आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीएचबी'च्या कथा अन व्यथा...:आमच्या "क्लॉक हावर बेसिस' मृत्यूचं काय करायचं?

डॉ. विनायक येवले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्वत्थाम्याच्या कपाळावर जशी सतत रक्त- पुवाने माखलेली भळभळती जखम आहे. त्या जखमेवर लावायला तो दारोदार तेल मागत भटकतोय असं आजही बोललं जातं. तश्शीच आमच्या माथ्यावर बेकारीची नासूर जखम आहे. ही जखम इथल्या कौरव-पांडवादी स्वार्थलोलुप शासनकर्त्यांनी आमच्या कपाळावर दिली आहे. आम्ही हीच जखम घेऊन संस्थाचालकांचे, मध्यस्थांचे, दलालांचे उंबरठे वर्षानुवर्षे झिजवतोय. आम्हीही बेकारीने शापित आहोत. नोकरी मिळत नाही. डावलल्याच्या डागण्या अंगभर साचत चालल्यात. जखम वरचेवर चिघळतेय. घुसमट वाढतेच आहे.

अश्वत्थाम्याच्या कपाळावर जशी सतत रक्त- पुवाने माखलेली भळभळती जखम आहे. त्या जखमेवर लावायला तो दारोदार तेल मागत भटकतोय असं आजही बोललं जातं. तश्शीच आमच्या माथ्यावर बेकारीची नासूर जखम आहे. ही जखम इथल्या कौरव-पांडवादी स्वार्थलोलुप शासनकर्त्यांनी आमच्या कपाळावर दिली आहे. आम्ही हीच जखम घेऊन संस्थाचालकांचे, मध्यस्थांचे, दलालांचे उंबरठे वर्षानुवर्षे झिजवतोय. आम्हीही बेकारीने शापित आहोत. नोकरी मिळत नाही. डावलल्याच्या डागण्या अंगभर साचत चालल्यात. जखम वरचेवर चिघळतेय. घुसमट वाढतेच आहे. या कलंकित बेकारीच्या जखमेला लावायला तेल कधी मिळेल माहीत नाही. संयम तरी किती धरावा? आशावाद तेवत ठेवण्याची कसरत तरी किती करावी? या शतखंडित अवस्थेचं काय करावं? पुरता भोवरा झालाय.

नाकारल्या गेल्याची एक जखम तुमच्यासमोर सोडतोय...

नांदेडच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मी आणि माझा मित्र विनायक पवार मुलाखतीसाठी गेलो होतो. ही चार वर्षांपूर्वीची घटना आहे. आम्ही दोघंही कविता लिहितो. विशेषतः पूर्वी मी ज्या महाविद्यालयात बी.ए. ची पदवी पूर्ण केली, तिथेच मराठीची जागा रिक्त झालेली होती. जाहिरात आली, अर्ज केला, रितसर कॉल लेटर आले. जागतेपणीच मनात बिन अवयवांचं एक स्वप्न उगवून आलं. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिथेच मी प्राध्यापक म्हणून शिकवतोय असं ते स्वप्न होतं.पण ते स्वप्नं फारच करुणपणे भंगलं. कारण ते कॉलेज डोनेशन घेत नाही आणि गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे अशी सगळीकडे बोलवा होती. मुलाखत देऊन आल्यावर तो भ्रमही तुटला. मराठीच्या एका जागेसाठी उमेदवारांची संख्या दिडशेच्या आसपास असेल. त्यातले सगळेच बेकार किंवा "सीएचबी'च्या झापडबंद घाण्याचे बैल म्हणून वेठबिगारी करणारे. आमचा मुलाखतीचा नंबर सायंकाळी ७ वाजता आला. अंधार दाट पसरला होता. सगळं कॉलेज बंद झालं होतं. फक्त प्राचार्याच्या अॉफिसमधील लाईट तेवढेच चालू होते. कारण मुलाखती तिथेच घेतल्या जात होत्या. विनायक आत जाऊन आला. त्याने बाहेर येताच एक जोरदार शिवी हासडली. छातीशी कागदपत्रांची फाईल अन् विनायक पवार या मित्राने दिलेली शिवी बोटांच्या चिमटीत पकडून अॉफिसमध्ये शिरलो.

