आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:लंकेतला डंका चिंतेचा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेतील सार्वत्रिक निवडणुकांनंतर महिंदा राजपक्षे पुन्हा पंतप्रधान झाले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचे धाकटे बंधू गोतबाया राजपक्षे राष्ट्राध्यक्ष झाले. लंकेची सगळी सत्ता सूत्रे आता राजपक्षे बंधूंच्या ताब्यात आहेत. त्यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीच्या विजयाबद्दल कोणाला आश्चर्य वाटत नाही. पण त्यांना व मित्र पक्षाला मिळून दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा मिळाल्याने विरोधक आणि महिंदांनाही धक्का बसला. मावळत्या संसदेतील १०६ खासदार असलेल्या युनायटेड नॅशनल पार्टीला फक्त एक जागा मिळाली. हे पाशवी बहुमत आणि जोडीला सत्तेच्या मुख्य खुर्च्यांवर दोघे बंधू यामुळे ते आता कोणतीही घटना दुरुस्ती करू शकतात. चीनमध्ये जीनपिंग व रशियात पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षाचा कालावधी वाढवून घेतला, तसे राजपक्षे यांनी केले तर आश्चर्य वाटू नये. लंकेच्या उत्तर आणि पूर्व भागात तमीळ लोक खूप आहेत. २२ लाख मतदार असताना त्यांच्या पक्षाचे फक्त नऊ खासदार निवडून आले. तमिळांनी केलेले बंड मोडून काढताना आजचे राष्ट्राध्यक्ष संरक्षण सचिव होते. आता सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तमीळ जनता राजपक्षे यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

लंका बऱ्याच गोष्टींवर भारतावर अवलंबून असायची. पण तमिळींचे बंड आणि अंतर्गत घडामोडीत भारत हस्तक्षेप करत असल्याच्या भावनेमुळे हे अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न राजपक्षे २००५ पासून करत आहेत. त्यासाठी त्यांनी पाकच्या मदतीने चीनला जवळ केले. राजपक्षे बंधूंचे चीनधार्जिणे धोरण ही भारताची गंभीर चिंता आहे. भारताला दूर ठेवण्यासाठी चिनी गुंतवणुकीला ते प्रोत्साहन देऊ लागले. चीन हंबनतोता बंदर विकसित करीत आहे. चीनपासून लंकेला दूर करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे, तिथे गुंतवणूकही करतो आहे. पण दोघा भावांची साथ नाही. चीनला मात्र साथ एवढ्या टोकाची आहे की, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरासाठी दिलेली जमीन काढून घेत त्यांनी ती हॉटेल उभारणीसाठी चीनला दिली. दक्षिण अशियातील प्रत्येक देशात चीनची अार्थिक घुसखोरी वाढते आहे. कर्जाखाली एवढे दाबायचे, की त्या देशाने आवाज काढू नये, हेच त्यांचे धोरण आहे. आता राजपक्षेंची निरंकुश सत्ता आहे. पण ती चीनसारख्या कावेबाजांकडून चालवली जाईल, तेव्हा त्याची काय किंमत मोजावी लागेल, हे लंकेला आज कळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...