आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Dr Vinay Kate Rasik Article | How Effective Is Baba Ramdev's Coronil Medicine ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बाबा रामदेवांचा रामबाण किती गुणकारी ?

डॉ. विनय काटेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाबा रामदेव यांचा आजवरचा प्रवास विवादास्पद राहिलेला आहे. योग आणि प्राणायाम शिबिरापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू देशभक्ती, शाकाहार, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सरकारला आर्थिक सल्ले, स्वदेशी, संस्कृती, राष्ट्रवाद अशा गोष्टींना स्पर्श करत करत आयुर्वेदिक औषधालयामार्गे FMCG (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रापर्यंत आलेला आहे. या सर्व प्रवासात समस्त पक्षांच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी बाबा रामदेव यांच्यावर मोठी मेहेरनजर ठेवलेली आहे. कोरोनाच्या जागतिक साथीत जेव्हा जगभरातील लोकांना संशोधनातून येणारा आशेचा प्रत्येक किरण महत्वाचा आहे, तेव्हा कोरोनावरचे रामबाण औषध अशा प्रकारचे अशास्त्रीय दावे करून भारतीय लोकांची वैद्यकीय आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेबाबत सरकारने आणि ICMR सारख्या संशोधन संस्थांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.

२३ जून रोजी बाबा रामदेव यांनी एका भव्य प्रेस कॉन्फरन्समध्ये कोरोना (म्हणजे Covid19 असे या लेखापुरते समजावे) विषाणूवर तथाकथित रामबाण असणारे औषध Coronil तयार केल्याची माहिती सर्वांना कळवली आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. कोरोनाच्या साथीने सबंध जग आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या ज्वलंत प्रश्नांनी त्रस्त झालेले आहे. जगभरातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ९४ लाखांच्या पलीकडे गेलेला असून जवळपास ४.८ लाख लोक या आजाराने दगावले आहेत. भारताबाबत बोलायचं झालं तर बाधितांची एकूण संख्या ४.७ लाख आणि मृतांची संख्या १४,९०० पेक्षा जास्त आहे. ३१ डिसेंबर २०१९ रोजी या साथीबाबत चीनने जागतिक आरोग्यसंघटनेला (WHO) ला पहिली माहिती दिली. पुढे एक-दोन महिन्यातच चीनमध्ये झपाट्याने वाढलेले कोरोनाने बाधित रुग्ण, बळी आणि या रोगाचे तीव्र संसर्गजन्य स्वरूप पाहता जगभरातील आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण संबंधित संस्था या विषाणूपासून लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यावर औषध व लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्या. 

कुठलेही नवीन औषध बाजारात आणताना कराव्या लागणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी (ज्यात ३-४ टप्पे असतात) कित्येक वर्षे निघून जातात, म्हणून सध्या वेळ वाचवण्यासाठी इतर विषाणू आणि जिवाणूंच्या विरुद्ध वापरली जाणारी औषधे कोरोनाविरुद्ध किती गुणकारी आहेत यावर जगभर वैद्यकीय चाचण्या सुरू झाल्या. Roche, Gilead सारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्यापासून ते Glenmark सारख्या भारतीय औषध कंपनीपर्यंत असंख्य कंपन्यांनी विविध वैद्यकीय चाचण्या करून काही औषधांनी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये काही प्रमाणात फरक पडत असल्याचे सप्रमाण दाखवून दिले. अशा काही औषधांना कोरोनाविरुद्ध उपचार म्हणून सीमित स्वरूपात परवानगीही मिळाली. परंतु या कुठल्याही औषध कंपन्यांनी या औषधांनी कोरोना विषाणू समूळ नष्ट होतो हा दावा केला नाही. याउलट बाबा रामदेव यांनी मात्र Coronil हे आयुर्वेदिक बहूऔषधी किट वापरल्याने ६९% रुग्ण अवघ्या ३ दिवसात तर १००% रुग्ण ७ दिवसात कोरोनापासून मुक्त झाल्याचा दावा केला. त्या दाव्यासोबतच या औषध विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे हे सांगत त्याची सार्वत्रिक उपलब्धता आणि किंमतही जाहीर करून टाकली. 

...आणि इथेच प्रश्नांना सुरुवात झाली!

