आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिवादन:‘नीरज’प्राक्तनाचा वारसदार...

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिजात संगीतकारांसोबत अप्रतिम  काम करुनही योगेश आघाडीचे गीतकार झाले नाहीत.याचं कारण म्हणजे ते ज्या काळात लिहित होते तेव्हा मजरूह, आनंद बक्षी,इंदिवर,गुलजार, गुलशन बावरा, गुलजार अशा लोकप्रिय नि गुणवान गीतकारांची चलती होती. साहजिकच त्यांना फारच कमी संधी मिळाली. पण मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं! 

हिंदी चित्रपट गीतकारांमध्ये उर्दू शायरांचं प्राबल्य नि दबदबा आरंभापासूनच आहे. शकील बदायुनी-मजरूह सुलतानपुरी, कैफे आझमी, हसरत जयपुरी, साहीर लुधियानवी ते जावेद अख्तर आणि आताच्या इर्शाद कामिल, कौसर मुनीर,सईद कादरीपर्यंत ही परंपरा अबाधित आहे. तर दुसरीकडे शैलेन्द्र, भरत व्यास, इंदीवर, आनंद बक्षी, रवींद्र जैन, गुलजार ते अलीकडच्या समीर, प्रसून जोशी, स्वानंद किरकिरे, अमिताभ भट्टाचार्य अशी गैर मुस्लीम गीतकारांची पण सशक्त मांदियाळी आढळून येते. पहिला गट प्रामुख्याने उर्दू प्रचुर गाणी लिहिणारा तर नंतरचा हिंदीला प्राधान्य देणारा. यात आनंद बक्षी अपवाद. ते उर्दू, हिंदी नि पंजाबीचा सढळ वापर करायचे. शिवाय ते कवी, शायर ऐवजी जन्मजात गीतकार होते. मोजकीच पण आशयघन गाणी लिहिणारे  नि अलीकडेच दिवंगत झालेले योगेश दुसऱ्या गटातले. 

सचिनदेव बर्मन (उस पार,मिली) नि सलील चौधरी (आनंद, रजनीगंधा, अन्नदाता, मिनू, अग्नी परीक्षा, छोटीसी बात)  यांच्यासारख्या अभिजात संगीतकारांसोबत अप्रतिम  काम करुनही योगेश आघाडीचे गीतकार झाले नाहीत.याचं कारण म्हणजे ते ज्या काळात लिहित होते तेव्हा मजरूह, आनंद बक्षी,इंदिवर,गुलजार, गुलशन बावरा, गुलजार अशा लोकप्रिय नि गुणवान गीतकारांची चलती होती. साहजिकच त्यांना फारच कमी संधी मिळाली. पण मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं! प्रतिभावंत माणसं यशस्वी होतातच असं नाही आणि यशस्वी माणसं प्रतिभावंत असतातच असं नाही. (सर्वच क्षेत्रात हे आहे. पण सर्वसामान्यांना  मात्र सिनेमा आणि क्रिकेटमधलीच उदाहरणं माहीत असतात.) गीतकार योगेश पहिल्या प्रकारातले. कोणत्याही प्रकारची गाणी दर्जा राखून लिहिण्याची भरपूर क्षमता त्यांच्यापाशी होती. त्यांची गाणी  तत्कालीन राहुलदेव बर्मन, राजेश रोशन, उषा खन्ना अशा नामवंत संगीतकारांनी संगीतबद्ध केलीत. पण एका विशिष्ट संगीतकारासोबत त्यांची जोडी जमली नाही. याला कारण त्यांचा साधा-भोळा स्वभाव. ते काम मागायला कोणाकडे जात नसत. त्यांचा कोणी गॉडफादर पण नव्हता. उलट उमेदवारीच्या काळात त्यांनी त्यांचे सहप्रवासी गीतकार अनजान यांना मदत केली; सोबत गाणी वाटून घेतली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय, आर.डी.ला त्यांची गाणी आवडायची पण आनंद बक्षी, मजरूह, गुलजार, गुलशन बावरा मग योगेश असा त्यांचा  प्राधान्यक्रम होता. 

