आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:विश्वासू विश्वासघातकी !

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखच्या सीमेवरील तणाव व चकमकीनंतर भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या.

लडाखच्या सीमेवरील तणाव व चकमकीनंतर भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. कालच्या अकरा तासांच्या वाटाघाटींनंतरही दोन्ही बाजूने अधिकृत निवेदन आलेले नाही. वास्तविक पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत चीनने माघार घेत तणाव कमी करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा भर होता. पण तरीही चिनी सैनिकांनी केलेल्या विचित्र हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. चर्चा चालू असताना मध्येच असे काय घडले? की ज्यामुळे चिनी सैनिकांनी हिंसक हल्ला केला. अशा पार्श्वभूमीवर शांततापूर्ण चर्चेच्या बाबतीत चीनवर विश्वास कसा ठेवायचा? एक अत्यंत ‘विश्वासू अविश्वासार्ह’ देश म्हणून चीनची ख्याती १९६२ च्या युद्धापासून आहे. साडेतीन हजार किलोमीटर प्रत्यक्ष ताबारेषेवर त्यानंतर आजतागायत तणाव धुुमसत असतोच. एकमेकांवर हल्ले करायचे नाहीत, असे करारही झाले. १९९३ मध्ये झालेला करार १९९६ मध्ये चीनने घुसखोरी करीत मोडला. पुढे २००५ व २०१७ मध्ये डोकलाममधील तणावानंतरही चीन शांत राहिला नाही, राहणारही नाही. शब्द दिल्यानंतरही तो पाळला जाईलच याची खात्री चीनबद्दल केव्हाच नसते. ज्या ताबारेषेबाबत आता वाद सुरू आहे, त्या भूभागाबाबत चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नकाशात अक्साई चीन, पाक, पाकव्याप्त काश्मीर, अरुणाचल प्रदेश हा सर्व प्रदेश भारताच्या हद्दीत असल्याचे दाखवले होते. 

याअगोदर २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नकाशातही आजचा वादग्रस्त भूभाग भारताच्या हद्दीत असल्याचे चिनी सरकारने प्रसिद्ध केलेल्या नकाशात स्पष्ट केले होते. पण पुढे ते नकाशे मागे घेतले. बोटावरची थुंकी बदलण्याचा असा खेळ खेळणाऱ्या चीनवर भारताने विश्वास कसा ठेवायचा? भारत बांधत असलेल्या रस्त्याबाबत आक्षेप घेत असताना चीन मात्र लेहपर्यंत बोगदा खणायच्या खटपटीत असल्याचे वृत्त आहे. चिनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या नेपाळच्या हद्दीत रस्ते बांधण्याच्या निमित्ताने जवळपास ३० किलोमीटर प्रदेशात चीनने अतिक्रमण केले आहे. लिपुलेख परिसराबाबत भारताविरोधात आक्षेप नोंदवणारा नेपाळ चीनच्या विरोधात बोलत नाही. भारत व चीनच्या लष्करी अधिकऱ्यांमधील चर्चा, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्र्यांमधील वाटाघाटी यातून तूर्त तोडगा कधी निघेल? सैन्य माघारीची तयारी व तणावग्रस्त भागात लष्करी बांधकाम याबाबत नेमका समझोता सध्या तरी दृष्टिपथात नाही. तो होईपर्यंत तणावही निवळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...