आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:आवाज ‘घरच्या धुण्या’चे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हे घर तसं शांत, संयमी लोकांचं म्हणूनच ओळखलं जायचं. पण, एकाएकी तिथून आपटाआपटीचे आवाज येऊ लागले. एरवी तिथून शिस्तीचे पाठ अन् नैतिकतेच्या गप्पांचाच आवाज ऐकण्याची सवय असलेल्यांना हा आवाज वेगळा असल्याचं जाणवलं, पण तो नेमका कशाचा, हे कळत नव्हतं. तो स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा वा दिवाणखान्यातल्या तंट्यांचाही नव्हता. मात्र, तो न्हाणीतून येतोय, हे फारशी शोधाशोध न करता सगळ्यांनाच समजलं. हा आवाज धुण्याचा होता, असं घरच्या कर्त्यानंच सांगून टाकलं आणि आपण मात्र तसं कधीच करत नाही, हेही बजावलं. आपण तसे खूप संयमी असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यांचे हे शब्द हवेत विरण्याआधीच पुन्हा धोपटण्याचे, पिळण्याचे, झटकण्याचे आवाज येत राहिले...

कोरोनापासून कंगनापर्यंतच्या अनेक मुद्द्यांना आडून-पाडून हवा देत उद्धव ठाकरे सरकारची कोंडी करण्यात गुंतलेल्या भाजपच्या घरातील धुण्याची ही कहाणी आहे. या धुण्याची सुरूवात अर्थातच अलीकडच्या रिवाजाप्रमाणे एकनाथ खडसे यांनी केली. पक्षात आपली उपेक्षा सुरू असल्याची त्यांची खंतावली गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू आहे. आजवर नाव न घेता टीका करणाऱ्या नाथाभाऊंनी परवा थेट देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन हल्ला चढवला. एका अर्थाने आता त्यांचा संयम ढळत चालल्याचेच हे लक्षण आहे. आपल्यावरील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, त्यामुळे आपण निर्दोष आहोत. आपल्याला जो त्रास झाला, त्याला फडणवीसच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एरवी त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या फडणवीसांनी यावेळी मात्र, ‘नाथाभाऊ आमचे नेते आहेत,’ असे सांगत त्यांचे आक्षेप शिताफीने खोडून काढले. हे करताना, ‘माझ्यामध्ये फार पेशन्स आहेत,’ असे ते म्हणाले असले, तरी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतूनच त्यांचाही संयम ढळू लागल्याचे स्पष्ट होते. तिकडे स्वतः फडणवीस निवडणूक प्रभारी असलेल्या बिहारमध्ये भाजपने ‘सुशांत कार्ड’ वापरण्यास सुरूवात केल्यामुळे शिवसेनेने तिथे ‘खडसे कार्ड’ प्रचारात आणले आहे. भाजपच्या राजकारणाला शह देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी आघाडीलाही हे कार्ड सोयीचेआहे. त्यामुळेच कदाचित आपली सफेदी सर्वांत जास्त असल्याचे सांगणाऱ्या घरातल्या कपड्यांच्या धुण्याचे आवाज साऱ्या गावाला ऐकू येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...