आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:बा विठ्ठला...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज आषाढी एकादशी. भागवत संप्रदायाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत या दिवसाची आणि एकूणच यंदाच्या वारीची वेगळ्या अर्थाने नोंद होणार आहे. जगाला ग्रासलेल्या कोरोना महामारीने पंढरीच्या विठुरायाची वारी खंडित केली. ही ‘चुकलेली’ वारी लाखो वारकऱ्यांना आयुष्यभर हुरहूर लावणारी आहे. देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो।। चरण न सोडीं सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा।। अशा निग्रहाने विठ्ठलाच्या भक्तीत रमणाऱ्यांची, त्याच्या ओढीने पंढरी गाठणाऱ्यांची पावले एका विषाणूने रोखली. आजवर अनेक नैसर्गिक आपत्ती, महामारी आल्या, पण असे कधी झाले नाही. माउली-तुकोबांसह सर्व संतश्रेष्ठांचे पालखी सोहळे रद्द झाले. त्या-त्या तीर्थस्थानी ठरलेल्या दिवशी पालख्या निघाल्या आणि तिथेच विसावल्या. वारीला जाऊ न शकलेला सामान्य वारकरी हताशपणे हे सारे पाहून आपल्या घरातूनच हात जोडत होता. केला नेम चालवी माझा.. असे साकडे दरवर्षी सावळ्या परब्रह्माला घालणाऱ्यांना यंदा हा नेम चुकल्याची सल वाटणे स्वाभाविकही आहे. पण, महाराष्ट्राच्या जनमानसावर संतांच्या शिकवणीने पिढ्यान््पिढ्या केलेले संस्कार इतके खोलवर रुजले आहेत की अशा मानसिक- भावनिक द्वंद्वाच्या प्रसंगातही वारकरी कधी खचला नाही. 

दुसऱ्यासाठी जगण्याची, सकळ प्राणिमात्रांवर प्रेम करण्याची, सर्वांशी बंधुत्व जोपासण्याची प्रेरणा देणारा वारकरी संप्रदाय हा जगातील एकमेव भक्ती संप्रदाय आहे, जो केवळ ईश्वरावरील श्रद्धा आणि संतांच्या शिकवणीमुळे शतकानुशतके टिकून राहिला आहे, दिवसेंदिवस आणखी विस्तारत चालला आहे. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारी आणि त्याच वेळी ‘आपुलाचि संवाद आपणांसी’ म्हणत अंतर्मुख होऊन आत्मशुद्धीचा मार्ग शोधणारी ही अलौकिक परंपरा केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे वैभव आहे. या परंपरेचे पाईक आपल्या कायेला पंढरी अन् आत्म्यालाच विठ्ठल मानतात. अशा सर्वांच्या मनात आज एकच भावना असेल... ‘बा विठ्ठला.. जिथे साक्षात तूच वसला आहेस, त्या मनाला दु:ख, भय कसे शिवेल? या संकटातूनही तूच तारून नेशील... तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, जनात अन् मनात रात्रंदिन युद्धाचा प्रसंग उभा ठाकला असला तरी तुझ्या नामाच्या, भक्तीच्या बळावर अवघ्या संकटांचे तोंड काळे करू.. फक्त आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस!’

0