आत जाताच सकाळपासून दुर्लक्षित केलेली भूक उसळी मारून वर आली. टेबलावरच्या प्लेटमधील काजू, बदाम, मनुके आणि बिस्किटांवर अलगद नजर जाऊन बसली, अगदी माशी बसावी तशी. परंतु ती भुकेची माशी क्षणभरात मीच उडवून लावली. मुलाखत द्यायला आल्याचे भान आले. समोर सात लोकं... संस्थाचालक, सचिव, प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, VC नॉमिनी आणि दोन विषयतज्ज्ञ. जे विभागप्रमुख होते त्यांनी मला ओळखले. त्यांनी मला बी.ए.ला शिकवले होते. दोन विषयतज्ज्ञ यांनी सुद्धा ओळखले. कारण मी कविता लिहितो. तिघेही ओळखीचं हसले. मुलाखत सुरू झाली. एकीकडे कागदपत्र तपासणी आणि दुसरीकडे प्रश्नोत्तरे. विषयानुषंग म्हणून किंवा शेवटचा कँडिडेट म्हणून उपचार भावनेने दोन प्रश्न तज्ज्ञांनी विचारले. उत्तरे दिली. पुढे एका विषयतज्ज्ञाने "तुम्ही कवी आहात तर तुमच्या दोन कविता म्हणा" असे सुचवले. मी काहीसा अस्वस्थ झालो. पण स्वतःला शांत ठेवत एक कविता म्हटली. वामनाच्या तीन पावलांप्रमाणे तीन प्रश्नांमध्ये मी जमिनीत गाडला गेलो. मुलाखत संपली. कागदपत्र विभागप्रमुख तपासून मार्क टाकत होते. म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा तुम्हाला पुरस्कार आहे पण त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत." मी विचारले, "असे का?" ते म्हणाले, "विद्यापीठाने ठरवून दिलेल्या गुणतालिकेत पुरस्काराचा स्वतंत्र रकाना नाही. त्यामुळे त्याचे गुण तुम्हाला देता येणार नाहीत." मी काहीही बोललो नाही. मुलाखत संपल्याचा संकेत अगोदरच मला मिळाला होता. कागदपत्रांची अस्ताव्यस्त चळत घेऊन बाहेर पडलो. विनायकने मगा दिलेली शिवी आठवली. त्यालाही कविताच म्हणायला लावली हे बाहेर आल्यावर समजले. त्याने शिवी तरी हासडली होती. मी तर तेही करू शकलो नाही... नपुंसक.

सगळा फुफाटा जमिनीवर बसल्यावर कळले, मुलाखत केवळ उपचार होती. ३५ लाख डोनेशनचा आर्थिक व्यवहार अगोदरच सुमडीत होऊन मराठी विषयाची जागा अगोदरच विकली गेली होती. पुढे दोन वर्षांनी ३५ लाख पेडधारी "मराठीचा तोच प्राध्यापक' माझ्या मित्राकडे मुद्रितशोधनाचे बाड घेऊन आला. म्हणाला, "आमच्या संस्थाचालकाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्या निमित्ताने तयार होणाऱ्या गौरवग्रंथाच्या संपादकाची जबाबदारी माझ्यावर पडलीय. तू ते काम करून दे किंवा मला एखादा प्रुफरिडिंग करणारा शोधून दे'. माझ्या मित्राकडे अगोदरच मुद्रितशोधनाची खूप कामं पेंडींग होती. मग माझ्या मित्राने मला फोन करून विचारलं. मित्रामुळे मी ते काम केलं. पैसेही मिळणार होते; तेही मराठी विषयाच्या प्राध्यापकाच्या थेट खिशातून. अशी आहे आपल्या शिक्षणव्यवस्थेची हिणकस गुणवत्ता आणि आपमतलबी गुणग्राहकता. पदरमोड करून, जमीन विकून, व्याजी काढून पाई पाई जमवलेल्या आपल्याच डोनेशनच्या पैशाने हे निवडून येतात. निर्णयप्रक्रियेत जाऊन बसतात आणि मनमानी धोरणं आपल्यावर लादतात. शिक्षणसंस्थांच्या वळचणीला फिरणारे राजकारण आणि राजकीय अड्डे बनलेल्या शिक्षणसंस्था जोपर्यंत एकत्र नांदत आहेत तोपर्यंत गरिबांना शिक्षण आणि नोकऱ्या मिळणे कठीण होणार आहे.

