आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘आतल्या’ आवाजाचा सांगावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने चीनच्या प्रश्नावर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अपेक्षेप्रमाणे एकजुटीचा सूर उमटला

केंद्र सरकारने चीनच्या प्रश्नावर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अपेक्षेप्रमाणे एकजुटीचा सूर उमटला असला, तरी विरोधी पक्षांनी यानिमित्ताने उपस्थित केलेले प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटल्याप्रमाणे विश्वास निर्माण होण्यासाठी माहिती देण्यातील अंधार संपला पाहिजे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत सरकारने पारदर्शकपणे उत्तरे दिली तरच या आभासी एकजुटीला वास्तवाचे बळ मिळेल. खरे तर, आपल्याशिवाय अन्य कुणालाही आवाज असू नये आणि असलाच तर तो कुणाला ऐकू येऊ नये, अशी ‘व्यवस्था’ एकीकडे उभी राहिली असताना विरोधकांचाही आवाज ऐकण्याची तयारी सरकारने दाखवली, हीच मोठी गोष्ट आहे. ‘मेरी आवाज सुनो’कडून ‘जरा अपनी भी सुनाओ’पर्यंतचा हा बदल भारत-चीन सीमेवरील संघर्षामुळे झाला असला, तरी तो स्वागतार्ह आहे. देशापुढे उभ्या ठाकलेल्या कोणत्याही आव्हानात्मक प्रसंगाला सामोरे जाताना विरोधकांसह सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन, एकविचाराने निर्णय घेण्याची चांगली प्रथा इतिहासजमा होत असताना स्वत: पंतप्रधानांनी घेतलेली ही बैठक त्यादृष्टीनेही महत्त्वाची आहे. 

चीनबरोबरच्या संबंधांचा इतिहास पाहता, प्रत्यक्ष सीमेवरच्या आणि तिच्याबाबतच्या कोणत्याही वादाचे उत्तर लष्करी कारवाई व आर्थिक अलिप्ततेपेक्षा राजकीय धोरणीपणा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे चीनने भारतीय जवानांच्या बाबतीत केलेल्या आगळिकीचे आणि अशा सततच्या कुरघोड्यांचे उत्तर केवळ संतप्त जनभावनेच्या लाटेवर स्वार होऊन मिळणार नाही. एखादा देश मित्रत्वाच्या आडून शत्रुत्व जोपासत असेल, तर त्याच्याशी ‘डील’ करण्याची आपली पद्धतही बदलली पाहिजे. त्यानुसार चीनसोबत राजकीय आणि राजनैतिकच नव्हे, तर व्यापारी स्वरूपातही आपले हे ‘डील’ कसे असावे, हे ठामपणे ठरवण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा, म्हणजे एका अर्थाने देशाचा ‘आतला’ आवाज सरकारने ऐकला आहे. त्यामुळे आता त्याप्रमाणेच पुढची पावलेही टाकली पाहिजेत. कावेबाज चीनला ठिकाणावर आणण्यासाठी ‘स्वदेशी’चा आग्रह धरताना ‘स्वकीयां’च्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा, सीमेपलीकडचा कावा आणि अलीकडचा दिखावा यात फरक राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...