आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:दुर्घटनेचे बळी की दुर्व्यवस्थेचे?

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • देशात एकीकडे कोरोनाचे संकट तीव्र होत आहे, तर दुसरीकडे एकामागोमाग एक दुर्घटना घडत आहेत.

देशात एकीकडे कोरोनाचे संकट तीव्र होत आहे, तर दुसरीकडे एकामागोमाग एक दुर्घटना घडत आहेत. विशाखापट्टणमच्या वायुगळतीची बातमी ताजी असतानाच औरंगाबादजवळ १६ मजूर रेल्वेखाली चिरडले गेल्याची सुन्न करणारी घटना घडली. हे मजूर रेल्वेने मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी जालन्यावरून औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण, मालगाडीच्या रूपाने मृत्यूच रुळावरून धडधडत आला आणि दमून रुळावरच झोपलेल्या या कष्टकऱ्यांना घेऊन गेला. त्यांचा अपराध हाच की ते रुळावरच झोपले. पण, त्यांच्यावर ही आत्मघाताची वेळ अव्यवस्थेमुळे आली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

देशात लॉकडाऊन सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. एकीकडे उन्हाळा कडक होऊ लागला असताना लॉकडाऊनमुळे होरपळलेल्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. पंतप्रधानांनी २४ मार्चला पहिला लॉकडाऊन जाहीर केला आणि पुढे तो वाढवला गेला. पण, विविध राज्यांत उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या कष्टकऱ्यांवर काय वेळ येईल, याचा अंदाज सरकारला आला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काही नियोजनच केले गेले नाही. परिणामी मूळ गावी जाण्यासाठी हजारो मजुरांची कुटुंबकबिल्यासह रस्त्यांवर फरपट सुरू झाली. भर उन्हात शेकडो किलोमीटरचे अंतर कापत तांडेच्या तांडे या राज्यातून त्या राज्यात निघाले. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यकच होता, पण जनता कर्फ्यू ते पहिला लॉकडाऊनदरम्यानच्या दोन-तीन दिवसांत अशा संभाव्य परिणामांवरचे उपायही तयार ठेवता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पिच्छा पुरवल्यावर गेल्या आठवड्यापासून स्थलांतरित कामगारांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. त्यातही वैद्यकीय प्रमाणपत्रापासून तिकिटाच्या खर्चापर्यंत अनेक बाबतीत स्पष्टता आणि नियोजनाचा अभाव यामुळे पुन्हा अराजकाची स्थिती निर्माण झाली. घराची काळजी आणि ओढ लागलेले लोक सैरभैर झाले. त्यामुळेच चिरडलेल्या मजुरांचा बळी मालगाडीने घेतला की दुर्व्यवस्थेने, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठ थोपटून घेण्यासाठी आततायीपणे घेतलेला निर्णय आपल्याच लोकांच्या मुळावर उठला आहे. 

अन्य देशांत अडकलेल्यांसाठी विमाने, नौदलाच्या बोटींची व्यवस्था करताना देशात अडकलेल्यांचा विचार तितक्या तत्परतेने आणि सुनियोजितपणे होऊ नये, हे सरकारचे अपयश म्हणावे लागेल. लॉकडाऊन किती असावा, त्याला पर्याय आहे की नाही, हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण, लॉकडाऊनचे नियोजन कसे हवे किंवा ते कसे करणे गरजेचे होते, यावर विचारमंथन व्हायला हवे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली हे खरेच; मात्र त्याच्या गैरनियोजनामुळे देशातील जनता होरपळतेय, हकनाक जीव गमावतेय त्याचे काय? रोजची उपासमारी आणि त्यातच महामारी पाठीशी लागलेला गरिबातील गरीबही संयमाने साथ देत असताना सरकारने त्याला आधी हात दिला पाहिजे. तसे झाले तर ते आयुष्याची वाट सोडून भलत्याच रुळावर भरकटणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...