आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:रुग्णांचा फुटबॉल करू नका!

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • काेराेना संसर्गितावर उपचार हाेऊ शकले नाहीत तर ती व्यक्ती काही तासांतच अनेकांना बाधित करते.

राजधानी दिल्लीतील पाेलिस दलातील ३१ वर्षांचा तरुण. तो या महामारीच्या विराेधात सुरू असलेल्या युद्धाच्या माेहिमेवर तैनात हाेता. त्याला काेराेनाचा संसर्ग झाला आणि ३० तास तो मृत्यूशी झुंज देत राहिला. मात्र, दिल्लीतील तीन रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने अखेरीस प्राणास मुकला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नाेएडामध्येही एक पाेलिस कर्मचारी उपचारासाठी उंबरठे झिजवत फिरत राहिला आणि रुग्णालये त्याला नियम समजावत दाखल करून घेण्यास नकार देत राहिली. अखेर अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला दाखल करून घेतले गेले. बहुतेक राज्यांतील जिल्हा प्रशासन आणि आराेग्य विभागातील अधिकारी आता काेराेनाबाधितांची संख्या कमी असल्याचे दाखवण्यात गुंतले आहेत. कारण, जे जिल्हाधिकारी शेजारच्या जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची माहिती हिरीरीने देत हाेते, त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतले. परिणामी, गुन्हेगारी कारवायांमध्ये घट हाेत असल्याचा अहवाल देण्याची पाेलिसी परंपरा आता मुलकी प्रशासन व्यवस्थेतही बाेकाळत असल्याचे दिसते. 

गुन्हा न नाेंदवल्याने गुन्हेगारी तत्काळ वाढत नाही, याचा त्यांना विसर पडलेला दिसताे. परंतु, काेराेना संसर्गितावर उपचार हाेऊ शकले नाहीत तर ती व्यक्ती काही तासांतच अनेकांना बाधित करते. अन्य रुग्णांनाही खासगी रुग्णालये आधी काेराेना चाचण्या करण्यास सुचवत आहेत. मात्र, सरकारी जिल्हा रुग्णालये तपासणीसाठी त्यांना आतही घेत नाहीत. दिल्लीतील आयटीआेच्या मागील कब्रस्तानात दफन केलेल्या आणि अन्य स्मशानांत दहन केलेल्या व्यक्तींच्या माहितीवरून एकूण मृतांची संख्या आणि दिल्ली सरकारने दर्शवलेल्या संख्येत माेठा फरक आढळत असून यावरून वाद पेटला आहे. एखादी व्यक्ती आराेग्यविषयक तक्रार घेऊन येत असेल तर स्टँडर्ड आॅपरेटिंग प्राेसिजर (एसआेपी) काय असेल? या विषयीचा स्पष्ट आदेश केंद्राने दिला पाहिजे. प्रसार माध्यमांद्वारे ताे जनतेपर्यंत पाेहाेचवला पाहिजे; जेणेकरून किमान शहरातील सुशिक्षित लाेक तपास आणि उपचारासाठी दबाव निर्माण करू शकतील. अलीकडे रुग्णांमधील वाढते वैफल्य गेल्या ४७ दिवसांच्या काेराेना नियंत्रणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकते. 

रुग्णालयाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील पाेलिसावर जीव गमावण्याची वेळ येत असेल आणि नाेएडातील पाेलिसाला रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत असतील तर सामान्य नागरिकांचे हाल काय असतील? एकीकडे तिन्ही सैन्य दले काेराेना याेद्ध्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करत आहेत, तर प्रशासनातील काही मूठभर लाेकांची दिरंगाई लाखाे याेद्ध्यांचे नाव बदनाम करून काेराेनाची भयावहता आणखी वाढवत आहेत. अशा कामचुकार नाेकरशहांवर कठाेर कारवाई हाेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...