आपली शिक्षणव्यवस्था उपाययोजनांपेक्षा तात्पुरत्या उपचाराच्या धोरणांवर पोसलेली आहे. ती तशी आहे म्हणूनच समाजात बेकारीचा महारोग वाढत चाललाय. मी तर म्हणेन की, केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया अंमलात न आणणे आणि "सीएचबी'चे तात्पुरते मलमी धोरण वर्षानुवर्षे चालवणे हे फार मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र शासनप्रणित आहे. इथे मी थोड्या वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधू इच्छितो. तो असाः ज्या ज्ञानशाखांमधून (मानव्यविद्याशाखा आणि सामाजिक शास्त्रे) विचार करणारा, विचार पुढे नेणारा, हक्कांची मागणी करणारा, लढणारा, व्यवस्थेला प्रश्नांच्या कोंडीत पकडणारा बुद्धिजीवी वर्ग तयार होतो त्या ज्ञानशाखाच उद्ध्वस्त करण्याचे धोरण अलीकडे अवलंबिले जात आहे. हे धोरण राबवणारे राज्यकर्ते, धोरण तयार करणारे राज्यव्यवस्थेचे हस्तक (उद्योगपती, संस्थाचालक) या उद्ध्वस्तीकरण प्रक्रियेच्या पाठीमागे आहेत. संवैधानिक हक्काची मागणी करणाऱ्यांना, गुणवत्तेने परिपूर्ण असणाऱ्यांना, परिवर्तनाची चाड असणाऱ्यांना त्या त्या क्षेत्रात प्रवेश केला जाऊ देत नाही. त्यांना परिघाच्या बाहेरच झुलवत ठेवले जाते. गुणवत्ताधारकांना केवळ "सीएचबी' सारखा तात्पुरता तुकडा देऊन भाकरीशी जखडून ठेवले जाते. विवेक, आत्मभान व अस्मितेपर्यंत पोचूच द्यायचे नाही असे समांतर धोरण आखून कौशल्याधिष्ठित शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवून केवळ पोटार्थीच करून टाकले जाते. हेच आपल्या शिक्षणव्यवस्थेचे काळे चित्र आणि भेसूर चरित्र आहे.

ग्रामीण भागात 'माय जेवू घालीना अन् बाप जगू देईना' अशी म्हण रूढ आहे. या म्हणीचा मतितार्थ आणि शिक्षणव्यवस्थेतले "सीएचबी' प्रकरण एकच आहे. या "सीएचबी' मध्ये ना धड जगणे आहे ना धड मरणे आहे. तासिका तत्त्वधारकांना महिन्याकाठी साडे सहा हजार रु वेतन मिळतं. (वास्तविक हे वेतन सत्रांती किंवा वर्षाच्या शेवटी दिलं जातं) मग असा एक व्यवहारिक प्रश्न पडतो की, जे शिक्षणव्यवस्थेबाबतीत निर्णय घेणारे वा धोरण ठरवणारे आहेत ते लोक साडे सहा हजारांमध्ये आपला संसार चालवून दाखवतील का? खरंतर हा अन्याय कुणालाच कसा बोचत नाही. खरं तर "सीएचबी' हे गुणवत्ताधारकांचे दमन आणि शोषण करण्याचा सुनियोजित कट आहे. राज्यकर्ते आणि संस्थाचालक यांच्यातील मिलिभगत तासिकातत्त्वावर काम करणाऱ्यांच्या मानसिक हत्येला प्राय आणि अंततः कारणीभूत आहेत.

अंततः आम्ही वेठबिगारीला कंटाळलो आहोत. या बेकारीला पिडलो आहोत. शिक्षणव्यवस्थेची अन्यायकारक धोरणे निकाली निघाल्याशिवाय इथल्या शिक्षणव्यवस्थेचे आणि पर्यायाने समाजाचे काहीएक भले होणार नाही. ही शासनप्रणीत धोरणे आम्हाला हक्काच्या नोकऱ्यांपासून दूर ठेवणारी आहेत. कुठेच अंमलात नसलेले हे तासिकातत्त्व धोरण महाराष्ट्रातही बंद करायला हवे. केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया अंमलात यावी यासाठी सगळ्यांनी एकत्र राजसत्तेला वेठीस धरायला हवे. गुणवत्ता असलेल्यांचे हक्क न मारणारी समन्यायी व्यवस्था कधीतरी आकारास येईलच. तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहणार. प्रश्न शेवटच्या ओळीत. मी 'क्लॉक हावर बेसिस मृत्यू' या शीर्षकाची दोन वर्षांपूर्वी एक कविता लिहिली होती. त्यातील तीन ओळी उद्धृत करून थांबतो.

"आम्ही फक्त कॅलेंडरची पानं पालटतोय

बरकतीचा दिवस उजाडला नाही मागच्या कित्येक वर्षात

आमच्या क्लॉक हावर बेसिस मृत्यूचं काय करायचं तुम्हीच सांगा?

yewalevinayak@gmail.com

लेखकाचा संपर्क - 9096999865