आयुष मंत्रालय, ज्याच्या अंतर्गत आयुर्वेदिक औषधे येतात त्यांनी बाबा रामदेव यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर काही तासांतच त्यांना कोरोनापासून मुक्तीचे कसलेही दावे करू नयेत, या औषधाची कोणतीही जाहिरात करू नये असे सांगतच त्यांच्याकडून या दाव्यांबाबत माहिती मागवली, आणि पुढील सूचना येईपर्यंत हे औषध विक्री करू नये असे आदेश दिले. बाबा रामदेव यांचा Coronil मुळे कोरोना नष्ट पावतो हा दावाही "जादुई औषध" ह्या प्रकारच्या दाव्यात मोडतो, जो करणे कायद्याचे उल्लंघन आहे हेही आयुष मंत्रालयाने सांगितले. आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांना Coronil या औषधीबाबत त्यांनी केलेल्या दाव्यांबाबत जे काही प्रश्न विचारले त्याचे दहा पानी उत्तर २३ जूनला संध्याकाळीच बाबा रामदेव यांच्या संस्थेने देऊन टाकले. या दहा पानी उत्तराचा व्यवस्थित अभ्यास केला असता अजूनच नवीन प्रश्न उभे राहतात, ज्यांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत.

१) उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागात परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी २४ जूनला प्रेसला सांगितले की त्यांनी Coronil ला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आयुर्वेदिक औषध म्हणून मान्यता दिली आहे. Coronil मुळे कोरोना विषाणू समूळ नष्ट होतात हा दावा बाबा रामदेव यांच्या संस्थेने औषधपरवाना मागताना केलेला नव्हता. त्यामुळे असा दावा करणे या अधिकाऱ्यांच्या मते अयोग्य आहे.

२) Coronil ने कोरोना विषाणू समूळ नष्ट होतो या दाव्यासाठी बाबा रामदेव NIMS जयपूर येथे केलेल्या वैद्यकीय चाचणीचा संदर्भ देतात, जी चाचणी २० मे रोजी नोंदणीकृत होऊन २९ मे रोजी सुरू झाली होती. NIMS जयपूर हे एक खासगी वैद्यकीय संस्थान आहे. २१ एप्रिल रोजी आयुष मंत्रालयाने एक आदेश काढून कोरोनासाठीच्या आयुर्वेदिक औषधांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी एक नियमावली प्रसिद्ध केली होती. या नियमावलीनुसार या चाचण्यांची माहिती आणि त्यांचे निष्कर्ष आयुष मंत्रालयाला अवगत करणे अनिवार्य होते. २० मे रोजी नोंदणीकृत झालेल्या या चाचणीबाबत आयुष मंत्रालयाला खूप उशिरा म्हणजे २ जून रोजी कळवले गेले. आणि सर्वात विशेष म्हणजे या चाचणीचे निष्कर्ष २३ जूनच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर स्वतः आयुष मंत्रालयाने विचारणा केल्यानंतर त्यांना अगदी थोडक्यात सांगण्यात आले. त्या चाचणीचे सविस्तर निष्कर्ष अजूनही सर्वांना उपलब्ध नाहीये.

३) रामदेव यांच्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार NIMS जयपूर येथे झालेल्या वैद्यकीय चाचणीत १२० रुग्ण सहभागी झाले होते, त्यातले काहीजण Coronil घेत होते तर काही जण Placebo (कसलाही परिणाम नसणारे औषध) गटात होते. पण नेमके किती रुग्ण कोणत्या गटात होते याची माहिती नाही. Placebo आणि औषध अशा दोन समांतर गटांचा विचार करता या चाचणीत सहभागी असणाऱ्या रुग्णांची १२० ही एकूण संख्या ही खूप आश्वासनात्मक नाहीये. Placebo गटातल्या लोकांपेक्षा ज्यांना Coronil औषध दिले गेले त्यांच्यात ३५% अतिरिक्त सुधारणा होती. पण जर फक्त ७ दिवसांत Coronil दिलेले १०० % रुग्ण कोरोनापासून मुक्त होत असतील तर Placebo असणारे रुग्णही कदाचित ९-१० दिवसांत १०० % कोरोनापासून मुक्त होत असतील, कारण या चाचणीत कुणीही रुग्ण मेल्याचा उल्लेख नाहीये. या चाचणीच्या आराखड्यात १४ व्या दिवशी रुग्णांची तपासणी करण्याची तरतूद होती, पण Placebo गटातल्या रुग्णांची १४ व्या दिवशीची तपासणी केल्याचा उल्लेखच नाहीये.

४) वैद्यकीय चाचणीत कुठले रुग्ण सहभागी होऊ शकतात याचे काही नियम संशोधन करणारी संस्था/व्यक्ती बनवते, ज्याला inclusion criteria म्हणतात. या चाचणीत सहभागी झालेले १५ ते ८० वयोगटातील जे १२० कोरोनाबाधित रुग्ण होते त्यांना एकतर कुठलेही लक्षण नव्हते किंवा अत्यंत सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे होती. ज्या रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९०% पेक्षा कमी होते, ज्यांना श्वसनाचा त्रास होता किंवा जे अतिरीक्त आजारांनी ग्रस्त होते अशा लोकांना या चाचणीतून वगळले गेले होते. थोडक्यात या चाचणीत फक्त लक्षण नसणारे आणि सौम्य व मध्यम लक्षणे असणारे लोकच सहभागी झाले जे तसेही त्यांच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीने बरे होणार होते. त्यामुळे यातून Coronil औषधाची परिणामकारकता म्हणावी अशी सिद्ध होत नाही. आणि ज्यांना थोडीही तीव्र लक्षणे होती त्यांना तर या चाचणीतूनच वगळून टाकण्यात आले. थोडक्यात या चाचणीत Coronil च्या जागी इतर कुठलेही आयुर्वेदिक औषध दिले असते तरी त्याने निष्कर्षात विशेष काही फरक पडला नसता.

