आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:रंगभेदाविरुद्ध ‘फेअर’ निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • १९७५ मध्ये बीजिंगच्या जागतिक महिला परिषदेपासून ‘ब्लॅक इज ब्यूटिफूल’ची लढाई सुरू झाली.

‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण..’ या बालगीतातील शब्द तसे निरागस. पण, जात-धर्म, वर्ग-वर्ण, वंश, लिंग या माणसामाणसांना भेदणाऱ्या विखारामध्ये ‘कातडीचा रंग’ निर्णायक ठरू लागला आणि रंगाच्या वर्चस्ववादाची जीवघेणी लढाई जगभर सुरू झाली. कातडीच्या रंगामुळे रेल्वेच्या डब्याबाहेर फेकला गेलेला ‘महात्मा’ झाला, अशाच रंगामुळे गुलामगिरीच्या जोखडात अडकलेला लोकशाहीचा जनक झाला, पण कातडीच्या रंगाभोवतीची सामाजिक-राजकीय-आर्थिक समीकरणे संपली नाहीत. बहुविविधतेने नटलेेल्या, पण जातीपातींच्या रंगांनी भेदलेल्या भारतासारख्या देशात याने माणसांकडे बघण्याचे पूर्वग्रहदूषित संकेत तयार केले. उच्चवर्णीय, उच्चवर्गीयांना ‘गोरे’पणाचे फायदे मिळत गेले, तर दलित, आदिवासी, भटके या वंचितांना ‘काळे’पणाचे चटके सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर आपल्या सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडमधील ‘फेअर’ हा शब्द काढण्याच्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. आधुनिकतेसाठी जगाचा मार्गदर्शक ठरलेल्या अमेरिकेसारख्या देशात अगदी परवापर्यंत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीयाच्या पोलिसांनी केलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय निश्चितच उल्लेखनीय आहे. अन्य सामाजिक उतरंडीप्रमाणेच काळेपणाचे चटकेही स्त्रियांनाच अधिक बसतात. विशेषत: लग्नाच्या बाजारात मनाच्या सौंदर्यापेक्षा त्वचेच्या रंगाला अधिक मागणी असते. 

ही सामाजिक मानसिकता विकसित करण्यात सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेने निर्णायक भूमिका वठवली. गोऱ्या नसलेल्या मुलींच्या मनात न्यूनगंडाची बीजे पेरली, महिलांचा अपमान करण्याची आणखी एक संधी निर्माण केली. १९७५ मध्ये बीजिंगच्या जागतिक महिला परिषदेपासून ‘ब्लॅक इज ब्यूटिफूल’ची लढाई सुरू झाली. २०१३ मध्ये अमेरिकेत वर्णभेदाविरोधात सुरू झालेली ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ ही चळवळ भारतासह जगभरात पोहोचली. गोरेपणाभोवतीच्या कोट्यवधींच्या ‘मार्केट’चा पर्दाफाश करतानाच सावळ्यांच्या सौंदर्याला तिने मान मिळवून दिला. सौंदर्य प्रसाधनाच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द मागे घेतला जाणे, हा या प्रदीर्घ लढाईचा विजय आहे. नाव बदलल्याने मानसिकतेत काय फरक पडणार, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, उद्योग विश्वातील ज्या ब्रँडने ‘फेअरनेस’ची संकल्पना मनामनात भिनवली, त्यानेच आपल्या नावातून हा शब्द हटवणे हा रंगभेदाविरुद्ध आणि समतेच्या दिशेने झालेला ‘फेअर’ निर्णय मानला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...