आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे सक्रिय साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी पत्रकारितेचा प्रारंभ संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेतून केला. वास्तववादी, परखड वार्तांकनाने त्यांचे नाव झाले. मराठी पत्रकारितेत बातमीदारीचे नवे मापदंड घालून देण्याचे श्रेय रणदिवेंना दिले पाहिजे. भारतातील पत्रकारिता स्वातंत्र्य चळवळीतून उभी राहिली. ती परंपरा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही दिसते. रणदिवे त्याच परंपरेचे पाईक. ते पुढे महाराष्ट्र टाइम्समध्ये गेले आणि निवृत्तीपर्यंत त्यांनी चतुरस्र पत्रकारिता केली. रणदिवे चळवळे, कार्यकर्ता पत्रकार होते. आज अशी कृतिशील पत्रकारिता दुर्मिळ झाली आहे. पत्रकाराने भूमिका घ्यायच्या नसतात, अशा धारणेतून पत्रकारिता समाजाच्या परिवर्तनशील व प्रागतिक मूल्यांपासून दुरावत चालली आहे आणि अशा काळात रणदिवे यांचे जाणे क्लेशदायी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावास भोगला होता.
गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी भाग घेतला. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तिलढ्याच्या त्यांनी केलेल्या वार्तांकनाला तर ऐतिहासिक दस्तावेजाचे मोल प्राप्त झाले. भिवंडी आणि वरळी दंगलीच्या काळातील त्यांचे वार्तांकन आजही अनेकांच्या लक्षात आहे. स्वातंत्र्यापासूनच्या सर्व निवडणुका त्यांनी पाहिल्या होत्या. एका अर्थाने पत्रकारितेला ‘मिशन’ मानणाऱ्यापैकी ते होते. अर्थात त्यांच्या काळातील पत्रकारिता आता अस्तित्वात नाही. कार्यकर्त्या पत्रकारांना तर आजच्या माध्यम जगतात स्थानही नाही. परिणामी तळातल्या जनतेच्या बातम्यांची जागा आक्रसते आहे. म्हणूनच रणदिवे यांच्या पत्रकारितेची आजही आठवण निघते. मराठी पत्रकारितेला संपादकांचा जेवढा मोठा वारसा आहे, तेवढा बातमीदारांचा नाही. सत्तर-ऐंशीच्या दशकातील अनेक संपादक सांगता येतील, पण बातमीदार फारसे आठवणार नाहीत. दिनू रणदिवे, जगन फडणीस आणि अरुण साधू यांची नावे मात्र झळाळून पुढे येतात. फडणीस आणि साधू हे साहित्य, संशोधकीय लेखनाने जगन्मान्य झाले. पण, रणदिवे यांनी मात्र लढाऊ बाणा जोपासत केवळ वार्तांकनाच्या ताकदीवर नाव कमावले. म्हणूनच बातमीदारीवर शंका घेतल्या जाणाऱ्या या काळात आणि भविष्यातही त्यांचे कार्य अनेकांना दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवत राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.