योगेश लखनऊचे... त्यांची उर्दूही उत्तम होती. पण त्यांना प्रामुख्याने बंगाली निर्माते,  दिग्दर्शक मिळाले. परिणामी इच्छा असूनही त्यांना चित्रपटात गझला लिहिता आल्या नाहीत. पण जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल तेव्हा त्यांनी उर्दूमिश्रित गाणी लिहिली. ‘सौ बार बनाके मलिक ने,  सौ बार मिटाया होगा, ये हुस्न मुजसिम तब तेरा, इस रंग पे आया होगा....’’ ह्या त्यांच्या गीताची ( चित्रपट- एक रात, गायक- रफी, संगीत- उषा खन्ना)  तारीफ दस्तुरखुद्द मजरूह यांनी केली होती. त्यांनी गायक मन्ना डे सोबत अनेक गैरफिल्मी गाणी केलीत. ती गाजलीही बऱ्यापैकी. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली सलीलदांच्या सुरावटीनी. ‘कई बार यू भी देखा है, ये जो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है, अनजानी प्यास के पीछे, अनजानी आस के पीछे मन दौडने लगता है..’’ या गाण्यासाठी (चित्रपट- रजनीगंधा) मुकेशला  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जीवनाचं तत्वज्ञान अतिशय सहज शब्दांत त्यांनी मांडलं..’जीन्होने सजाए यहां मेले, सुख-दुख संग संग झेले, वो ही चुनकर खामोशी, यू चले जाए अकेले कहां?’ किंवा ‘कभी सुख, कभी दुख, यही जिंदगी है, ये पतझड का मौसम घडी दो घडी है..नए फूल कल डगर मे खिलेंगे..उदासी भरे दिन कभी तो खिलेंगे.. अथवा ‘कभी यूही जब हुई बोझल सांसे, भर आई बैठे बैठे, जब यूही आंखे, तभी मचल के, प्यार से चलके, छुए कोई मुझ पर नजर न आए..’’

प्रेमगीतंही त्यांनी फार नजाकतीने लिहिली. ‘कि धूप मे खिला है चांद, दिन मे रात हो गई, ये प्यार की बीना कहे सुनहरी बात हो गई..’’,  ‘घटा,चांद, बिजली,बरखा,पवन मे; शामिल हो तुम मेरी हर कल्पना मे; तारीफ मेरी इतनी करो ना, उडने लगू मै आसमां मे..’’,  ‘ओ रे मन गा रे कोई गीत, जिसे सुनके जागे मेरा सोया सोया मीत..’’, ‘’ये दिन क्या आए लगे फूल हसने, देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने...’’  त्यांच्या अशा काव्यमय रचना कवी नि गीतकार नीरज यांची आठवण करून देतात. आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, बडी सुनी सुनी है जिंदगी ये जिंदगी.. यासारख्या गाण्यांमधून त्यांनी व्यक्त केलेला  दुःखाचा मंद-कातर-हळुवार भाव मनाला हुरहूर लावणारा आहे. असा एकही पावसाळा नाही की त्यांचं रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन.. हे सदाबहार पाऊसगीत आठवत नाही. आनंद, अन्नदाता, रजनीगंधा, बातो बातो मे, छोटीसी बात, मंझील, अग्नीपरीक्षा, मिली, प्रियतमा वगैरे चित्रपटांची गाणी लिहिणाऱ्या योगेश यांनी काही  दूरदर्शन मालिकांसाठीही गीतलेखन केलंय. 

एक मात्र नक्की, त्यांना अजून संधी मिळाली असती तर खूप भावपूर्ण गाणी त्यांनी दिली असती. तसेच गरजेपोटी गाणी लिहावी लागली  नसती तर ते हिंदीतले  दर्जेदार कवी झाले असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे योगेश हिंदीतले सुविख्यात कवी नीरज अर्थात गोपालदास सक्सेना यांच्यासारखंच नशीब घेऊन आले होते. नीरज यांना तुलनेने थोडी जास्त संधी मिळाली. पण ते मूलतः कवी असल्याने चित्रसृष्टीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर आपल्या काव्यविश्वात रममाण होऊन त्यांनी कवी म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली.  योगेश यांची नीरजसोबत तुलना नाही होणार पण दोघांचे सिने नशीब मात्र एकसारखे म्हणता येईल. शिवाय त्यांच्या गाण्यांतून नीरज यांची पुसटशी झलक  दिसून येते. या न्यायाने  योगेश  यांना नीरज प्राक्तनाचे  वारसदार म्हणायला हरकत नसावी !

gpraveen18feb@gmail.com 

संपर्क - ९४०३७७४५३०

बातम्या आणखी आहेत...