आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सावध ऐका ‘मागच्या’ हाका!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूर्याचा ‘कोरोना’ पाहताना आपल्या आयुष्यात आलेले याच नावाच्या विषाणूचे ‘ग्रहण’ कधी संपेल, ही चिंता जगभरातील लोकांना आहे.

सूर्याचा ‘कोरोना’ पाहताना आपल्या आयुष्यात आलेले याच नावाच्या विषाणूचे ‘ग्रहण’ कधी संपेल, ही चिंता जगभरातील लोकांना आहे. भारतीयांना मात्र दुहेरी चिंतेने ग्रासले आहे. एक आहे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची आणि दुसरी कोरोनाच्या जन्मदात्याकडून सीमेवर सुरू असलेल्या कुरापतींची. मात्र, आता सरकारने चीनच्या कोणत्याही आगळिकीला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य सैन्याला दिले आहे. त्यासाठी प्रसंगी पूर्वीचे करार-मदार मोडून बंदुका चालवण्याची परवानगीही दिली आहे. शिवाय, आपत्कालीन प्रसंगात पाचशे कोटींपर्यंतच्या शस्त्र खरेदीचे अधिकार तिन्ही सेनादलांना देण्यात आले आहेत. हे निर्णय केवळ सैन्याचेच नव्हे, तर भारतीयांचेही मनोधैर्य वाढवणारे आहेत. चिनी सैनिकांच्या हल्ल्यात वीस जवान शहीद झाल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्काराची आणि लष्करी कारवाईची मागणी जोर धरत असताना चर्चा- वाटाघाटींतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरूच आहे. 

काल मॉल्डो येथे दोन्ही देशांत झालेल्या लेफ्टनंट जनरल स्तरावरच्या बैठकीकडे त्या दृष्टीने पाहायला हवे. एकीकडे चर्चा सुरू ठेवत सैन्याला तयारीसाठी पुरेसा वेळ देणे, हा रणनीतीचा भागही असू शकतो. पण, अशा प्रसंगात बाहू फुरफुरवणाऱ्या वल्गना करून वा फुकाच्या फुशारक्या मारून भागत नाही. त्यामुळे देशाची सुरक्षा, रणनीती आणि सीमावादासारख्या मुद्द्यांवर विचारपूर्वक विधाने केली पाहिजेत, असा सल्ला आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच दिला आहे आणि तोही पंतप्रधान मोदी यांना! चीनच्या प्रश्नावरील आपल्या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मोदींनी सावधपणे बोलायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. सर्वपक्षीय बैठक आणि चीनबाबतच्या विधानांचा संदर्भ डॉ. सिंग यांच्या या निवेदनाला आहे. त्याकडे सरकारला आणि स्वत: मोदींनाही गांभीर्याने व सकारात्मकतेने पाहावे लागेल. चीनला ‘क्रमांक एकचा शत्रू’ मानणाऱ्या नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाची अनाठायी उपेक्षा एक वेळ समजू शकते. पण, अलीकडच्या काळात देशाचे नेतृत्व केलेल्या आणि या प्रश्नाचे बदललेले संदर्भ माहीत असलेल्या मनमोहनसिंगांच्या सल्ल्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. सीमेवर सैन्याला पुढची चाल देताना मागच्यांच्या हाकांकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते!

बातम्या आणखी आहेत...