आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘लोकशक्ती’ची परीक्षा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कोरोना महामारीच्या काळात होणारी जगातील सर्वांत मोठी निवडणूक’ असे वर्णन केले जाणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होऊन दिवाळी आणि छटपर्वाच्या आधी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. नवे सरकार कदाचित या दोन सणांच्या नंतरच अस्तित्वात येईल. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी अनेक उपाय योजले आहेत. गर्दी टाळण्यासाठी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. एका केंद्रावर एक हजारपेक्षा अधिक मतदार नसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच कोरोनाबाधितांना मतदानासाठी शेवटचा तास ठेवण्यात आला आहे. उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा अवधी असला तरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागणार असल्यामुळे सभा, पदयात्रांवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे बहुतांश प्रचार व्हर्च्युअल अर्थात आभासी स्वरूपात करावा लागेल.

नेत्यांची भाषणे जाहीरपणे न होता डिजिटल माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवली जातील. ज्या पक्षांकडे अशी यंत्रणा नाही किंवा ती अपुरी आहे, ते अर्थातच प्रचारात मागे पडतील. स्टार प्रचारकांच्या व्हर्च्युअल रॅलींना कसा प्रतिसाद मिळतो, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्याशिवाय मीडिया, सोशल मीडिया आणि अन्य डिजिटल संपर्क माध्यमांतून आरोप- प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू राहील. गेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून बहुमत मिळवले. पण, दीड वर्षातच या महाआघाडीतून बाहेर पडत ते भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतले आणि भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता कायम ठेवली. पंधरा वर्षे सत्तेवर असलेले नितीशकुमार कधी काळी ‘सुशासना’चा दावा करत होते. त्यांच्या सरकारचा अलीकडचा कारभार पाहता या दाव्यातील हवा केव्हाच निघून गेल्याचे दिसते. दुसरीकडे, कारागृहात असलेल्या लालूप्रसादांच्या पक्षाची कमान त्यांचे पुत्र तेजस्वी यांनी हाती घेतली आहे. काँग्रेसला सोबत घेऊन ते भाजप- नितीशकुमारांशी दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे देशातील लोकजीवन आणि एकतर्फी कारभारामुळे लोकशाही अडचणीत आली आहे. त्यामुळे महामारी आणि मनमानीचे आव्हान समोर असताना होणारी ही निवडणूक सर्वार्थाने ‘लोकशक्ती’चीच परीक्षा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...