्रबळांची निर्मिती झाली. मानवजातीची एकंदर घडण पाहिली तर अप्रबुध्दांची संख्या नेहमीच प्रबुध्दांपेक्षा जास्त असते. आणि बुध्दीमान, प्रतिभावान अशी माणसे तर तशी फारच कमी प्रमाणात जन्माला येतात. अनेक बुध्दीमान सत्प्रवृत्त लोकांची प्रज्ञाप्रतिभा जशी या जगाला पुढे नेते, तशीच काही बुध्दीमान धूर्त, दुष्प्रवृत्त लोकांची चलाखी या जगाला आहे तिथेच ठेवून आपल्या हाती सारी सूत्रे ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा मागे नेऊन जुन्या निर्बुध्दतेचे पिंजरे बळकट करू पाहाते. म्हणूनच ईश्वरनिष्ठा, अविवेकी विचारांना बांधून घातलेले धर्म यांचाच त्याग करणे आवश्यक आहे असे प्रा. डॉकिन्स यांचे सांगणे आहे.

देव नावाचा भ्रम या मराठी नावाने जेव्हा मी त्यांचे गॉड डिल्यूजन हे पुस्तक मराठीत आणले तेव्हा अर्थातच प्रा. डॉकिन्सच्या मांडणीचा ठायीठायी प्रत्यय येत होता. देव धर्माच्या नावाने झोळ्या फिरवून देशात पैसाही जमा केला जात होता आणि त्रिशूळाने रक्त काढण्याची तयारीही सुरू झाली होती. भगव्या पट्ट्या डोक्यावर बांधल्या आणि लाल टिळे कपाळावर टेकवले की सारी नीतीमूल्ये गहाळ करून हिंसेचा गजर करायचे परमिट मिळू लागले होते. स्वतःच्याच म्हणवत असलेल्या सांस्कृतिक इतिहासाची कणभरही माहिती नसली तरीही कॅमेऱ्यासमोर त्रिशूळ नाचवत कुणाची तरी आईबहीण नासवण्याची भाषा करायला ईश्वरनिष्ठेची ना नव्हती हे दिसत होते.

सारे धर्म आणि पंथ तसे ईश्वरसदृश अस्तित्वाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आधार घेतातच असे अखेर दिसून येते. एक सुपरतत्व अनुयायांना मस्तकी धारण करण्यासाठी निवडून देण्यासाठी धर्मस्थापना होते. नीतीमूल्येही त्याच्या जोडीनेच येतात, पण काळाच्या ओघात अखेर नीतीमूल्यांपेक्षा त्या सुपरतत्वाचा मानपान वाढत जातो आणि प्रत्येक क्रांतीकारी ठरलेल्या धर्माचे एक नक्षीदार फोलपट रहाते.

या साऱ्या श्रध्दाधारित धर्मांना छेद देणारी एक भूमिका आहे. ती आहे निरीश्वरवादाची. कुठेही ईश नाही, ईश्वर नाही, किंवा कधीकाळी होऊन गेलेल्या कुठल्याही प्रेषिताचा, ईश्वरी अंशाचा किंवा ईश्वरी दूताचा उपदेश हा सदासर्वकाळ कालानुरूप ठरू शकत नाही हे मत पटणे हे केवळ व्यक्तीनिष्ठच असते. तो प्रवास डोळे झाकून नव्हे तर सतत डोळे उघडेच ठेवून केला जातो आणि तो झुंडीने नव्हे तर आपला आपण करायचा असतो. आज या देशाचे लोक, तरूण ज्या वाटेवर आंधळेपणाने निघाले आहेत ते पाहाता त्यांना आता खरेच तथाकथित देवधर्माचा त्याग करून विवेकनिष्ठेचीच दीक्षा द्यायला हवी हे पटले होते. कुठल्याही महापुरुषाचा देव करून त्याने सांगितलेल्या तत्वांची गोवरी थापली जाते हे विष्णू-शिव-महावीर-बुद्धापासून ख्रिस्तापर्यंत आणि अल्ल्याच्या पयंबरापर्यंत दिसतच होते. देव नावाचा भ्रम हे आयुध विवेकवृत्तीशी थोडीशी ओळख व्हावी म्हणून मी मराठीत आणले.

जावेद अख्तर यांना हे पारितोषिक मिळाल्यानंतर आपल्या नेहमीच्या यशस्वी ट्रोलकलाकारांचे अकाउंट्स ओकू लागलेच आहेत. रवीश कुमार यांना मेगॅसेसे पारितोषिक मिळाल्यानंतरही बिचारे ओकूनओकून थकून गेले होते. पण हे पारितोषिक केवळ आणखी एक पारितोषिक म्हणून सोडून देण्यासारखे नाही. जनांचा प्रवाह ज्या दिशेने देवाचं नाव घेत निघालेला असतो, त्याला आडवं जात देवाचं नाव भ्रामक आहे हे सांगणं मोठं जोखमीचं असतं. आपण इतके दिवस एका भ्रमात जगत होतो हे समजून घेणं कुणालाच आवडण्यासारखं नसतं. अगदी घरातले सगळे करोनाने गेले किंवा घरदार वादळात उद्ध्वस्त झालं तरीही देव हा भ्रम आहे, धर्म हा बिनकामाचा आहे हे मान्य करणं शक्य होत नसतं. 

अशा मनोवस्थेतल्या बहुसंख्य समाजात आपले मत न भिता मांडणे ही दीक्षा आजवर अनेकांनी दिली असेल. पण प्रा. रिचर्ड डॉकिन्स यांनी ती गेली तीन दशकांपासून सातत्याने दिली आहे. त्यामुळेच विचक्षणा, चिकित्सा करणाऱ्या सर्वांना जावेद अख्तर नावाच्या एका भारतीयाला या नावाचा पुरस्कार मिळाला याचे कौतुक वाटणारच. 

mugdhadkarnik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...