आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पूर्वपदाच्या वाटेवर लालपरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र - गुजरातच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्यातील खरोली गावात काही वर्षांपूर्वी प्रजासत्ताकदिनी दिवाळी साजरी करण्यात आली. तो आनंद होता स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे उलटून गेल्यानंतर त्यांच्या गावात प्रथमच एसटी आल्याचा. आम्हाला वेगळा विकास नको, रस्ता द्या, एसटी द्या, एवढीच त्यांची मागणी होती. ‘लाल डब्बा’ म्हणून एरवी कुचेष्टेचा विषय असणारी एसटी सामान्य लोकांसाठी प्रगतीच्या स्वप्नांकडे घेऊन जाणारी ‘लालपरी’ आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यातील ५० हजार गावांना विकासवाट दाखवणारी एसटी पुन्हा धावू लागली आहे. शासकीय परिभाषेत हा निर्णय फक्त आंतरजिल्हा वाहतुकीचा असला तरी यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेची जीवनरेषाच जणू पुन्हा मार्गक्रमण करू लागली आहे. लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना ग्रामीण जनता, स्थलांतरित मजूर यांचे अस्तित्वच बेदखल करण्यात आले होते. कुणाला काम बंद झाल्याने घर गाठण्यासाठी वाहन मिळाले नाही, तर कुणाला कामाच्या शोधात दुसरीकडे जाता आले नाही. कुणी शहरात जाऊ न शकल्याने परीक्षेपासून वंचित राहिला, तर कुणी तालुक्याच्या गावी पोहोचता आले नाही म्हणून पीक विम्याला पारखा झाला.

आंतरजिल्हा प्रवेशासाठीच्या प्रवेश पास व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. वशिलेबाजी आणि दलालीने माखलेल्या ‘ई पास’ या प्रकारामुळे तर सामान्यांच्या वाट्याला सुरक्षित प्रवासापेक्षा मनस्तापच अधिक आला. एसटी सुरू करण्याचा निर्णय घेताना ई पासला लावलेली कात्री त्यासाठीच आवश्यक होती. मास्क, सॅनिटायझरच्या वापराकडे कटाक्षाने लक्ष देत, मर्यादित प्रवासी संख्या आणि उचित अंतराचे पालन करून “एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे ब्रीद खरे करून दाखवण्याचे आव्हान महामंडळाप्रमाणेच प्रवाशांसमोरही आहे. कारण एसटी सुरू होणे हे पुढच्या व्यापक अनलॉकच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. त्यासाठी सर्व घटकांनी संयम आणि नियमांचे काटेकोर पालन करत संपूर्ण अनलॉकसाठी आपण सिद्ध असल्याचे दाखवून द्यावे लागेल. तसे झाले तर ‘लालपरी’च्या साथीने आणि विघ्नहर्त्याच्या आगमनाने पूर्वीसारख्या सर्वसामान्य जनजीवनाचे स्वप्न साकार होईल.

बातम्या आणखी आहेत...