आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:विजयपथावर पहिले पाऊल...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या प्रकोपाने लोकांच्या मनातील भीतीची काजळी गडद होत असताना तिला भेदू पाहणारा आशेचा किरण भारतात उगवतो आहे. पहिल्या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे. लसीच्या संशोधनापासून चाचण्या आणि उत्पादनापर्यंतची प्रक्रिया दीर्घ आणि आव्हानात्मक असली तरी त्यात भारताने केलेली प्रगती आश्वासक आहे. चीन, युरोपातील देश आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोनाचा संसर्ग उशिराने म्हणजे मार्चमध्ये सुरू झाला. त्या वेळी जगातील अन्य देशांत लसीच्या संशोधनाला गती आली होती. भारतात ते त्यानंतर सुरू झाले. असे संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या मदतीने तयार केलेली ‘कोव्हॅक्सिन’ विक्रमी कालावधीत मानवी चाचणीसाठी सिद्ध झाली आहे. ही लस चीन आणि ऑक्सफर्ड विकसित करत असलेल्या लसींच्या बरोबरीची असल्याचा संशोधकांचा दावा असल्याने तिच्या मानवी चाचण्यांकडे भारताप्रमाणेच जगाचे लक्ष लागले आहे. ‘आयसीएमआर’च्या मान्यतेनंतर दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. या टप्प्यात ३७५ जणांवर ती केली जाणार आहे. 

‘एम्स’मधील चाचणीत सहभागी होण्यासाठी दहा तासांत सुमारे दहा हजार जणांनी केलेली नावनोंदणी हा एका अर्थाने भारतीय संशोधकांवर सामान्य जनतेने व्यक्त केलेला विश्वासच म्हणावा लागेल. मात्र, यासाठी १८ ते ५५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनाच निवडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लसीमुळे शरीरात अँटीबॉडी तयार होतात की नाही, हे पाहिले जाईल, तर त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये तिचे शरीरावर दुष्परिणाम होतात का? ती दिल्यावर पुन्हा कोरोनाची लागण होते का? झाल्यास किती दिवसांनी होते, हे पडताळण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पाहता, १५ ऑगस्टपर्यंत चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला तरी लस उत्पादनाच्या टप्प्यात येण्यास एक ते दीड वर्ष लागू शकते. मात्र, विविध संस्थांमधील समांतर संशोधन, त्यांची गती आणि शासन तसेच वैद्यकीय व औषधनिर्माण क्षेत्राकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हा कालावधी कमी होण्याची सुचिन्हे आहेत. त्यामु‌ळे या विजयपथावर देशाचे पहिले पाऊल पडत असताना सर्वांनीच जिंकण्यासाठीचा संयम आणि निर्धार कायम ठेवला पाहिजे.