आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:तिजोरीत धन... खिशात धूर

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाढता वाढता वाढे... या उक्तीप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे उच्चांक करत आहेत.

वाढता वाढता वाढे... या उक्तीप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे उच्चांक करत आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग आणि इंधनाचे दर कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या १८ दिवसांपासून तेलाचा हा खेळ सुरू आहे. दिल्लीत तर पेट्रोलपेक्षा डिझेल १२ पैशांनी महागले आहे. असे प्रथमच घडते आहे. इंधनाच्या बाबतीत हे होण्यामागे कारण आहे धनाचे. सरकार यात स्वत:ची तिजोरी भरण्याचाच विचार करते आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा विचार गेल्या १८ दिवसांत एकदाही झालेला नाही. कच्चे तेल घसरणीला लागले होते, तेव्हा १२ आठवडे देशातील तेल कंपन्या हात बांधून बसलेल्या होत्या. त्या काळात इंधनाचे दर बदललेच नाहीत.

सर्वसामान्यांचे कैवारी असल्याचे भासवत त्या वेळी सरकारने ग्राहकांवर भार न वाढवता उत्पादन शुल्क वाढवले. त्याचे परिणाम आता ग्राहकांच्या खिशाला जाणवत आहेत. गेल्या सहा वर्षांत डिझेलवरील कर लिटरमागे ३.४६ वरून ३१.८३ रुपयांपर्यंत गेले आहेत, तर पेट्रोलवरचे कर लिटरमागे ९.२० वरून ३२.९८ रुपये झाले आहेत. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या काळात सरकारने नऊ वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली होती. या काळात सरकारच्या तिजोरीत २ लाख ४२ हजार कोटी रुपये आले. मे २०२० मध्ये कच्चे तेल ऐतिहासिक नीचांकावर असताना सरकारने पेट्रोलवर लिटरमागे १० रुपये, तर डिझेलवर लिटरला १३ रुपये उत्पादन शुल्क लावले. यामुळे सरकारच्या तिजोरीत अतिरिक्त १.६ लाख कोटी रुपये आले. त्यामुळे इंधनाच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट- तिप्पट कराचा भार ग्राहकांवर पडतो आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले अर्थचक्र अनलॉकमध्ये गती घेत असतानाच इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने अडचणी वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे ट्रक वाहतूक १० ते १२ टक्के महागली आहे. व्यापारी हा बोजा ग्राहकांवरच टाकत असल्याने ग्राहकाला इंधन दरवाढ आणि महागाई असा दुहेरी फटका बसतो आहे. कोरोनामुळे होणारा आकस्मिक खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढ असल्याचे सरकार सांगते आहे. प्रत्यक्षात इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशात धूर निघत असताना सरकार मात्र धनवान होण्यात मग्न असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...