वरील सर्व मुद्द्यांवर विचार केला असता एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते ती अशी की आयुष मंत्रालयाने २१ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या नियमावलीत त्यांनी कोरोना विषाणूच्या आजाराबाबत आयुष औषधांच्या (आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध इत्यादी) वैद्यकीय चाचण्या घेताना त्यात ICMR किंवा आयुष मंत्रालय कडून पूर्वपरवानगी घ्यावी अशी कोणतीही अट टाकलेली नाही. याच पळवाटेचा फायदा घेऊन बाबा रामदेव आणि अजूनही बरेच लोक या कठीण काळातही मनाला येईल तशा वैद्यकीय चाचण्या करत आहेत, ज्यात placebo गटात असणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी तर नक्की खेळ होऊ शकतो कारण त्यांना कुठलेच औषध दिले जात नाही. अशा कमकुवत वैद्यकीय चाचण्या करून या लोकांकडून मोठमोठाले दावे केले जात आहेत. आधुनिक वैद्यकीय औषधांच्या चाचण्या करताना आणि त्यावर औषधपरवाना देताना CDSCO (अमेरिकेतल्या FDA ला समांतर भारतीय संस्था) जितक्या काटेकोरपणे समीक्षा करते तशी समीक्षा आयुष मंत्रालय करत नाही. याचा गैरफायदा बाबा रामदेव आणि इतरही बऱ्याच आयुष कंपन्या वरचेवर घेत आल्या आहेत.

बाबा रामदेव यांचा आजवरचा प्रवास विवादास्पद राहिलेला आहे. योग आणि प्राणायाम शिबिरापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू देशभक्ती, शाकाहार, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सरकारला आर्थिक सल्ले, स्वदेशी, संस्कृती, राष्ट्रवाद अशा गोष्टींना स्पर्श करत करत आयुर्वेदिक औषधालयामार्गे FMCG (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रापर्यंत आलेला आहे. या सर्व प्रवासात समस्त पक्षांच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी बाबा रामदेव यांच्यावर मोठी मेहेरनजर ठेवलेली आहे. भारतीय मीडियाने बाबा रामदेव यांच्या प्रत्येक अशास्त्रीय दाव्याला कसलीही शहानिशा न करता आजवर प्रसिद्धी दिलेली आहे, ज्याचे कारणही खूप उघड आहे. बाबा रामदेव यांची संस्था भारतीय मीडियाला जाहिराती पुरवण्यात सर्वात आघाडीवर आहेत. वैद्यकीय व औषधी संशोधन करणाऱ्या इतर संस्था बाबा रामदेव यांच्या दाव्यांबाबत कुठलाही आक्षेप घेण्यापासून दूर राहतात कारण एकाच वेळी राजकीय नेते आणि मीडिया यांना अंगावर घेण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये. आणि इथेच बाबा रामदेव यांचे फावते आणि ते नवनवीन अशास्त्रीय दावे करत राहतात.

बाबा रामदेव यांनी मागेही अनेकवेळा आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचे किंवा टाळण्याचे अशास्त्रीय दावे केलेले आहेत. आणि दरवेळेस सरकारी यंत्रणा आणि वैद्यकीय संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. या सततच्या दुर्लक्ष करण्याने बाबा रामदेव आणि त्यांची संस्था स्वतःला आयुष मंत्रालय, ICMR आणि आरोग्य मंत्रालयापेक्षा मोठे समजू लागले आहेत. म्हणूनच आयुष मंत्रालय किंवा सरकारी नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था यांना कसलीही माहिती न देता बाबा रामदेव नेहमीप्रमाणे थेट प्रेससमोर अवतीर्ण होऊन भलेमोठे दावे करून बसले. कोरोनाच्या जागतिक साथीत जेव्हा जगभरातील लोकांना संशोधनातून येणारा आशेचा प्रत्येक किरण महत्वाचा आहे, तेव्हा अशा प्रकारचे अशास्त्रीय दावे करून भारतीय लोकांची वैद्यकीय आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेबाबत सरकारने आणि ICMR सारख्या संशोधन संस्थांनी कठोर पावले उचलली पाहिजेत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आणि आर्थिक दंड आकारून अशा गोष्टी थांबवण्यासाठी पथदर्शी उदाहरणे तयार केली पाहीजेत.

p11vinayjk@iima.ac.in

बातम्या आणखी आहेत...